स्थित्यंतर; की  मळलेलीच वाट? 

RAHUL GANDHI
RAHUL GANDHI

कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी हे भाजप व नरेंद्र मोदी यांच्यापुढे पुढील दोन वर्षांत आव्हान उभे करू शकतात काय, हा कळीचा प्रश्‍न आहे आणि कॉंग्रेसचे राजकीय अस्तित्व टिकण्याच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा आहे. 

कॉंग्रेस या देशातील सर्वांत जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे 1929 मध्ये मोतीलाल नेहरू यांनी आपले पुत्र जवाहरलाल नेहरू यांच्या हाती सोपवल्यानंतर जवळपास नऊ दशकांनी पक्षाची सूत्रे त्याच घराण्यातील सोनिया गांधी यांनी राहुल यांच्या हाती सोपवल्याने कॉंग्रेसच्या वाटचालीतील आणखी एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. अर्थात, या प्रदीर्घ कालावधीत नेहरू-गांधी घराण्याने कमालीचे आघात सोसले. नेहरू यांच्या हयातीतच त्यांच्या कन्या इंदिरा या 1959 मध्ये कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या आणि पुढे इंदिराजींच्या हत्येनंतर कॉंग्रेस धुरीणांनी 1985 मध्ये राजीव यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवली. मात्र, 1991 मध्ये त्यांचीही अमानुष हत्या झाली, तेव्हाच पक्षाची धुरा सांभाळण्याचे साकडे सोनिया यांना कॉंग्रेसजनांनी घातले होते. त्यांनी त्याला नकार दिला. 

मात्र, पुढे 1998 पक्षाची दुरवस्था बघून कॉंग्रेसजनांच्या मागणीला त्यांनी होकार दिला आणि अशक्‍यप्राय अशा अनेक गोष्टी प्रत्यक्षात आणून दाखवल्या. सोनिया अध्यक्ष होताच, ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा, तारिक अन्वर आदी पक्षातून बाहेर पडले, तरी सोनियांनी पक्ष सावरला आणि पुढे थेट पवारांच्या घरी जाऊन व त्यांच्यासारख्या अनेक सामर्थ्यशाली नेत्यांना सोबत घेऊन, त्यांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा पराभवही करून दाखवला. एवढेच नव्हे तर त्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदही नाकारले. मात्र, त्यांच्या 19 वर्षांच्या अध्यक्षपदाच्या प्रदीर्घ कारकिर्दीच्या अखेरीस, त्यांनी ज्या जातीय आणि धार्मिक शक्‍तींचा पराभव घडवून आणला होता, त्याच शक्‍ती अधिक जोमाने फोफावल्याचे त्यांना बघावे लागले. स्वत: पंतप्रधान होणे शक्‍य असतानाही त्यांनी डॉ. मनमोहनसिंग यांची पंतप्रधानपदी केलेली निवड ही दहा वर्षांच्या राजवटीच्या पहिल्या टप्प्यात देदीप्यमान ठरली; मात्र "यूपीए'च्या दुसऱ्या सत्रात भ्रष्टाचार व गैरव्यवहाराची प्रकरणेच कॉंग्रेसला पराभवाच्या गर्तेत बुडवणारी ठरली, यात शंका नाही. 

सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले, तेव्हाही देशात भाजपचे राज्य होते आणि आता राहुल ती धुरा खांद्यावर घेत असतानाही केवळ भाजपचेच नव्हे, तर नरेंद्र मोदी यांचे राज्य आहे! परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे, तो त्यामुळेच आणि केवळ कॉंग्रेसचाच विचार करायचा झाला, तर पक्ष आपल्या 132 वर्षांच्या इतिहासात प्रथमच पुरता कोलमडून पडला आहे. राहुल यांच्यापुढे आव्हान आहे, ते मोदी अप्रत्यक्षरीत्या खतपाणी घालू पाहत असलेल्या उन्मादी धार्मिक शक्‍तींचेच नव्हे, तर मोदी यांच्यासारख्या वक्‍तृत्वशैलीची आगळीवेगळी देणगी लाभलेल्या नेत्याचे. सत्तेसाठी कोणत्याही टोकाला जाणाऱ्या या राजकीय आव्हानाचा खंबीरपणे मुकाबला करताना राहुल यांची कसोटी लागणार आहे. त्याचे कारण म्हणजे सोनियांनी अध्यक्षपद स्वीकारले, तेव्हा अस्तित्वात नसलेला "सोशल मीडिया' आज अक्राळविक्राळ स्वरूप धारण करून मोदी यांच्या पाठीशी आहे आणि त्यावरून खऱ्या-खोट्या वार्ता पसरवल्या जात आहेत. गुजरातेत कॉंग्रेसला यश मिळाले तर वातावरण पालटून जाईल. मात्र, तिथे पराभव पदरी आला तरी मोदी यांच्या "होम पीच'वर राहुल यांनी दिलेल्या लढतीचे मोल कमी होत नाही. नववर्षांत प्रथम कर्नाटक आणि पुढे राजस्थान, तसेच अन्य राज्यांत निवडणुका आहेत. त्यामुळे राहुल यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक संधी आहे. 

राहुल यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर केलेले भाषण त्यामुळेच महत्त्वाचे आहे. भले त्यांनी गुजरातेत "सॉफ्ट हिंदुत्वा'ची भूमिका घेतली असली, तरी त्यांची सर्वसमावेशक प्रवृत्ती या भाषणांत लपून राहिलेली नाही. या पुढील काळातही मोदी यांच्या भाषणबाजीला उत्तर देण्यासाठी त्यांना ठोस मुद्दे मांडावे लागतील, तसेच पक्षकार्यकर्त्यांना नवा कार्यक्रम द्यावा लागेल. पर्यायी कार्यक्रम मांडून जनतेचा विश्‍वास पुन्हा संपादन करावा लागेल. सोनिया गांधी या यापुढेही "यूपीए'च्या अध्यक्षपदी राहणार असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ राहुल यांना मिळेलच. त्याचबरोबर राहुल यांना राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांनाही सोबत घ्यावे लागेल. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना राजकारणांत पूर्ण वेळ झोकून द्यावे लागेल. तसे करावयास ते तयार असल्याचे गुजरात प्रचारमोहिमेतून दिसून आलेच होते. तीच धडाडी त्यांना पुढची दोन वर्षे दाखवावी लागेल. 

अन्यथा, त्यांचे अध्यक्षपद हे केवळ वारसाहक्‍कानेच आले, या भाजपच्या टीकेवर शिक्‍कामोर्तब होईल. राहुल यांनी स्तुतिपाठकांच्या विळख्यातून बाहेर पडून कर्तबगार व तरुण नेत्यांना बरोबर घेतले, तर आता गुजरातच्या प्रचारामुळे कॉंग्रेसमध्ये आलेली जान पुढेही कायम राहू शकते. पण हे काम सोपे नाही. तेव्हा मोदी यांच्या राजवटीत नाराज असलेले अनेक घटक म्हणजेच दलित, मुस्लिम, आदिवासी यांना सोबत घेऊन राहुल हे भाजप व मोदी यांच्यापुढे दोन वर्षांत आव्हान उभे करू शकतात काय, हा कळीचा प्रश्‍न आहे आणि कॉंग्रेसचे राजकीय अस्तित्व टिकण्याच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com