बहुसांस्कृतिकतेसाठी हव्या मातृभाषा

बहुसांस्कृतिकतेसाठी हव्या मातृभाषा

‘युनेस्को’ने १९९९मध्ये २१ फेब्रुवारी हा ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानमध्ये बंगाली भाषकांच्या गळचेपीविरुद्ध तिथल्या सरकारविरुद्धच्या चळवळीत खरेतर या दिनाची बीजे रोवली आहेत. पाकिस्तानमध्ये तेव्हा उर्दू ही एकमेव राष्ट्रीय भाषा होती. ढाका विद्यापीठातील विद्यार्थी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी कायदा झुगारत २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या आंदोलनाचा परमोच्च बिंदू गाठला. भाषेच्या सन्मानासाठीच्या या आंदोलनात अनेक विद्यार्थ्यांनी बलिदान दिले. अखेर पाकिस्तानने २९ फेब्रुवारी १९५६ रोजी बंगालीला देशाच्या दुसऱ्या अधिकृत भाषेचा दर्जा दिला. तेव्हापासून बांगलादेशमध्ये २१ फेब्रुवारी  ‘हुतात्मा दिन’ म्हणून साजरा होतो. आज अवघे जग १९वा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करत आहे. या दिनानिमित्त युनेस्कोच्या महासंचालकांनी विशेष संदेश दिला असून, भाषा ही संवादाच्या पलीकडेही खूप काही असते. आपण जोपासत असलेली मूल्ये, श्रद्धा आणि ओळख हे सगळे भाषेत सामावलेले असते, असे म्हटले आहे. मातृभाषा आपल्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने ती स्पष्टपणे भावनात्मक बाब आहे. मातृभाषेमुळे आपण भावना व कल्पना परिणामकारकरीत्या व्यक्त करू शकतो. बंधुत्व आणि समूहाच्या अस्मितेला मातृभाषाच खतपाणी घालते. आपण मातृभाषेत आपले विचार अधिक प्रभावीपणे मांडू शकतो. प्राथमिक शिक्षण मातृभाषेमधून झालेली मुले अधिक चांगल्या पद्धतीने शिकतात, असेही निष्पन्न झाले आहे. 

भाषेचे जतन हे संस्कृती, कलांच्या जतनाशी, तसेच बौद्धिक वारशाशीही अनिवार्यपणे जोडलेले आहे. वसाहतवाद आणि त्यानंतरच्या जागतिकीकरणामुळे अनेक भाषिक गटांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. दर दोन आठवड्यानंतर जगातील एक भाषा नाहीशी होते. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १६ मे २००७ला एका ठरावाद्वारे सर्व राष्ट्रांना जगभरातील लोकांकडून वापरल्या जाणाऱ्या भाषांचे जतन आणि संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. याच ठरावाच्या आधारे आमसभेने २००८ हे ‘आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष’ म्हणून घोषित केले.  आज आपण बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक जगात वास्तव्य करतो. जगाचे हे बहुभाषिक स्वरूप टिकविण्याची गरज असून, आपल्या मातृभाषांचे जतन आणि तिला समृद्ध, संपन्न बनविणे हाच यासाठीचा सर्वोत्तम उपाय आहे. मला महात्मा गांधींच्या विचारांची आठवण होते. गांधीजी म्हणत, ‘‘माझे घर सर्व बाजूंनी भिंतींमुळे कोंडलेले असू नये. सर्व संस्कृतींचा माझ्या घरामध्ये शक्‍य तितका मोकळा वावर असावा; मात्र या परिस्थितीतही माझ्या भाषेचा, संस्कृतीचा पाय अढळ राहावा, तो उद्‌ध्वस्त होऊ नये.’’ 

भारताने नेहमीच विविधता आणि अनेकत्वावर विश्‍वास ठेवला आहे. देशाने सर्व भाषांचा आदर केला आहे. तथापि, भाषा आणि संस्कृती यांची वीण घट्ट जमलेली असल्याने देशी भाषा सामर्थ्यवान करण्याची नितांत आवश्‍यकता आहे. संयुक्त राष्ट्रांनी म्हटल्याप्रमाणे, भाषा ही सर्व प्रकारच्या संवादासाठीचा मूलभूत घटक आहे. त्याआधारेच देवघेवीचे, विकासाचे मार्ग मोकळे होतात. त्यामुळे तंत्रकौशल्याइतकेच भाषाकौशल्याचे महत्त्व मोठे आहे. सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचविला जातो, तो भाषेमुळे. तीच जर कमकुवत झाली, तर सांस्कृतिक परंपराही क्षीण झाल्याशिवाय राहत नाही. ‘शाश्‍वत विकासासाठी भाषिक वैविध्य आणि बहुभाषिकता’ हे यंदाच्या या दिनाचे घोषवाक्‍य आहे. हा मुद्दा माझ्यासाठी अगदी जिव्हाळ्याचा असून २०१२मध्ये मातृभाषेतील शिक्षण आणि सर्वसमावेशक शिक्षणाचा मुद्दा मांडताना मी हेच स्पष्ट केले होते. भारत हा विविध भाषा आणि संस्कृतींनी नटलेला देश आहे. देशातील अनेक नागरिकांकडून बोलली जाणारी हिंदी सार्वजनिक व्यवहाराची भाषा ठरू शकते. हिंदीव्यतिरिक्त तेलुगू, बंगाली, मराठी, तमीळ या भाषाही व्यापक प्रमाणात बोलल्या जातात. तमीळ ही जगातील सर्वांत जुन्या भाषांपैकी एक. भारतात इतरही अनेक भाषा बोलल्या जातात, त्यापैकी प्रत्येक भाषेला समृद्ध भाषिक परंपरा आहे. त्या प्रदेशाची भाषाशैली आणि बोलीची श्रीमंतीच दर्शवितात. 

मातृभाषेच्या वापराला प्रोत्साहन देणे सर्वांत महत्त्वाचे आहे. लहान मूल इतर कुठल्याही भाषेपेक्षा मातृभाषेत अधिक चांगल्या पद्धतीने आकलन करू शकते. आपले विचारही स्पष्टपणे व्यक्त करू शकते. साक्षरतेचे प्रमाण सध्या ७४ टक्के आहे, ते वाढविण्यासाठीदेखील मातृभाषेचा स्वीकारच प्रभावी ठरेल. त्यामुळे सर्वच राज्य सरकारांनी शाळांमध्ये मातृभाषेची सक्ती करावी. येत्या शैक्षणिक वर्षापासून आंध्र प्रदेश, तेलंगणसह इतर काही राज्यांनीही माध्यमिक शिक्षणापर्यंत तेलुगूची सक्ती करण्याचा निर्णय घेतला. तो स्वागतार्ह आहे. इतर राज्येही याचे अनुकरण करतील, अशी आशा आहे. मातृभाषेचा पाया पक्का असेल तर नवनव्या भाषा शिकणे सोपे होते. जागतिकीकरणाला सामोरे जाताना लागणारा आत्मविश्‍वास या धोरणामुळे निर्माण होईल. इंग्रजीचे महत्त्व कमी लेखण्याचे कारण नाही; परंतु शहरी सुशिक्षित व अभिजन वर्गामध्ये मातृभाषेत बोलणे, वाचणे किंवा लिहिणे कमीपणाचे समजले जाऊ लागणे, ही दुर्दैवाची बाब आहे. हा प्रवाह बदलून मातृभाषेत व्यवहार करणे यात अभिमान वाटायला हवा. विविध देशांत हिंडताना हे जाणवते, की तेथे लोक मातृभाषेत बोलण्याचा केवळ अभिमानच बाळगतात, असे नाही तर त्या भाषांचा उत्साहाने प्रसारही करतात. इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व असूनही मातृभाषेला प्राधान्य देणाऱ्या अनेक परदेशी उच्चपदस्थांशी मी नेहमीच संवाद साधतो. रशिया, स्वित्झर्लंड, चीन, जर्मनी आदी अनेक देशांचे प्रमुख आपापल्या राष्ट्रभाषांत बोलतात. आपल्या भाषेत बोलण्याचा अभिमान बाळगण्याबरोबरच ते तिच्याकडे ‘राष्ट्रीय ओळख’ म्हणूनही पाहतात. 

देशातील सर्व नागरिकांनी आपली मातृभाषा व्यवस्थित शिकून इतर भाषांमध्येही पारंगत होण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या मुलांना सर्वप्रथम मातृभाषा व हळूहळू इतर भाषा शिकवून आपण आपली भाषिक आणि सांस्कृतिक मुळे मजबूत करूयात. प्रत्येकाची मातृभाषा सशक्त केल्याने बहुभाषिक, बहुसांस्कृतिक जग शक्‍य आहे, हे समजून घ्यायला हवे. जागतिक भाषांच्या उद्यानात प्रत्येक भाषेचा वृक्ष बहरावा. मातृभाषेला समाविष्ट करणाऱ्या शैक्षणिक व्यवस्थेची, भारतीय भाषांमधील प्रकाशनांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यवस्थेची व या विविध भाषांमधून ज्ञानाचा प्रसार करणाऱ्या इंटरनेट प्रणालीची आपल्याला गरज आहे. विविधता आणि वैशिष्ट्ये टिकवूनच आपण सर्वसमावेशकतेकडे जाऊ शकतो. हीच भारतीय दृष्टी आहे. ती खऱ्या अर्थाने आपल्याला भारतीय व जागतिक नागरिक बनवेल.

(अनुवाद - मयूर जितकर )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com