नाममुद्रा- इंग्लंडचा ब्रेव"स्टार'

संजय घारपुरे
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

कोणत्याही नवोदित फुटबॉलपटूला विचारले, की चेल्सीकडून खेळायला आवडेल की लिव्हरपूलकडून. तर तो चेल्सी असेच उत्तर देईल; पण त्यास काही अपवाद असतात. असाच एक अपवाद विश्वकरंडक सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या इंग्लंड संघातील एक खेळाडू आहे. तो चेल्सीशी संलग्न असलेल्या अकादमीत सातव्या वर्षी दाखल झाला होता; पण अव्वल फुटबॉलपटू व्हायचे असेल, तर सामन्यात खेळण्याची, संघात असण्याची संधी मिळायला हवी. चेल्सी नजीकच्या काही वर्षांत तरी ती देणार नाही, असे त्याला वाटू लागले आणि त्याने लिव्हरपूलकडे जाण्याचे ठरवले.

इंग्लंड फुटबॉल वर्तुळात त्याच्या वयाच्या मुलांना या निर्णयाने धक्का बसला; मात्र फुटबॉल अभ्यासकांनी त्याचे कौतुक केले. लिव्हरपूल संघ व्यवस्थापनाचा नवोदितांवर जास्त विश्वास असतो. त्यानेही हा विश्वास सार्थ ठरवला आहे. तो व्यावसायिक संघात वेगाने प्रगती करत आहे. आता तर त्याला लवकरच अंतिम संघात स्थानही मिळेल. तो आहे रिऍन ब्रेवस्टर. सतरा वर्षांखालील स्पर्धेत गोल्डन बूट जिंकलेला खेळाडू.
चेंडू पायात असताना कमालीच्या वेगाने चाल करण्याची ब्रेवस्टरची खासियत. याकडे लक्ष वेधल्यावर तो हसतो. "मी कौशल्यात काहीसा कमी आहे ना, त्याची भरपाई वेगात करण्याचा प्रयत्न करतो' असे तो सांगतो; पण त्याच्यावर ब्राझील तसेच अमेरिका संघ विश्वास ठेवणार नाही. त्याने गोलच्या वेळी घेतलेली स्वतःची जागा, चेंडूचा योग्य जागी केलेला स्वीकार आणि दिलेली अचूक ताकदवान किक हे सर्वांनी पाहिले आहे. तो गोलरक्षकास चेंडू रोखण्याची फार कमी संधी देतो. आता निर्णायक लढतीतही त्याने मध्यांतरास काही मिनिटे असताना गोलच्या दोन संधी निर्माण केल्या. त्यातील एक साधली आणि दुसरी थोडक्‍यात हुकली. त्यामुळेच इंग्लंड उत्तरार्धात आत्मविश्वासाने मैदानात उतरले.
अमेरिका आणि ब्राझीलविरुद्ध हॅटट्रिक केलेल्या या खेळाडूस हे जगज्जेतेपद आगळ्या प्रकारे सुखावत असेल. सर्वाधिक गोलइतकीच महत्त्वाची बाब त्याच्या बाबतीत अशी, की प्रसंगी गोलक्षेत्रात किंवा त्याच्यानजीक असलेल्या खेळाडूंना अचूक पास देण्यात तो वाकबगार आहे. तो तंदुरुस्त आहे, मेहनती आहे. त्याच्या गोलक्षेत्रातील हालचाली विचारपूर्वक असतात. त्यामुळे तो जास्त धोकादायक होतो. तो सेकंड स्ट्राइकर म्हणूनही तेवढाच प्रभावी आहे. प्रीमियर लीगच्या द्वितीय श्रेणी स्पर्धेतील दोन सामन्यांत त्याने तीन गोल केले; पण त्यापेक्षाही चार गोलांना सहाय्य केले, याकडे जर्गन क्‍लॉप लक्ष वेधतात.