...जमवा की पान! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

इतिहासास सारे काही ठाऊक असते. येणाऱ्या आणि जाणाऱ्या हरेक क्षणावर तो नजर ठेवून असतो. नेमका दिवस सांगावयाचा तर आश्‍विनातली ती पहिली सकाळ होती. दहा वाजून गेले होते. शिवाजी पार्कावरील कृष्णकुंजगडावर लगबग सुरू जहाली. घोड्यांस खरारा आटोपण्यात आला. खोगिरे चढवण्यात आली. दाणागोटा वाढवण्याचे फर्मान निघाले. दूरदूरवरोन दौड मारत नवनिर्माणाचे कडवे सरदार गडाच्या पायथ्याशी जमो लागले. इतिहासाने कान टवकार्ले. 

कसली ही लगबग? कसली ही तयारी? राजे नव्या मोहिमेवर तर निघाले नसावेत? 

इतिहासास सारे काही ठाऊक असते. येणाऱ्या आणि जाणाऱ्या हरेक क्षणावर तो नजर ठेवून असतो. नेमका दिवस सांगावयाचा तर आश्‍विनातली ती पहिली सकाळ होती. दहा वाजून गेले होते. शिवाजी पार्कावरील कृष्णकुंजगडावर लगबग सुरू जहाली. घोड्यांस खरारा आटोपण्यात आला. खोगिरे चढवण्यात आली. दाणागोटा वाढवण्याचे फर्मान निघाले. दूरदूरवरोन दौड मारत नवनिर्माणाचे कडवे सरदार गडाच्या पायथ्याशी जमो लागले. इतिहासाने कान टवकार्ले. 

कसली ही लगबग? कसली ही तयारी? राजे नव्या मोहिमेवर तर निघाले नसावेत? 

'जगदंब, जगदंब' बालेकिल्ल्यात धीरगंभीर आवाज घुमला. शिवाजी पार्कावरील झाडे स्तब्ध जाहाली. वाहतूक मंदावली. कबुतरे भिर्रदिशी अस्मानात उडाली. पुन्हा जागच्या जागी बसली. 

''तयारी झाली?'' राजियांनी पृच्छिले. 

''होय, राजे...नित्यनूतन नवनिर्माणासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज जाहला आहे. फक्‍त आपण यावयाची खोटी!'' आम्ही अदबीने म्हणालो. 

''काळरात्र होता होता उष:काल जाहला. काल रात्री आम्हास स्वप्न पडले...,'' राजे स्वत:शीच बोलिले. 

''रात्री नाई काई... सकाळी नवाची गोष्ट ती... आपण किंचाळून उठलात...,'' आम्ही. खरे तर हा आगाऊपणा करण्याचे आम्हाला काही कारण नव्हते. पण जित्याची खोड! परिणामी, राजियांच्या हातातील पाण्याचा गिलास आमच्या दिशेने आला...असो. 

'' खामोश! स्वप्नात एक शुभ्रदाढीधारी साधू येवोन आम्हांस म्हणाला की 'नवी विटी नवा राज, नवा चुना, नवे पान...'' राजे सद्‌गदित होवोन म्हणाले. 

''नवा चुना, नवे पान? काय असेल ह्या दृष्टांताचा अर्थ? मराठी माणसाला चुना लावण्याचे काम तर दर पिढी चालू आहे, राजे!'' आम्ही पुन्हा आगाऊपणा केला. ह्यावेळी राजियांच्या हाती चमचा लागल्याने केवळ आम्ही बचावलो. असो. 

''मूर्ख माणसा...न वे पान घ्या, त्याच्या शिरा काढा. त्यास नवा चुना लावून काथ, सुपारी, अस्मानतारा आदी सामग्रीनिशी नवे पान करा, असा त्याचा अर्थ...'' राजियांनी आम्हांस दृष्टांत समजावून सांगितला. नवरतन किवामचा उल्लेख राहोन गेला असावा, असे आम्हाला राहून राहून वाटले. पुन्हा असो. 

''पहा बुवा! उगीच एक म्हणता एक व्हावयाचे, आणि मराठी माणसाचे नष्टचर्य पुन्हा मागील पानावरोन पुढे चालू, असे व्हावयाचे...'' आम्ही शंका उपस्थित केली. 

''कुणाची शामत आहे आता मराठी माणसाच्या पानाला नख लावण्याची...आँ?'' गर्रकन मान फिरवत सर्रकन तलवार उपसत भर्रकन राजे म्हणाले आणि झर्रकन आमचा चेहराच उतरला! वास्तविक आम्ही असले काहीही केलेले नव्हते. हे काय भलतेच? 

'' क...क...कुठे...काय...साहेब...आम्ही...तर...,'' आमच्या मुखातून शब्द फुटेना झाला. 

''असं काही झालं नं... तर महाराष्ट्रभर धिंगाणा घालू आम्ही... काय?'' राजे कडाडले. 

''ध...ध...धिंगाणा!'' आम्ही कसेबसे म्हणालो. पण हेदेखील म्हणायला नको होते, हे फार उशिरा लक्षात आले. मेजावरील पोह्यांची (रिकामी) प्लेट आमच्या दिशेने भिरभिरत आली. आम्ही निरागसपणे फक्‍त जबाब दिला होता. पण मस्तकी टेंगूळ तेवढे आले. जाऊ द्या झाले. 

''हे तुमचं बुलेट ट्रेन, मेक इन इंडिया वगैरे थापेबाजी आहे नं... ती सगळी उघड करणार आहोत आम्ही... काय?'' एक बोट आमच्या चेहऱ्यासमोर नाचवत राजियांनी चांगलाच दम भरला. सकाळपासून आम्ही काही खाल्ले नव्हते, हे एक बरेच झाले म्हणायचे. विजयी मुद्रेने राजे म्हणाले, ''आम्ही आता नवे पान जमवत आहो. पण हे पान तुमचे बनारसी नव्हे!! फेसबुकचे पान आहे, फेसबुकचे!! ह्या पानावरच आम्ही महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा इतिहास सोनेरी अक्षरात लिहिणार!! हर हर हर हर महादेव!!'' 

आम्हीही अत्यानंदाने त्यात आमची आवाजी मिसळली आणि ही घटना तीन आंगठ्यांनिशी सुपरलाइक केली...तूर्त हुर्द आनंदाने उचंबळून आले आहे! मनाचा मोर थुई थुई नाचतो आहे!! आनंद पोटात मायेना झाला आहे!! फेसबुकी भाषेत सांगावयाचे तर फीलिंग ऑसम!!!