इंद्रधनुष्य (पहाटपावलं)

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

वाऱ्याच्या लाटांवर स्वार होऊन ही मुलं आकाशाच्या निळाईकडं झेपावू लागली आहेत; आणि मुठींतले रंग उधळून त्यांनी तिथं सप्तरंगी कमानींची रंगपंचमी सुरू केली आहे

खिडकीच्या चौकटीतून रोज दिसणारं झाड आता ताज्या हिरवेपणानं बहरून गेलं आहे. पानांच्या आणि त्यांना पकडून ठेवणाऱ्या फांद्यांच्या काया चांगल्या बाळसेदार झाल्या आहेत. पानांची मखमली मोरपिसं अब्दागिरीसारखी नाचू लागली आहेत. पानांच्या दाटीतून फुलांनी माना उंचावल्यानं झाडावर सगळीकडं नक्षीदार रांगोळ्या रेखाटल्या गेल्या आहेत. हिरव्या-तपकिरी रंगांच्या गवतकाड्यांच्या गुंफणीतून साकारलेली पक्ष्यांची घरटी फांद्यांच्या आधारानं झुलत आहेत. पक्ष्यांची नाजूक बाळं त्या गवताळ गुंड्यांत शांत झोपी गेली आहेत. झाडाच्या दिशेनं पक्ष्यांच्या भराऱ्या पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत. ये-जा करणारी पाखरं प्रत्येक वेळी चिवचिवत्या सरींचा पाऊस आणू लागली आहेत. झाडाच्या जगात सर्जनाच्या लकेरी शिंपल्या जाऊ लागल्या आहेत. या प्रसन्न मैफलीत झाड रंगून-समरसून गेलं आहे. झाडाच्या पानापानांवर नवेपणाची अल्लड मेंदी हसते आहे. सारं झाडच दर क्षणी नवेपणानं फुलतं आहे.

वर उंच आकाशात ढगांची कुटुंबं सामूहिक यात्रेवर निघावं तशी मजल-दरमजल करू लागली आहेत. दिशांचे रस्ते त्यांना अपुरे वाटू लागले आहेत. ही संधी साधून त्यांच्या खोडकर मुलांनी नवाच खेळ सुरू केला आहे. श्रावणसरींच्या थेंबांतले ओले रंग मुठींत घट्ट आवळून ती जमा करू लागली आहेत. वाऱ्याच्या लाटांवर स्वार होऊन ही मुलं आकाशाच्या निळाईकडं झेपावू लागली आहेत; आणि मुठींतले रंग उधळून त्यांनी तिथं सप्तरंगी कमानींची रंगपंचमी सुरू केली आहे.

इंद्रधनुष्याच्या कमानींची अपूर्वाई वाटलेली पाखरंही आणखी दुसऱ्याच खेळात रंगली आहेत. त्यांतल्या काहींनी पंखांत श्रावणथेंब झेलून घ्यायला सुरवात केली आहे; तर काहींची पाणथळ जागांवर उतरून तिथले थेंब पंखांनी टिपून बरोबर आणायची घाई चालविली आहे. थेंबांच्या ओझ्यानं पंखांची ओंजळ जडावलेले पक्षी वेगवेगळ्या दिशांनी येऊन झाडावर येऊ लागले आहेत. पंखांत भरून आणलेले श्रावणरंगी थेंब ते पानांआड लपवून ठेवू लागले आहेत. ढगांच्या मुलांनी आकाशात उंच नेलेले श्रावणथेंब तिथं इंद्रधनू होऊन हसू लागतात, तशी पाखरांनी पानांमागं लपविलेल्या थेंबांची रंगीबेरंगी फुलं झाडांवर बहरून येतात.

आकाशात इंद्रधनुष्य दिसत नसतं, तेव्हा ते झाडांवर येऊन फुलांच्या रूपानं हसत असतं; आणि आकाशात इंद्रधनुष्याचं अस्तित्व जाणवतं, तेव्हा ते झाडांवरच्या फुलांचं विस्तारित प्रतिबिंब असतं. इंद्रधनुष्य तयार व्हायला हलकी रिमझिम हवी; आणि तीमधून जाणारे सूर्यकिरण हवेत. प्रसन्न सद्विचारांच्या निर्मळ पाऊसधारा आणि निखळ आनंदाचे कोवळे किरण एकत्र आले, तर आपल्याही ओंजळीत सुखाच्या इंद्रधनुष्याचे रंग नक्कीच खेळू लागतील; पण तुमची ओंजळ तयार आहे ना?