कटकट 

sunshine
sunshine

जुन्या काळची गोष्ट... म्हणजे जेव्हा बस, गाड्या, वाहने नव्हती. लोक घोड्यावरून ये-जा करीत. विहिरीवर पंप नव्हते. राहटगाडगे ओढून बैल पाणी शेंदत, त्या काळातली. एक प्रवासी घोड्यावर बसून निघाला. उन्हाळ्याचे दिवस होते. घोडा दमला होता. प्रवासीही दमला होता. गावात रहाटगाडगे पाहून त्याने घोडा तिकडे वळवला. शेतासाठी पाटातून पाणी वाहत होते. आपणही पाणी प्यावे, ताजेतवाने व्हावे, घोड्याला पाणी पाजावे, मग पुढे जावे अशा विचाराने त्याने रहाटगाडग्याजवळ घोडा आणला. पाण्याचा प्रवाह सुरू होता. रहाटगाडग्याचे चक्र "टक्‌ टक्‌' आवाज करीत फिरत होते. भरलेले घट रिकामे होत होते. रिकामे भरत होते. पाणी शेतीकडे वाहत होते. 

"टक्‌ टक्‌' आवाजाकडे घोड्याने कान टवकारले. तो पाणी प्यायचे सोडून त्या आवाजकडेच पाहू लागला. जणू त्या आवाजाला तो बांधला गेला. मान खाली घेईच ना. घोडेस्वार विस्मित झाला. कसे करावे? तो ओरडला, ""अरे, हा टक्‌ टक्‌ आवाज बंद करा. घोडा बुजतोय. पाणी पीत नाहीये. आवाज बंद करा.'' 
त्याच्या ओरडण्याला प्रतिसाद देऊन रहाटगाडगे थांबले. टक्‌ टक्‌ आवाज बंद झाला. पण आवाज बंद झाला, तसे पाणी येणे बंद झाले. घोड्याने मान खाली घेतली, पण पाणीच बंद. ""अरे, पाणी सुरू करा.'' घोडस्वार ओरडला. तसे पुन्हा रहाटगाडगे सुरू झाले. टक्‌ टक्‌ आवाज सुरू झाला. घोडा बुजला आणि त्या आवाजाकडे पुन्हा टक लावून पाहू लागला. पाणी वाहत होते, पण घोडा मान खाली घेत नव्हता. 

""अरे, हा आवाज बंद करा,'' घोडेस्वार पुन्हा ओरडला. पुन्हा तेच. आवाज बंद तर पाणी बंद. पाणी सुरू करावे, तर आवाज सुरू. आवाज झाला तर घोडा बुजतो. आवाज बंद करावा, तर पाणी बंद होते. समस्याच झाली. विहिरीच्या पारावर बसलेल्या वृद्ध शेतकऱ्याला घोडेस्वाराने विचारले, ""अहो, आता काय करू? घोड्याला पाणी कसे देऊ?'' चेहऱ्यावरल्या सुरकुत्यांमधून हसत म्हातारा म्हणाला, ""घोड्याला टक्‌ टक्‌ आवाज सुरू असताना न बुजता पाणी पिण्याची सवय लावा. हाच उपाय आहे.'' 

टक्‌ टक्‌ला उलट केले, तर "कटकट' असा शब्द तयार होतो. आज अनेक कटकटींना तोंड देता देता आपण मेटाकुटीस येतो. वैतागून जातो. घोड्यासारखी स्थिती होते. ते धरावे तर हे सुटते, हे धरावे, तर त्याकडे लक्ष देता येत नाही. उपाय काय? "कटकट'कडे दुर्लक्ष करून आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करणे हाच उपाय! कटकट असणारच. संसार म्हटला की कटकट आली. गाडी चालवावी म्हटले की धूर निघणार. धूर बंद करायचा तर गाडी बंद होणार. काय करावे? अनावश्‍यक गोष्टीकडे दुर्लक्ष करून आवश्‍यक गोष्टींवर एकाग्र होण्याची सवय लावायला हवी. हाच उपाय! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com