रब ने बना दी जोडी! (मर्म)

Marathi Article_Editorial Page_Anushka Virat wedding
Marathi Article_Editorial Page_Anushka Virat wedding

गेली चार-पाच वर्षे माध्यमांमधून वाजत गाजत असलेल्या विवाहाची खरीखुरी वाजंत्री अखेर इटलीत वाजली. आपापल्या क्षेत्रात चमकणाऱ्या सिताऱ्यांचे हे शुभमंगल माध्यमांनी उत्साहाच्या भरात अनेकदा उरकून टाकले होते. पाच वर्षे गॉसिप आणि अफवांची बरसात चालू होती. पण शेवटी याच माध्यमांचा ससेमिरा टाळण्यासाठी भारताचा क्रिकेट सितारा विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी इटलीतील सिएन्ना प्रांतातल्या एका डोंगराळ वनराईतील रिसॉर्ट निवडून तिथे एकमेकांना वरमाला घातल्या. क्रिकेट आणि चित्रपट हे भारतीयांचे जणू श्‍वास आणि उच्छ्वास असतात. त्या क्षेत्रात गाजणारे दोन चेहरे एकत्र येणार, या कल्पनेनेच अवघा भारत देश खुळा झाला होता. अखेर त्या उत्सुकतेला सोमवारी संध्याकाळी पूर्णविराम मिळाला. लग्नाच्या पत्रिकांपासून फोटोंपर्यंत सारे काही विराट-अनुष्का या जोडीनेच माध्यमांना पुरवले. त्यावरच चाहत्यांना समाधान मानावे लागले. सिएन्नामधील ज्या रिसॉर्टमध्ये ही शादी पार पडली, त्याच्या दोन किलोमीटरच्या परिघात माध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव होता. बातम्यांचा एकमेव स्रोत होता तो म्हणजे विराट आणि अनुष्काचे ट्‌विटर हॅंडल. तरीही हे लग्न बऱ्यापैकी गाजले आणि आणखी काही दिवस त्याचा कैफ टिकेल अशी चिन्हे आहेत. नवपरिणीत जोडप्यावर सध्या सोशल मीडियामधून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. 

परदेशात झालेल्या या लग्नाचे वऱ्हाडही मोजके आणि अगदी गुप्तपणे तिथे पोचलेले होते. भारतातल्या चाहते आणि बड्यांसाठी दिल्ली आणि मुंबईत लवकरच शाही स्वागतसमारंभ पार पडतील. तोपर्यंत या शुभेच्छांच्या जोरदार सरी सुरू राहतील. विक्रमवीर सचिन तेंडुलकरने शादीच्या समारंभातच ट्‌विटरवरून विराटला ""हॅपी वेडिंग लाइफ''साठी शुभेच्छा दिल्या, तेव्हा विराटनेही मुंडावळ्या दूर सारून त्याला ताबडतोब 'थॅंक यू सर, एनी टिप्स?' असा मजेदार सवाल केला. विराटला फलंदाजीच्या वेळोवेळी टिप्स देणारा सचिन संसाराच्या कुठल्या टिप्स विराटला देणार, हे अर्थात तूर्त गुलदस्तात आहे. योगायोग असा की अनुष्का शर्माचे हिंदी चित्रपटसृष्टीतले पदार्पण "रब ने बना दी जोडी' या चित्रपटाद्वारे झाले होते. विराट आणि अनुष्का ही जोडीदेखील 'रबने बनाई हुई'च आहे. 'नांदा सौख्य भरे' हेच त्यांना क्रिकेट आणि चित्रपटवेड्यांचे सांगणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com