अरे, पगार पगार! 

payment
payment

गृहिणीपद हे सदासर्वकाळ आयुष्यभर असते. त्याला ना तासांची मर्यादा, ना निवृत्तीचे वय...ना पगाराची अट! म्हणूनच तिचे सामाजिक जीवनातील स्थान अधिक सन्माननीय ठरावे. परंतु, मुळात बदल दृष्टिकोनात व्हायला हवा. 

सकाळपासून रात्री बिछान्याला पाठ लागेपर्यंत घरातली आवराआवर करणाऱ्या, न्याहारीच्या पोह्यांपासून रात्रीच्या खिचडीपर्यंत नाना तऱ्हेचे पदार्थ करत चुलीशी खिळलेल्या, अभावातही भाव उराशी बाळगत संसाराचा गाडा समर्थपणे ओढणाऱ्या संसारी गृहिणीला नेमके किती "पॅकेज' असावे? तिची कमाई किती असावी? हा प्रश्‍न चमत्कारिक वाटेल. पण कायद्याच्या चौकटीत मात्र ही घरगृहस्थी सर्वसाधारणपणे मोलकरणीच्या पगाराइतकी आहे. मुंबईतील एका रस्ता अपघातात दगावलेल्या गृहिणीच्या कुटुंबीयांना झाडूपोछा, धुणीभांडी करणाऱ्या मोलकरणीच्या पगाराइतकी नुकसानभरपाई द्यावी, असा निवाडा रस्ते अपघात दावेविषयक लवादाने नुकताच दिला आहे. 

त्यावरून तरी असाच निष्कर्ष निघू शकेल. ही गृहिणी रस्ता ओलांडत असताना भरधाव मोटारसायकलने तिला धडक दिली, त्यात तिला प्राण गमवावे लागले. तिचा पती आणि चार कच्चीबच्ची यांचे जन्माचे झालेले नुकसान भरून काढण्यास विमा कंपनीने विरोध दर्शवला. ही गृहिणी स्वत: काहीच कमाई करत नसल्याने तिच्या कुटुंबास भरपाई देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असा विमा कंपनीचा युक्‍तिवाद होता. सर्वसाधारणपणे कमावती व्यक्‍ती अपघातात दगावली तर तिच्या मिळकतीची सरासरी काढून भरपाई देण्याचा संकेत असतो. पण घरबसल्या कामाचे ढिगारे उपसणाऱ्या गृहिणीच्या कामाचे मोल किती? हा प्रश्‍न यावेळी उपस्थित झाला. लवादाने अखेर धुणीभांडी करणाऱ्या मोलकरणींची सरासरी दरमहा साडेचार हजार रुपये इतकी मिळकत गृहित धरून विमा कंपनीला त्या दुर्दैवी गृहिणीच्या कुटुंबीयांना साडेपाच लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे. 

वरकरणी ही केस किरकोळ रस्ते अपघाताची वाटली तरी त्याला अनेक सामाजिक आणि आर्थिक पदर आहेत, हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. पती मिळवता असलेल्या गृहिणीला घरात राहून असंख्य गोष्टी तडीस न्याव्या लागत असतात. मुलाबाळांची काळजी, त्यांचे संगोपन, घरकाम, घरखर्चाचे नियोजन आणि अन्य सणासुदीनिमित्ताने येणाऱ्या जबाबदाऱ्या अशा अनेक गोष्टींचे भान ठेवत संसार नावाची तारेवरची कसरत करावी लागत असते. त्याचे मोल होणे केवळ अशक्‍य. पण घरकामाची आवड, निवडटिपण, शिवणकामात तरबेज आदी गुणवत्ता कालौघात दुय्यम ठरत गेल्या. आईच्या घरगुती धावपळीला तर सर्रास गृहितच धरले जात असते. जेव्हा ही बाब कायद्याच्या चौकटीत बसवणे क्रमप्राप्त ठरते, तेव्हाही त्या आईला गृहितच धरले जाते, ही खरी मेख आहे. गेल्या काही वर्षांत गृहव्यवस्थापन आणि एकंदर घरगृहस्थीकडे सन्मानाने बघण्याचा दृष्टिकोन जगभर तयार होत आहे. "हाउसवाइफ'चा आग्रहाने "होम मेकर' असा सन्माननीय उल्लेख होऊ लागला. पण शब्द बदलले, म्हणजे ट्रीटमेंट बदलली, असे होत नाही. सुमारे पाच वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय बाल व महिला खात्याच्या मंत्री कृष्णा तीरथ यांनी गृहिणींना मानधन देण्याची संकल्पना मांडली होती. घरगृहस्थी सांभाळणाऱ्या स्त्रियांचे देशउभारणीतले अप्रत्यक्ष योगदान अतुलनीय आहे, त्याला अर्थव्यवहारातही प्रतिष्ठा मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले गेले. त्या प्रस्तावावर काही काळ उलटसुलट चर्चाही झडल्या. पण पुढे मामला थंड झाला. 

आईचा पगार ठरविणे ही बाबच आपल्या सांस्कृतिक मनाला सहन होत नाही, हे मान्य. पण तिचे व्यवहारातले स्थानही अढळ आणि उच्च मानले जावे, ही किमान अपेक्षा आहे. गेल्याच महिन्यात चीनमध्ये झालेल्या विश्‍वसुंदरी स्पर्धेत विजेती ठरलेली भारताची मानुषी छिल्लर हिने "आईच्या परिश्रमांचे मोल होऊ शकत नाही, तिलाच सर्वात मोठा सन्मान द्यायला हवा' असे आपल्या उत्तरात म्हटले होते. आईचा घामट पदर, तिचे रिटायर होणे, तिचे आयुष्यातील स्थान हे एव्हाना कैकवेळा कविता, कादंबऱ्या आणि नाटकांचा विषय झाले आहेत. पण प्रामाणिकपणे बोलायचे झाले तर ही सारी तुळईवरची वाक्‍ये झाली-निव्वळ सुभाषिते! वास्तवात आईच्या कामाची तुलना आणि मोल हे मोलकरणीच्या रोजगाराइतकेच होते, हे कोरडे सत्य आहे. गृहिणीपद हे सदासर्वकाळ आयुष्यभर असते. त्याला ना तासांची मर्यादा, ना निवृत्तीचे वय...ना पगाराची अट! म्हणूनच तिचे सामाजिक जीवनातील स्थान अधिक सन्माननीय ठरावे. परंतु, मुळात बदल दृष्टिकोनात व्हायला हवा आहे. त्यासाठी कोर्टाची पायरी चढण्याचे कारण नाही. त्याची सुरवात करायची झाल्यास, स्वत:च्याच घरासारखे ठिकाण नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com