प्रचारयुद्धातील 'परकी हात' (अग्रलेख)

Marathi Article_Editorial_Rahul Gandhi_Prime minister Narendra Modi_Gujrat Elections
Marathi Article_Editorial_Rahul Gandhi_Prime minister Narendra Modi_Gujrat Elections

अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीचा प्रचार अयोध्येतील 'बाबरीकांडा'च्या पंचविसाव्या स्मृतिदिनाच्या दुसऱ्या दिवशी संपला, तेव्हा राममंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेमुळे भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात अलगद येऊन पडला होता. आता मंगळवारी या निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम फेरीचा प्रचार संपत असताना, या निवडणुकीत पाकिस्तानलाही गुंतवण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला. त्यामुळे भाजप व मोदी यांना दिल्लीच्या तख्तावर नेऊन बसवणारे 'गुजरात मॉडेल', मोदींचे 'होमपीच' असलेल्या याच राज्यातील विकास, बेरोजगारी आणि अन्य प्रश्‍न थेट सीमेपलीकडे भिरकावले गेले आहेत! या प्रचारातील भाजपची सारी भिस्त ही 'मोदी' याच एकमेव अस्त्रावर होती आणि मोदी यांनीही ती जबाबदारी अडीच-तीन डझन सभा घेऊन, पार पाडण्याचा प्रयत्न जोमाने केला. मात्र, त्यांनी आपल्या भाषणात विकासाचा मुद्दा अपवादानेच हाताळला आणि सारे लक्ष हिंदुत्व, अयोध्या, गोरक्षण तसेच पाकिस्तान या आपल्या 'शत्रू' राष्ट्राशी असणारे संबंध यावरच केंद्रित केले होते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी केलेल्या 'गुजरातेतील भाजपची 22 वर्षांची राजवट उलथून पाडण्यासाठी कॉंग्रेस पाकिस्तानची मदत घेत आहे,' या आरोपाला थेट माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी दिलेल्या तोडीस तोड उत्तर दिले. एरवी 'मौनी' अशी प्रतिमा झालेल्या मनमोहनसिंग यांनी कडक शब्दांत दिलेल्या प्रत्युत्तराने 'प्रचारयुद्धा'ची अखेर कमालीच्या तापलेल्या वातावरणात झाली. 'मोदी यांनी ही निवडणूक स्वसामर्थ्यावर जिंकावी, आम्हाला त्यात गुंतवू नये!' अशी प्रतिक्रिया पाकिस्ताननेही व्यक्त केली. एखाद्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शेजारी राष्ट्राचा विषय अशा रीतीने उपस्थित होण्याची ही दुर्मीळ घटना म्हणावी लागेल. 

अर्थात, पाकिस्तानचा मुद्दा भाजपच्या हाती देण्याचे सारे 'श्रेय'ही त्यापूर्वी मोदी यांची 'नीच' अशी संभावना करणारे मणिशंकर अय्यर यांचेच आहे, ही बाब नाकारता येणार नाही. त्यांनी केलेल्या मोदी यांच्या या संभावनेनंतर अय्यर यांची हकालपट्टी करून, कॉंग्रेसने या वादावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केलाही. मात्र, त्यानंतर अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीला काही माजी लष्करी अधिकाऱ्यांबरोबरच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे उपस्थित असल्याचे वृत्त आले आणि लगोलग मोदी यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ सूत्रधार अहमद पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री करण्याचा कट या बैठकीत शिजल्याचा 'गौप्यस्फोट' आपल्या आक्रमक शैलीत करत, कॉंग्रेसला सुळावर चढवण्याचा प्रयत्न केला. त्यावर 'पंतप्रधान पदासारख्या जबाबदार पदावर असलेल्या मोदी यांनी तद्दन खोटे वक्‍तव्य आणि कंड्या पिकवणे याबद्दल माफी मागावी,' अशी मागणी डॉ. सिंग यांनी अत्यंत तिखट शब्दांत केली आणि त्यामुळे भाजप आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने मोदी यांच्या पाठराखणीस उभे राहावे, यात नवल ते काहीच नव्हते! मोदी यांच्या या आरोपामुळे गुजरातच्या निवडणुकीला अखेरच्या टप्प्यात वेगळाच रंग प्राप्त झाला असून, त्याचबरोबर अनेक प्रश्‍नही उपस्थित झाले आहेत. त्याची उत्तरे पंतप्रधान या नात्याने मोदी यांच्याकडून अपेक्षित आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या पूर्वापार वकिली बाण्याला जागून 'डॉ. मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांना भेटण्याचे कारण नव्हते!' असा सूर लावला आहे. पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र आहे, त्यामुळे माजी पंतप्रधानांनी अशी भेट घ्यायला नको होती, असे त्यांचे म्हणणे आहे. मग, दस्तुरखुद्द मोदी हे पाकिस्तानात विना आमंत्रण अचानक जाऊन नवाज शरीफ यांची गळाभेट का घेऊन आले? शिवाय, माजी पंतप्रधान, माजी उपराष्ट्रपती पाकिस्तानच्या मदतीने गुजरात जिंकण्याचा आणि अहमद पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्याचा काही कट रचत असतील, तर ती बाब अतिशय गंभीर आहे आणि त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. त्याचवेळी आता गुजरातेत मोदी यांचा नव्हे, तर पाकिस्तानचा शब्द चालतो, असाही सूर मोदी यांच्या या आरोपातून निघू शकतो. तो मोदी व भाजप यांना मान्य आहे काय? 

एक मात्र झाले, मोदी यांनी आपल्या पोतडीतून काढलेल्या या नव्या वादामुळे आधीच वाद-प्रवादांनी गाजलेली ही निवडणूक एका वेगळ्याच स्तराला जाऊन पोचली आहे. एकीकडे पाटीदार आंदोलनात पडलेली कथित फूट, तर दुसरीकडे हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवानी या पाटीदार, ओबीसी आणि दलित युवकांनी भाजपच्या कारभाराच्या विरोधात उठवलेले रान, यामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत कोणताही ठोस अंदाज बांधणे कठीण झाले आहे. अशा वेळी राहुल गांधी यांच्या आक्रमक प्रचारामुळे गेली तीन वर्षे ढेपाळलेल्या कॉंग्रेसमध्ये पुनःश्‍च एकवार जान आली आहे. गुजरात राखण्यात भाजपला यश आलेच, तरीही कॉंग्रेसच्या दृष्टीने ही मोठीच देन आहे. अर्थात, गुजरातच्या मतदारांच्या मनात काय आहे, ते कळण्यासाठी पुढच्या सोमवारच्या मतमोजणीपर्यंत वाट बघावी लागणार, हेच खरे! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com