जीवनाचा 'अर्क' जाणलेले तोरडमल! 

Madhukar Toradmal
Madhukar Toradmal

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. मी नट म्हणून धडपड करत होतो त्या काळात. एका व्यावसायिक नाटकांत एकदम छोटंसच काम मिळालं होतं. त्यातला एक छोटासा शेवटचा भाग मधुकर तोरडमल यांनी पाहिला, तो त्यांना आवडला असावा. मला निरोप आला, मामांनी बोलावलंय. तोरडमल यांनी बोलावलंय म्हटल्यानंतर मी दबकतच गेलो; पण आलो आनंदात. कारण त्यांनी मला 'झुंज' या नाटकात भूमिका दिली होती. साधारण 1981 चा तो काळ. त्या नाटकानंतर खऱ्या अर्थाने माझी प्रेक्षकांत काही ओळख निर्माण झाली. 

अर्थात, याला कारणीभूत होते ते मामाच. कारण त्यांनीच 'चंद्रलेखा'सारख्या नामवंत संस्थेशी ओळख करून दिली होती. 'झुंज' हे नाटक त्यांनीच लिहिलं होतं. जातीभेदावरचं ते व्यावसायिक रंगभूमीवरील पहिलंच नाटक होतं. त्याची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर 'तरुण तुर्क, म्हातारे अर्क', 'गोष्ट जन्मांतरीची' या नाटकांत त्यांनी मला काही प्रयोगांसाठी काम करायला बोलावलं होतं. तेव्हापासून ते आता शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याकडून मी कायम काही ना काही शिकतच आलो आहे. 

मामांचा खूप दरारा असे. ते खूप शिस्तीचे भोक्ते होते. नाटकांच्या तालमीत जे ठरलं आहे तेच आणि तसंच प्रत्यक्ष प्रयोगात झालंच पाहिजे, हा त्यांचा आग्रह. स्टेजवर जाऊन कोणीही आयत्या वेळी काहीही बोललेलं त्यांना अजिबात सहन व्हायचं नाही आणि स्टेजवरच कशाला, अगदी आपल्या एन्ट्रीआधी विंगेत उभं असताना बोललेलं ही चालायचं नाही त्यांना; पण मेकअप रूममध्ये ते मोकळे असत. तिथलं वातावरण त्यांनी कधीही गंभीर ठेवलं नाही. 

त्यांना विनोदाची अतिशय उत्तम जाण होती. 'तरुण तुर्क...'मधून ती त्यांनी चांगल्या प्रकारे दाखवली. त्यांच्या लेखनाची शैली आगळी होती. कोणतेही अंगविक्षेप न करता किंवा वेगळे प्रयत्न न करता निखळ विनोद कसा सादर करायचा, हे त्यांनी दाखवून दिले. 

आमचा एकदा ओझरला प्रयोग होता. स्टेजवर वंदना गुप्ते, मी आणि मामा ( तोरडमल) होतो. त्यांची भूमिका माझ्या वडिलांची होती आणि वंदना गुप्ते होत्या माझ्या मावशी. वंदना गुप्ते कोचावर बसलेल्या असतात आणि मीही एक फेरी मारून येऊन कोचावर बसतो, असा तो प्रसंग होता. नेहमीसारखाच मी फिरून येऊन त्या कोचावर बसलो आणि अचानक त्या कोचाचे चारही पाय तुटले. आम्ही खाली पडलो. आम्हाला कळेचना की आता करायचं तरी काय? समोर तीन हजार प्रेक्षक होते. शेवटी पडदा पाडावा लागला. आम्ही मामांकडे पाहिले ते थरथरत होते. आम्हाला आधी वाटले की, ते चिडून थरथरताहेत की काय; पण त्यांना हसू येत होते आणि ते दाबून धरल्याने ते थरथरत होते. हे एकदा कळल्यावर आणि पडदा पडल्यावर आम्ही सगळ्यांनी पोटभर हसून घेतलं आणि मग पुन्हा प्रयोग सुरू झाला. 

असे वेगवेगळे प्रसंग त्यांच्याबरोबर अनुभवले; पण प्रत्येक प्रसंगातून जाणवली ती एकच गोष्ट, त्यांचं नाटकावर मनस्वी प्रेम होतं! 

जेव्हा त्यांचं वय झालं आणि त्यांना जाणवलं की, आता आपण काम करू शकणार नाही तेव्हा त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. त्यांनी आगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले. अतिशय उत्तम मराठीत. त्यांचं मराठी भाषेवरही प्रचंड प्रेम होतं. ते त्यांच्याशी बोलताना, त्यांनी काही लिहिलेलं वाचताना जाणवे. 

त्यांचा सहवास मला बऱ्यापैकी लाभला. अगदी आतापर्यंत. 10 दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणलं होतं. पाच-सहा दिवसांपूर्वीच त्यांना भेटायला मी गेलो होतो. त्यांची प्रकृती फार उत्तम नव्हती. मी त्यांना उठवायचा प्रयत्न केला; पण ते उठत नव्हते. मधेमधे ते डोळे किलकिले करून बघायचे आणि परत झोपायचे. मग मी त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणी काढल्या आणि मी बोलता बोलता ते चक्क उठून बसले आणि त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. अकरावीतली त्यांची आठवण होती, 'अकरावीच्या पेपरला मला काहीच, काहीच लिहिता येत नव्हते. अभ्यासच झाला नव्हता ना; पण पेपर किमान एक तास तरी स्वतःकडे ठेवायला हवा ना... मग आठवून आठवून काही गोष्टी लिहिल्या आणि शेवटच्या पानावर लिहिले ...टू अवर इज ह्युमन, टू फरगिव्ह इज गॉड ऍण्ड इफ यू गिव्ह मी 35 परसेन्ट यु विल बी माय गॉड.' 

ही आठवण सांगताना ते खो खो हसले होते. त्यांच्या तल्लख बुद्धीची जाणीव त्यांच्या सहवासात वारंवार होत होतीच; पण ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तशीच होती हे महत्त्वाचं. त्यांच्याकडून मिळालेल्या गोष्टी फक्त नाटकासाठीच नव्हे तर संपूर्ण आयुष्यासाठी उपयोगी पडणाऱ्या आहेत. कारण, त्यात त्यांच्या अनुभवांचा अर्क आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com