सुखाचं रोप (पहाटपावलं)

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

फुलाचं एखादं रोप लावलं, तर काही दिवसांतच ते बहरतं; आणि फुलाच्या रूपानं सुख तुमच्याकडं पाहून हास्य करतं. सुखाच्या मुखावर नेहमीच हास्य विलसत असतं; आणि हसू सुखाच्या फार जवळ असतं

सुखाच्या; आणि ते मिळविण्याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. कुणाला आरामात सुख वाटतं; तर कुणाला भल्या उद्दिष्टासाठी कष्ट करण्यात ते मिळतं. कुणाला केवळ वैयक्तिक लाभात ते दिसतं; तर कुणाला दातृत्वात सुखाचा अनुभव मिळतो. अलिप्त राहण्यात सुख सामावलेलं आहे, असं कुणाला वाटतं; तर कुणाला जनसमूहाच्या वेढ्यात सुखाचं रूप दिसतं. कुणाला अवघं आयुष्य सेवेसाठीच झोकून देण्यात सुखाची छाया दिसते. दुर्मिळ गोष्टींच्या लाभात कुणाला सुख आहेसं वाटतं; तर साध्या साध्या गोष्टींतही सुखाचा समुद्र सामावल्याची कुणाची श्रद्धा असते. खूप शोध करूनही काहींना सुखाचा लहान तुकडाही सापडत नाही; तर पाहू तिथं सुखाचे कवडसे पसरल्याचा तृप्त अनुभव काहींना ठायीठायी येत राहतो. भौतिकदृष्ट्या सुखात लोळणाऱ्यांना पराची गादीही टोचते; तर उशाला दगड घेऊन एखाद्या झाडाखाली झोपी जाणाऱ्या श्रमिकाला तिथंही सुखाची निद्रा घेता येते.

पाहू तिथं सुख आहेच; किंवा ते प्राप्त करण्याच्या संधी तर अक्षरशः कुठंही आहेत. फरक पडत असेल, तर तो आपल्या दृष्टीत. एखाद्याचं दुःख- दैन्य पाहून कुणाचं मन हेलावून जात असेल, तर ते सहृदयतेचं लक्षण जरूर आहे; पण ही केवळ सहवेदना झाली. त्यानं कुणाचं दुःख दूर होत नाही; फार तर काही काळापुरतं ते हलकं होईल. त्यानं दोघांनाही आनंद झाला, तरी तो काही क्षणांपुरताच टिकेल. याउलट, दुसऱ्याचं दुःख- दैन्य दूर करण्यात सुखाची संधी शोधून, त्यासाठी प्रयत्न करणाऱ्याला निर्मळ सुखानुभव येईल. वेदनांनी विव्हळणाऱ्या सिंहाच्या पायातील काटा काढणाऱ्या कधीकाळीच्या मदतनिसाला सिंह विसरत नाही; आणि या माणसाला शिक्षा म्हणून जेव्हा भुकेलेल्या सिंहाच्या तोंडी दिलं जातं, तेव्हा जुनी मदत स्मरून तो सिंह त्या माणसाला क्षमा करतो. दुसऱ्याला सुख देण्याच्या संधीत मोठं समाधान भरलेलं आहे, हेच या उदाहरणातून पटतं.

माणसं आयुष्यभर सुखाचा- समाधानाचा शोध घेत राहतात. काहींना सुख मिळविण्याचा परीस सापडतो; आणि काहींच्या ओंजळी रित्याच राहतात. सुख मागून मिळत नाही. धावून हाती येत नाही. सुखाला बंदोबस्तात ठेवायची योजना आखली, तरी ठेवीसारखं ते वाढत नाही. सुख वाहतं असतं. त्याच्या ओंजळी आपण भरून घ्यायच्या असतात. ते करायला कुणालाच मज्जाव नसतो. फुलाचं एखादं रोप लावलं, तर काही दिवसांतच ते बहरतं; आणि फुलाच्या रूपानं सुख तुमच्याकडं पाहून हास्य करतं. सुखाच्या मुखावर नेहमीच हास्य विलसत असतं; आणि हसू सुखाच्या फार जवळ असतं. सुखाची रोपं लावीत राहिलो, तरच फुलं उमलतील. अशा बागेत दुःखाचं वारं कधीच फिरकणार नाही. सुखाचं रोप मात्र आपण शोधायला हवं. खरं तर, ते आपल्या हातांतच आहे!

टॅग्स