आंदोलन! (एक पारंपरिक रिपोर्ताज...)

dhing-tang
dhing-tang

अकोल्यात गडबड सुरू आहे, असं कळलं म्हणून तिथल्या एका कार्यकर्त्याला फोन केला. तिथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलं असून, सरकारी यंत्रणा अजिबात प्रतिसाद देत नाही, असं त्याचं म्हणणं. सगळं ऐकून घेतलं. वाटलं, एकदा प्रत्यक्ष जाऊन पाहिलं पाहिजे. स्वारगेटवरून रात्री सव्वाआठची बस आहे, असं कळलं. बस डेपोवरचा हमाल ओळखीचा निघाला. तो म्हणाला, ""साहेब, ओळखलं का?'' 
""काय रे इथे काय करतोयस?'' त्याला हसून विचारलं. तो काही बोलला नाही. त्याच्या डोक्‍यावर भलीमोठी बॅग होती. म्हटलं, किती हे वजन? वाईट वाटलं. मनात म्हटलं, बाबांना सांगितलं पाहिजे. 
रात्री बसमध्ये डोळा लागला. सकाळी उठलो तर अकोला आलं होतं. रस्त्यातून बरेच लोक कामावर निघाल्यासारखे चालले होते. एका किडकिडीत तरुणाला हटकलं. त्याच्याकडून कळलं की पोलिस ग्राऊण्डवर आंदोलन चाललं आहे. आम्ही सगळे तिकडेच निघालोय असं तो म्हणाला. मी विचारलं, बाप रे. पायीच? मग म्हटलं, चला, पायी तर पायीच. ह्यांचं होईल तेच आपलंही. तेवढ्यात पायाला थंडीनं जळवात झालाय, ह्याची जाणीव झाली. त्या तरुणाकडे बघितलं. त्यानं एक ट्यूब दिली. ती तळपायाला लावली तर कसली आग झाली. मग बघितलं तर ती चुन्याची ट्यूब होती. तसाच लंगडत आंदोलनाच्या ठिकाणी पोचलो. 
ैमैदानावर खूप गर्दी होती. गर्दीच्या मधोमध खुर्चीत यशवंतजी सिन्हा बसलेले. हातातल्या मोबाइलशी चाळा करत "मंत्रिपदाच्या बाता कुणाला सांगता? माझा मुलगाही मंत्री आहे' असं ते तावातावाने सांगत होते. माझ्याकडे बघून मनमोकळं हसले. मीसुद्धा मग शबनम बॅग ठेवून त्यावर बसकण मारली. एकही प्रश्‍न न विचारताच ते उत्तरं द्यायला लागले. म्हणाले, ""शेतकऱ्यांचे हाल मला पाहवत नाहीत. नोटाबंदी आणि जीएसटीनं आधीच जीव बेजार झालेला. नाफेडनं खरेदीही थांबवली आहे. हमीभाव नाही. शेतकऱ्यांनी कुणाकडे बघायचं? राहावलं नाही म्हणून तडक उठून अकोल्यात आलो.'' 
मी विचारलं, ""किती दिवस मुक्‍काम?'' 
ते म्हणाले, ""मुख्यमंत्र्यांचा फोन आला की निघेनच... मघाशीच गांधीजींचे नातू येऊन गेले. वरुण (गांधी)सुद्धा येतो म्हणालाय. अरुण (शौरी) येतील इतक्‍यात...'' 
""वा, वरुण, अरुण... सगळेच तरुण आहेत की!'' बाणाच्या "ण'वर हसून मी म्हणालो. तेसुद्धा हसले. पण नाराजी डोळ्यांत दिसत होती. मग मी टाळीसाठी पुढे केलेला हात मागे घेतला. "चहा घेणार का?' मी विचारलं. त्यावर "चहाचं नाव काढू नका. चहावाल्यानंच आमच्यावर ही वेळ आणली' असं ते म्हणाले. सगळे हसले. त्यांनी पुढे केलेल्या हातावर मात्र मी टाळी दिली. मनात म्हटलं, कुणी मागितली तर टाळी देणं हीच आपली संस्कृती आहे. 
शेजारीच पोलिस स्टेशन होतं. तिथले एक बनकर नावाचे अधिकारी भेटले. माणूस चांगला वाटला. म्हणाले, ""वाईट वाटतं आम्हालासुद्धा. पण काय करणार? दिल्लीचे एवढे मोठे नेते... पण रात्रभर पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या देऊन बसलेले. आमच्याकडे त्यांना द्यायला गादीसुद्धा नव्हती...'' मी म्हटलं, ""पांघरुणाचं काय?'' तर ते म्हणाले की ""त्यांनी आणलंय सगळं बरोबर.'' अकोल्यात थंडी बरीच पडते. इतकं की मागल्यावेळेला एकदा सकाळी स्कूटरवरून निघालो तो थेट शेगावपर्यंत जावं लागलं. पाय आखडल्यानं ब्रेकच दाबला जात नव्हता. ""तुमची इथं बदली कधी झाली?'' बनकरांना सहजच विचारलं. ते म्हणाले, ""छे, बदली कुठे? मी कधीच रिटायर झालो.'' मुख्यमंत्र्यांच्या फोनसाठी सगळे ताटकळत होते, आणि तो काही केल्या येत नव्हता. 
तेवढ्यात "आला, आला' अशी हाकाटी झाली. यशवंत सिन्हाजी कोणाशी तरी फोनवर जोराजोरात बोलत होते. सगळीकडे विजयाचा जल्लोष झाला. मी एका तरुणाला विचारलं, ""काय झालं?'' 
तो म्हणाला, ""शूटिंग चाल्लं गा... शुत्रुघन शिन्ना गावात आला नंऽऽ...'' 
म्हटलं, चला, आता परत निघावं. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com