विद्यापीठ स्तरावरील संवादाचे महत्त्व 

PNE17M97834
PNE17M97834

अलीकडच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात जे मोठे बदल होत आहेत, जी आव्हाने उभी राहात आहेत, त्यांना यशस्वीरीत्या तोंड देत प्रगती साधायची तर शिक्षणसंस्था; विशेषतः विद्यापीठे पूर्णपणे विद्यार्थिकेंद्री असली पाहिजेत. विद्यापीठे नेमकी कोणासाठी? या प्रश्‍नाचे निःसंदिग्ध उत्तर म्हणजे, विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, ते शिकण्यासाठी पूरक सुविधा उपलब्ध करून देणे आणि जगाचे भान देणे ही विद्यापीठांची उद्दिष्टे असायला हवीत. हे सर्व करताना कळीचा मुद्दा ठरतो तो विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा. हा संवाद थेट असावा. याचे कारण चांगल्या संवादामुळे अनेक गोष्टी सुकर बनतात. यासंदर्भात सुरू केलेल्या काही उपक्रमांचा अनुभव खूपच उत्साहवर्धक असल्याने तो सहप्रचित करावासा वाटला. 

कुलगुरू व विद्यापीठीय व्यवस्थेतील प्रत्येक घटक हा विद्यार्थ्यांना उपलब्ध असायला हवा. त्या दृष्टीने व्यक्तीश: कुलगुरू व अधिकारपदावरील इतरही मंडळी सर्वांसाठी उपलब्ध असतात. इतकेच नव्हे तर आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जायला उत्सुक असतो. वेगवेगळी निमित्त साधून तशी संधी घेतो. कारण, विद्यार्थी हे आमचे कान व डोळे आहेत. त्यांच्यामुळे विद्यापीठात सुरू असलेल्या अनेक बऱ्यावाईट घडामोडी, समस्या किंवा सुधारणेला वाव असलेल्या बाबींची माहिती थेट आमच्यापर्यंत पोचते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यावर उपाय करण्याची संधी प्राप्त होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यादृष्टीने संवाद साधण्यास औपचारिक आणि अनौपचारिक पातळीवर सुरवात केली आहे. अर्थात, विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता कितीही प्रयत्न केले तरी व्यक्तिश: सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचणे अवघड आहे; पण आमच्याकडे असलेल्या "विद्यावाणी' या "कम्युनिटी रेडिओ'च्या माध्यमाचा या बाबतीत आम्हाला उपयोग झाला.

"प्रश्न तुमचे, उत्तर कुलगुरूं'चे हा उपक्रम महिन्यातून एकदा हाती घेतला जातो. विद्यार्थ्यांना शिक्षणविषयक माहितीची भूक असते. त्याचबरोबर शिकताना अनेक समस्या असू शकतात. विद्यापीठीय व्यवस्थेसाठी काही बाबी त्यांना शेअर कराव्याशा वाटतात. त्या दृष्टीने "विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ'च्या माध्यमातून ते संवाद साधतात. प्रश्न विचारतात, काही मुद्दे उपस्थित करतात. त्यांना मोकळेपणाने उत्तर देण्याचे काम या माध्यमातून करता येते. हा संपूर्ण कार्यक्रम विद्यापीठाच्या बेवसाइटच्या माध्यमातूनही प्रसारित केला जातो. त्यामुळे केवळ विद्यापीठ आवारातच नव्हे, तर आवाराबाहेर संपूर्ण कार्यक्षेत्रातील (पुणे जिल्हा तसेच, नाशिक आणि नगर जिल्ह्यांमधील) विद्यार्थीही हळूहळू यात सहभागी होऊ लागले आहेत. या विद्यार्थ्यांनाही बरेच काही सांगायचे असते, त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप काही आहे, असे यातून लक्षात आले. ही बाब खरोखरच नोंद घ्यावी अशी आहे. 

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आज आपल्याला ज्या विविध समस्या भेडसावतात, त्यात समानपणे आढळणारा एक धागा अगदी स्पष्ट दिसतो आणि तो म्हणजे संवादाचा अभाव. ते ओळखून त्या अभावाचा अडथळा दूर करण्यासाठी त्या त्या संस्थांच्या अध्यापक वर्गाने, संचालकाने पुढाकार घेतला तर बरेच प्रश्‍न सुटू शकतात किंवा त्यांची तीव्रता कमी होऊ शकते.

विद्यापीठ म्हणजे सर्वसाधारण समाजापासून काही तरी वेगळे, स्वतंत्रपणे करणारी संस्था, ही धारणा चुकीची आहे. त्यामुळेच विद्यार्थी आणि आम समाज, त्यातील सर्वसामान्य नागरिक हेदेखील विद्यापीठाशी संबंधित घटक आहेत, असे मानायला हवे. विद्यापीठे ही समाजाला उत्तरदायी असायला हवीत. त्यादृष्टीने आम्ही ज्या ज्या बाबतीत काही नवे पाऊल उचलणार आहोत, त्याविषयी सर्व संबंधितांना त्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असेल. उदाहरणार्थ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला "इन्स्टिट्यूशन ऑफ एमिनन्स'चा दर्जा मिळावा म्हणून प्रस्ताव सादर करत आहे. तो प्रस्ताव तयार करताना विद्यापीठाशी संबंधित सर्वच भागधारकांचा (प्राध्यापक, पालक यांच्यापासून ते उद्योग क्षेत्र, संशोधन संस्थांपर्यंत) सहभाग घेण्यात आला आहे. 

पुढच्या काळात प्राध्यापक, पालक, विद्यापीठाशी संबंधित संस्था, विद्यार्थी संघटना तसेच, इतरही घटकांसोबत अशा प्रकारे संवाद साधण्यासाठी "सोशल मीडिया'चा वापर करण्याची योजना आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापक व प्राचार्यांशी दोन महिन्यांतून एकदा "व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे संवाद साधला जाणार आहे. त्यावर कामही सुरू आहे. उद्देश एकच- विद्यार्थी व इतर घटकांशी संवाद वाढीस लागावा. संवाद-संपर्काचे सध्याचे युग आहे, असे म्हटले जाते ते या क्षेत्रात झालेल्या अफाट प्रगतीमुळे. त्यामुळेच परंपरागत विद्यापीठांनी या वेगाबरोबर राहाणे आवश्‍यक आहे. शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठीदेखील ते आवश्‍यक आहे. 
 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com