रिटायरपर्व! 

PNE17N20736
PNE17N20736

स्थळ : मातोश्री प्यालेस, वांद्रे. 
वेळ : जवळ येऊन ठेपलेली! 
काळ : वेगात पुढे चाललेला! 
प्रसंग : योग्य वेळेची वाट पाहण्याचा. 
पात्रे : अर्थात वाट पाहणारी!! 

......................................... 
विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर, बॅब्स...मे आय कम इन? 
उधोजीसाहेब : (करवादत) कशाला? नको!! मी टीव्ही बघतोय!! 
विक्रमादित्य : (हाताल्या वहीत बघत इंटलेक्‍चुअल स्टायलीत)...जस्ट एक क्‍वेरी होती!! 
उधोजीसाहेब : (खवळून) माझी पण एक क्‍वेरी आहे!! (दात ओठ खात) एका वर्षात सत्ता सोडू असं कशाला एकदम डिक्‍लेर केलंस? हे बघ, त्या पोटावळ्या पत्रकारांनी बातम्या चालवल्यायत किती!! आपण असं बोलू नये एकदम! तू आधी पॉलिटिक्‍स शिकून घे पाहू!! 
विक्रमादित्य : (खूश होत) हाहा!! मला सेंच्युरी मारायची होती!! तुम्ही सत्त्याण्णव वेळा म्हटलंत, मग गप्प झालात! म्हटलं नर्व्हस नाइन्टीजमधून तुम्हाला बाहेर काढलं पाहिजे!! मारली एक फोर!! हाहा!! 
उधोजीसाहेब : (मान हलवत) फोर कसली मारतोस! मधल्यामध्ये माझी विकेट गेली!! कधी समजणार तुला पॉलिटिक्‍स देव जाणे!!.. तू शिकून घे बरं भराभर!! 
विक्रमादित्य : (नाराजीने) तुम्ही म्हटलेलं चालतं, ऑम्ही म्हटलं तर...ओसो कॉय हो बॅब्स? मी तुमचीच लाइन तर चालवत होतो!! मी मिलिंदकाकाला विचारलं की ""कॅक्‍स, आपण अल्टिमेटली पाठिंबा कधी काढतोय?' तर तो माझ्या डोक्‍यावर टप्पल मारून म्हणाला, ""नेक्‍स्ट इयर नक्‍की हं!'' तेच तर मी सांगितलं!! 
उधोजीसाहेब : (कपाळाला हात लावत) अरे, बाबा, ते त्याचं पॉलिटिक्‍स आहे!! तू आधी हे सगळं भराभर शिकून घे बघू!! इतरांची मुलं बघ, कशी धडाधड पुढे यायला लागली!! इथंही हल्ली कांपिटिशन वाढलीये हं!! 
विक्रमादित्य : (वहीवर पेन आपटत) हे काय...पॉलिटिक्‍स तर स्टडी करतो आहे!! आधी मी आयपॅडवर कविता करायचो! मग ट्‌विटर ट्‌विटर खेळायला शिकलो!! आता पॉलिटिक्‍स शिकतोय!! (एकदम आठवून) बॅब्स...मला सांगा, एग्झिट पोलबद्दल तुमचं काय मत आहे? 
उधोजीसाहेब : (पोलिटिकल उत्तर देत) आपल्या पक्षाच्या बाजूनं एग्झिट पोलचा निकाल असेल तर माझा त्यावर विश्‍वास आहे!! विरुद्ध पार्टीच्या बाजूने असेल तर मुळीच नाही!! उदाहरणार्थ, गुजरातमधलं एग्झिट पोल आपल्याला आज्जिबात पटलेलं नाहीत!! थापा मारतात हे च्यानलवाले!! 
विक्रमादित्य : (वहीवर टिपून घेत) एग्झिट पोल म्हणजे म्हंजे नेमकं काय? 
उधोजीसाहेब : (जरा विचार करून) तो ना, एक कार्यक्रम असतो! न्यूज च्यानलवरचा!! 
विक्रमादित्य : (वहीवर पेन आपटत) प्लीज एक्‍सप्लेन!! 
उधोजीसाहेब : (आणखी विचार करत) अंऽऽ...असं बघ की, काही लोकांना अजिबात उद्योग नसतो!! मग इलेक्‍शननंतर ते लोकांना विचारत फिरतात की बुवा तुम्ही कोणाला मत दिलंत? त्याचा डेटा गोळा करून एकत्र करून त्याची टक्‍केवारी काढली की झालं एग्झिट पोल!! 
विक्रमादित्य : (आश्‍चर्यानं) ओ, आय सी...पण ते खरं असतं? 
उधोजीसाहेब : (एक पॉज घेत) महाबळेश्‍वरला आपण गेलो होतो ना आत्ताच...तिथं एक बाजारात पोपटवाला बसला होता आठवतंय? 
विक्रमादित्य : (आठवून) हां हां!! आठवतोय की!! तो पोपट त्याच्या पुढ्यातली कार्ड चोचीनं ओढायचा!! त्यावर भविष्य लिहिलेलं असायचं!! तुमचं कार्ड ओढलं तर त्यावर- 
उधोजीसाहेब : (घाईघाईने वाक्‍य तोडत)...त्या पोपटाचं भविष्य आणि एग्झिट पोल ह्यात काहीही फरक नाही!! ओके? जा आता!! 
विक्रमादित्य : (वहीत टिपण करत) हं...आणखी एकच प्रश्‍न विचारायचाय!! 
उधोजीसाहेब : (जमेल तितका संयम राखत) पटकन विचार आणि जा!! मी बिझी आहे रे!! 
विक्रमादित्य : (दाराशी जाऊन उभे राहात) टीव्ही तर बघताय...बिझी कसले? माझा प्रश्‍न हा की....तुम्ही...तुम्ही..कधी होणार रिटायर? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com