ते लखलखते दिवे (पहाटपावलं)

Marathi Article_Editorial Page_Sheshrao Mohite_Positive Thoughts
Marathi Article_Editorial Page_Sheshrao Mohite_Positive Thoughts

नागर, ग्रामीण असे काही जीवनाचे वेगवगळे भाग असतात, याचा तेव्हा आपणास गंधही नसतो, जेव्हा आपण गुऱ्हाळातील गूळ ट्रकमध्ये भरून प्रथमच तो विकायला दूरच्या शहरांतील गूळ मार्केटमध्ये जायला निघतो. आपलं गाव, आपलं शेत आणि आपली शाळा हेच तोवरचं आपलं जग असतं. अशा या गावात एखाददिवशी चित्रकलेच्या जादा तासामुळे गावाकडं यायला उशीर झाला अन्‌ गच्च अंधारात वाट चुकून गेली असताना वाटेतल्या झाडावर, अंग चोरून बसलेला एखादा रानपक्षी पंख फडफडवीत उडून गेला म्हणजे किती दचकायला व्हायचं! गावात-घरात ऐकलेल्या भयकथा सगळ्या एकामागोमाग आठवत जायच्या अन्‌ आपण दप्तर पोटाशी घेऊन धूम पळत सुटायचो. अगदी गावाच्या जवळ आलं तरी कुठं एखादा लुकलुकणारा दिवा सोडला, तर संपूर्ण गाव अंधारात गुडूप झालेलं असायचं. 

घरातील पहिल्या-दुसऱ्या पिढीतील आपण अक्षरांची ओळख झालेले. वय लहान असलं तरी, आजूबाजूच्या व्यवहारांनी कामापुरतं शहाणपण आलेलं. शेतकऱ्याघरी जन्मलेली मुलं, जन्मल्यापासून त्यांच्यावर जे व्यवहारज्ञानाचे संस्कार होत असतात, ते कुठल्याही पाठ्यपुस्तकातील ज्ञानापेक्षा वरचढ असतात. त्यांच्या तोवरच्या ही आयुष्यात उद्‌भवलेले प्रसंग आणि त्यातून घेतलेला अनुभव अतर्क्‍य कोटीतला आणि बाह्य जगाला आश्‍चर्य वाटेल असाच असतो. अशा या अनुभवांच्या जोरावर खिशात गोट्या आणि भोवरा ठेवून हिंडण्याच्या वयात, तीच अर्धी खाकी चड्डी घालून तुम्ही जेव्हा गुळाने भरलेल्या ट्रकच्या टपावर बसून शहराकडे निघता, तेव्हा त्या शहरापासून पंचवीस-तीस किलोमीटर अंतरावरील टेकडी उतरताना, त्या शहराचे जे लखलखते दर्शन होते, तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा झालेल्या त्या झगमगत्या प्रकाशाने तुमचे डोळे दिपून जातात. 

एकाच स्थळकाळात वावरत असतानाही आपल्या भोवतीचा अंधार आणि तो दूरवरचा डोळे दिपविणारा प्रकाश, याने जो कल्लोळ तुमच्या मनात उठतो, तो केवळ एका रात्रीच्या प्रवासात घडून गेलेला एक क्षणिक साक्षात्कार उरत नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणारा तो क्रांतिकारी क्षण ठरतो. आजवर आपल्या मनाला अजिबात स्पर्शून न गेलेली आपल्या जगण्याची आणि त्या लखलख दिव्यांच्या सान्निध्यातील जगण्याची तुलना सुरू होते. हे वैभव खेड्यात का अवतरू नये? अन्‌ आजवर ते का अवतरलं नाही? या प्रश्‍नाचं मूळ बीज तेव्हा तुमच्या मनात पडतं, अन्‌ तेच तुमच्या आयुष्यातील अनोख्या, काहीशा साहसी, पण सुंदर प्रवासास निघण्यासाठी प्रवृत्त करतं. ते उजेडाचं आयुष्यात पहिल्यांदाच घडलेलं साक्षात दर्शन, तुम्हाला तो उजेड आपल्या गावाकडं आणण्याचं आव्हान देतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com