धारदार! (ढिंग टांग!)

Dhing Tang
Dhing Tang

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे गड. 
वेळ : धार काढण्याची. 
प्रसंग : धारदार! 
पात्रे : धारदारच!! 

(राजाधिराज उधोजीराजे आपल्या महालात सायकलीवर बसून तलवारीला धार काढत आहेत. धारेच्या ठिणग्या उडतात. तेवढ्यात 'हहहहह' असे हास्य ऐकू येते. राजे चमकतात. पुन्हा धारकाम! उधोजीराजे अंगठ्याने धार तपासतात. 'हाय!' असे मधूनच ओरडतात. अंगठा तोंडात घालतात. पुन्हा 'हहहह' असा हास्यध्वनी येतो... अब आगे) 

उधोजीराजे : (प्याडल मारत) अरे, कोण आहे रे तिकडे? दात कोण काढतंय तिथे? हसतील त्याचे दात दिसतील!! 
मिलिंदोजी फर्जंद : (अदबीने) मुजरा म्हाराज! आपण बलंवलंत? काही काम होतं का? 

उधोजीराजे : (उपरोधाने) नाही! शिळोप्याच्या गप्पा मारायला बोलवत होतो! गाढव लेकाचा! इथं फिदी फिदी हसत कोण होतं? 
मिलिंदोजी : (गालावर मारून घेत) म्या नाय ब्वॉ!! 

उधोजीराजे : (संशयानं) तूच होतास तो!! इथं आहे कोण दुसरं? आम्ही असे धार काढायास बसलो, तर खत्रुडासारखा हसलास! हा राजद्रोह आहे, समजलं ना? 
मिलिंदोजी : (अजीजीने) उगाचच्या उगाच हसाया म्या काय येडा विकास हाय का? 

उधोजीराजे : (खुदूखुदू हसत) हुशार दिसतोस! विकास वेडा झालाय, ही लाइन बाकी मस्त आहे!! (मूळ विषयाकडे वळत) पण ते जाऊ दे. आम्ही इथं शस्त्रांना धार काढत असताना कुणीतरी फिदफिदत होतं! कोण ते शोधून काढा आधी!! 
मिलिंदोजी : (दोन्ही हात मागे बांधून) आपनच आपलं हसं करून घेतल्यावर काय होनार दुसरं? 

उधोजीराजे : (भडकून) खामोश!! तोफेच्या तोंडी देईन!! पाणी आण लौकर!! 
मिलिंदोजी : (कंटाळून) गरम की थंड? 

उधोजीराजे : (संतापाने) दाढी करायला नकोय पाणी! धार काढायला हवंय! नॉन्सेन्स!! (स्वत:शीच हळहळत)... इतक्‍या गंजक्‍या बुद्धीची माणसं घेऊन कसं काय युद्ध करणार आम्ही कोण जाणे!! हॅ:!! 
मिलिंदोजी : (गुडघ्याभवती हाताची मिठी घालून झुलत) आज जेवणात फणशीची भाजी हाय का? 

उधोजीराजे : (थिजून) फणसाची भाजी? नाही बुवा! का? 
मिलिंदोजी : (विचारात पडत) चाकूला धार काढाया बसले म्हून इच्यारलं!! 

उधोजीराजे : (खवळून) गाढवा, आमची शस्त्रं आहेत ही!! येत्या दसऱ्याला शिलंगणासाठी लागतील, म्हणून धार काढून ठेवतोय! (अचानक आठवून) तू पाणी आण बरं! पळ!! 
मिलिंदोजी : (जन्मजात आगाऊपणाने) कशापायी उगीच चाकूसुऱ्यांशी खेळावं? चांगल्या मान्साचं काम न्हाई ते!! उगाच पब्लिकमधी हसं हुतंय आपलं!! नका काढू धारबिर! ठिवा ती हत्त्यारं जागच्या जागी!! 

उधोजीराजे : (तलवार रोखून) आता एक शब्द तरी अधिकउणा बोललास तर ह्याच तलवारीनं... ह्याच तलवारीनं... ह्याच तलवारीनं.... 
मिलिंदोजी : (निर्विकारपणे) इतके दिवस कुटं होती हत्त्यारं? 

उधोजीराजे : (संयमानं) झाडाच्या ढोलीत ठेवली होती! काय म्हणणं आहे? 
मिलिंदोजी : (आणखी चौकश्‍या आरंभत) म्हंजी आपल्या पांडवांसारकंच की!! 

उधोजीराजे : (गंभीरपणाने) आमचाही अज्ञातवास संपणार आता, फर्जंदा! आम्ही मोकळा श्‍वास घेणार!! विराटाघरचा पाहुणचार आता बंद!! शस्त्रास्त्रांनिशी आम्ही कौरवांवर चालून जाणार!! भयंकर युद्धाला आता तयार व्हा!! 
मिलिंदोजी : (आश्‍चर्य वाटून) झाडाच्या ढोलीत येवढी हत्त्यारं मावत्यात व्हय? 

उधोजीराजे : (स्फुरण चढत) अरे, मराठी अस्मितेच्या हुंकाराची गर्जना करण्यासाठी, मराठी दौलतीची पताका डौलाने सातासमुद्रापार फडकवण्यासाठी साक्षात नकुलाने आम्हांस हे वरुणाचे खड्‌गं दिले! सहदेवाने कुऱ्हाड दिली! भीमाने गदा दिली, आणि धर्मराजाने आपला अणुकुचीदार भाला दिला!! ह्या दिव्य अस्त्रांच्या योगे आम्ही कौरवांचा पाडाव करू आणि मराठी राज्य सुरक्षित राखू!! 
मिलिंदोजी : (शस्त्रास्त्रांकडे नजर टाकत) बाकी समदी हत्यारं आहेत, पन आर्जुनाचा धनुष्यबान दिसंना काई?! 

उधोजीराजे : (किंचित पडेल आवाजात) तेवढंच धनुष्यबाण फक्‍त ढोलीतून काढायचं राहिलंय!! जरा एक स्टूल घेऊन ये बरं!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com