नवे युग, नवा प्रश्‍न! (ढिंग टांग! )

Marathi Article_Editorial Page_British Nandi_Rahul Gandhi_President_Congress
Marathi Article_Editorial Page_British Nandi_Rahul Gandhi_President_Congress

बेटा : (उसळत्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...लो मैं आ गया! आय ऍम बॅक! 
मम्मामॅडम : (कौतुकानं पाहात) कित्ती गोड!! थांब, तुझी दृष्टच काढायला हवी! पिझ्झाचा तुकडा ओवाळून टाकते!! 
बेटा : (खुशीत आरशात बघत) मम्मा, टेल मी, आज मी कसा दिसतोय? 
मम्मामॅडम : (न कळून) नेहमीसारखाच!..स्मार्ट! का रे? 
बेटा : (अभिमानाने) अहमद अंकल म्हणाले की माझ्या चेहऱ्यावर नवतेज दिसू लागलं आहे!! नजरेत आत्मविश्‍वास आला आहे आणि बोलण्यात चातुर्यही!!..डू यू ऍग्री? 
मम्मामॅडम : (समाधानानं) अफकोर्स!! तुझ्या चेहऱ्यावर निराळंच तेज दिसायला लागलं आहे, हे अगदी खरं आहे! (जावळातून हात फिरवत) तुला आता खूप जबाबदारीनं वागायला हवं बेटा! 
बेटा : (निक्षून सांगत) मला आंघोळीला काढण्याचा तुझा आग्रह तू यापुढे सोडणार आहेस का? 
मम्मामॅडम : (समंजसपणे) तू आता एका ऐतिहासिक पक्षाचा पुढारी झालास! एका ऐतिहासिक खानदानाचा कर्ता पुरुष झालास! आता तुला उपदेश करायला कोणीही येणार नाही! तू जी वाट दाखवशील, त्या वाटेवरून आम्ही सगळे चालणार!! 
बेटा : (अविश्‍वासानं) याचा अर्थ माझं सगळे जण ऐकणार? 
मम्मामॅडम : (ठामपणाने) ऐकावंच लागेल त्यांना! 
बेटा : (दुप्पट अविश्‍वासानं) प्रियांकादीदीसुद्धा माझं ऐकणार? 
मम्मामॅडम : (कौतुकानं) मीसुद्धा तुझंच ऐकणार!! नाऊ यू आर द बॉस!! 
बेटा : (खुश होत) मी ह्याच दिवसाची वाट पाहात होतो!! 
मम्मामॅडम : (इमोशनल होत) मीसुद्धा बेटा!! 
बेटा : (काहीतरी आठवून) अहमद अंकलसुद्धा तेच म्हणत होते! ते म्हणाले, की गेली 19 वर्षं मी खुर्ची टाकून मॅडमच्या बंगल्याच्या गेटपाशी बसत होतो! उद्यापासून मी खुर्ची तुमच्या बंगल्याशी हलवतो आहे!! 
मम्मामॅडम : (समजून उमजून) आपल्या पक्षात आता तुझ्या नावाचं युग सुरू झालं आहे! 
बेटा : (चुटकी वाजवत) परवा गंमतच झाली मम्मा! मी हा असा गुजराथेत फिरत होतो! प्रवासात भूक लागली!! म्हटलं भूक लागली तर आता काहीतरी खायला हवं! तेवढ्यात मला एक ढाबा दिसला!! 
मम्मामॅडम : (शहारून) बाहेरचं असं काही खाऊ नये रे! बाधतं!! 
बेटा : (दुर्लक्ष करत) मी अचानक गाड्यांचा ताफा रोखला! कार्यकर्त्यांना म्हटलं मला पावभाजी हवी!! पाच मिनिटात माझ्यासमोर गरमागरम पावभाजी हजर!! आधी मी पावभाजी मागितली की अहमद अंकल शर्टाच्या खिश्‍यातून दोन मारी बिस्किटं काढून देत असत!! नाऊ माय पाव भाजी डेज आर हिअर!! हाहा!! 
मम्मामॅडम : (गंभीर होत) तुझ्यापुढे खूप अवघड आव्हानं आहेत, हे विसरू नकोस! हा आख्खा देश तुला योग्य मार्गावर आणायचा आहे!! कळलं? 
बेटा : (स्फुरण चढत) मम्मा, अब तुम देखना, मैं दुश्‍मन को कैसा पानी पिलाता हूं!! शत्रूला त्याच्याच भूमीत जाऊन परास्त करून येईन म्हंजे येईनच... ही माझी प्रतिज्ञा आहे, मम्मा!! पूर्वीसारखा उरलो नाही मी!! नाही त्या कमळवाल्यांना गुजरातेत अस्मान दाखवलं तर नावाचा गुजराथी नाही!! 
मम्मामॅडम : (सावधपणाने) कशाला उगीच अशी अवघड प्रतिज्ञा करायची! त्या मेल्यांना आपल्या भूमीवर हरवलंस तरी चालेल हो!! 
बेटा : (आरशापुढे उभं राहून भाषणाच्या पोजमध्ये) देखो भय्या, हम प्यारसे जीतेंगे! कोई कितना भी कडवा बोलें, हम प्यारसेही बात करेंगे! क्‍योंकी यही हमारी संस्कृती है!! हो की नाही मम्मा? 
मम्मामॅडम : (होकार देत) अगदी खरं! 
बेटा : (गडबडीनं) बाय द वे, माझा एकमेव आणि मोस्ट इंपॉर्टंट प्रश्‍न आहे, त्याचं उत्तर दे! त्याच्यावर आपल्या देशाचं भवितव्य अवलंबून आहे!! 
मम्मामॅडम : (किंचित हसून) विचार! 
बेटा : (अतिशय गंभीर आणि पोक्‍त चेहरा करत) माझा सुट्‌टीचा अर्ज कोण मंजूर करणार आहे आता? 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com