काठी नि घोंगडं घेऊ द्या की रं..!  (ढिंग टांग! )

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

ही कंपनी कोकणात आली तर इथली माडबनं, मासे, आंबे-रातांबे, काजूगर सगळं नष्ट होईल, असं काही लोकांचं म्हणणं आहे, तर असलं काहीही होणार नसून उलट बुलेट ट्रेन पार राजापुरापर्यंत दौडेल असं काही लोक म्हणतायत. नाणारचं खाणार, त्यालाच देव देणार, हे लक्षात ठेव. 

बने, बने, लोळत काय पडलीयेस अशी? चल, आवर पटकन...सामान बांध! आपल्याला किनई जत्रेला जायचंय! कुठली जत्रा म्हणून काय विचारत्येस? अगं, नाणारच्या जत्रेला जायचंय आपल्याला... ना-णा-र! नानार नाही!! आपल्या फडणवीसनानांमुळे त्या गावाला नानार म्हणतात, असं कोणी सांगितलं तुला?...नाणार कुठेशी आलं म्हणून काय विचारतेस? अगं आपल्या कोकणातच आहे हे नाणार. तिथं ना खूप मोठ्ठी तेल कंपनी येणार आहे म्हणे. सौदी अरबस्तानातल्या एका कंपनीनं तिथं तेल कंपनी सुरू करायचं ठरवलं आहे. ती येऊ नये, म्हणून काही लोकांनी देवाला साकडं घातलंय आणि ती यावी म्हणून काही लोकांनी त्याच देवाला गाऱ्हाणं घातलंय! दोन्हीकडून उत्सवाचं वातावरण आहे. 

ही कंपनी कोकणात आली तर इथली माडबनं, मासे, आंबे-रातांबे, काजूगर सगळं नष्ट होईल, असं काही लोकांचं म्हणणं आहे, तर असलं काहीही होणार नसून उलट बुलेट ट्रेन पार राजापुरापर्यंत दौडेल असं काही लोक म्हणतायत. नाणारचं खाणार, त्यालाच देव देणार, हे लक्षात ठेव. 

बने, भलताच गैरसमज करून घेऊ नकोस. नाणारच्या जमिनीत तेलविहिरी लागल्या असं कोणी सांगितलं तुला? श्रीमंत अरबांप्रमाणे आपली "कोकनातली मान्सां' झगे घालून मिरवणार असं वाटलं की काय तुला? वेडी कुठली!! इथे कित्तीही विकास झाला तरी आपली कोकणातली माणसं राजापुरी पंच्यावरच राहणार!! नाणारला मोठ्ठा मॉल आला तरी तिथं राजापुरी पंच्याचं शोरुम असेल, हे लक्षात ठेव! 
आपल्या कोकणात किती छान छान जत्रा होतात. त्यात ही नवीन फाइव्ह स्टार जत्रा आहे. असल्या जत्रेत कित्ती धम्माल असते. गरगर फिरणारा गोल पाळणा, मोठ्‌ठंच्या मोठ्ठं जायंट व्हीऽऽल!! काय? तुला चक्‍कर येते? पिशवी घेऊन बस त्या उंच चाकात!! प्लास्टिकची नको हं!! दंड होतो!!! 

...चल, निघू या लगेच. मग बसमध्ये जागा मिळणार नाही. 
बने, समोरचा बसस्टॉप बघ, नाणारच्या बसची वाट पाहात कितीतरी जत्रेकरू उभे आहेत. पहा, पहा नाऽऽ...ते बघ, आपल्याला बस पकडायची नसून सहज म्हणून बसस्टॉपवर उभे आहोत, अशा खटाटोपात आपले शिवाजी पार्कवाले चुलतराजसाहेब उभे आहेत. त्यांना नाणारला यायचंय, पण तिथल्या गर्दीत घुसायचं नाहीए!! त्यांना गर्दी समोर बसलेलीच आवडते, अवतीभवती गर्दी झाली की त्यांच्या नाकाला रुमाल गेलाच म्हणून समज!! त्यांच्या भावकीतली, म्हंजे बांदऱ्यातली मंडळीसुद्धा नाणारला जायचं म्हणतायत. म्हंजे हे ती तारीख हुकवून जाणार!! अशा तारखा हुकवण्यातच त्यांच्या बसेस चुकतात!! 
उधोजीसाहेबांना भयंकर राग आलाय सध्या! नाणारमधली माडबनं आणि मासे सुरक्षित राहतील असं आश्‍वासन फडणवीसनानांनी दिलंन आणि हे गेले सुट्टीवर. परत येईतोवर इकडे फडणवीसनानांनी नाणारची सुपारी फोडलीन!! त्यामुळे नाणारच्या जत्रेसाठी ते येत्या आठवड्यात हजेरी लावणार आहेत. 

ते जाऊ दे. ते बघ, शेजारच्या बिल्डिंगीतले आशुक्राव चव्हाण भराभरा निघालेसुद्धा! आपल्या मागून प्रचंड जमाव चालतो आहे, अशा आविर्भावात ते निघाले आहेत. पण ऍक्‍चुअली ते एकटेच आहेत...नाणारच्या बस डेपोत उतरताना वेषांतर कुठलं करायचं? ह्या विचारात ते आत्ता आहेत. कारण तिथल्या बस डेपोवर नारोबादादा राणे स्वागताला उभेच असणार!! 
नाणारची जत्रा कधीपर्यंत चालणार विचारतेस? थांब हं...क्‍यालिंडरात बघून सांगतो. हं...वैशाख शुद्ध दशमीला जत्रा संपेल. का म्हंजे? अगं, आपल्या महाराष्ट्राचे थोरले साहेब तिकडं त्या दिवशी पोचणार आहेत ना! तोवर जत्रा चालू ठेवावी लागणारच...चल, उचल तुझं गाठोडं, पळ!...ती पहा, नाणारची बस आलीसुद्धा!! 

-ब्रिटिश नंदी 
 

Web Title: Marathi Article Dhing Tang Pune Edition Pune Editorial