ट्रान्झिट! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

जुनी इमारत पाडुनि तेथे 
उभी राहतिल नवी मकाने 
नवीन खिडक्‍या, नवे वाळवण 
नवीन दुपटी, नवी दुकाने 

लुळेपांगळे भिजरे जीवित 
कुण्या एकदा काळ-सकाळी 
पत्त्यासम कोसळते तेव्हा 
दैव देतसे भेसूर हाळी 

उद्‌ध्वस्ताच्या मौनालाही 
कर्कशतेची लुचे पिलावळ 
अधांतरातील खिडकीवरती 
बसे कयामत, करिते वळवळ 

उमर सवाशे जिवंत वस्ती 
उधार मिळतो सदा किराणा 
आयुष्याच्या गलीकुच्यांतून 
लकेर घेतो पक्षी दिवाणा 

जिवंत होती वस्ती तेव्हा, 
माणुसकीही नव्हती मेली 
रस्त्यावरचे सुणें कुलुंगी 
हलवत होते शेपूट ओली 

''ह्यांइच होंगी खडीच बिल्डिंग 
व्हां रहेंगे साल महिना'' 
म्हणायची मग मनाशीच की 
तळमजल्याची शेख सकीना 

शबनमबीच्या घरात होती 
बकर ईदची जल्दी लगबग 
घरवालाही करीत होता, 
दमडी-दमडीसाठी दगदग 

सत्तरीचा उस्मान पलंबर 
इथेच झाला काण्या चाचा 
दाढी पिकली, दाढा झिजल्या, 
तरिही होती शाबूत वाचा 

''कहीं नहीं जायेंगे मामू 
इंतकाल भी ह्यांइच तय है 
ट्रान्झिटवाली जिंदगानी का 
वैसे भी भरोसा क्‍या है?'' 

म्हणायचा गा काण्या चाचा 
त्याच्यासाठी सारे ट्रान्झिट 
जगणे, मरणे रडणे, हसणे 
सारे काही जिन्यात सीमित 

जुनी इमारत पाडुनि तेथे 
उभी राहतिल नवी मकाने 
नवीन खिडक्‍या, नवे वाळवण 
नवीन दुपटी, नवी दुकाने 

स्वप्नांचे नव गेंद गुलाबी 
कुंड्यांमधुनी इथेच फुलले 
खयालातल्या खयालात अन्‌ 
टोपामधले पुलाव पकले 

आणि एकदा काळसकाळी 
लुळेपांगळे भिजरे जीवित 
पत्त्यासम कोसळले आणिक 
आयुष्याचे हटले ट्रान्झिट

Web Title: marathi news marathi website Dhing Tang