अमेरिकी महासत्तेचा 'लहरी राजा' 

निळू दामले
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

महासत्तेच्या अध्यक्षांची कारभारशैली हा चेष्टेचा विषय बनणे, हीच काळजी करण्यासारखी बाब आहे. सहा महिन्यांतील त्यांच्या कारभाराचा लेखाजोखा घेणे ही बाब त्यामुळेच अत्यावश्‍यक ठरते. 

अमेरिका या जागतिक महासत्तेचे सुकाणू सांभाळणारी व्यक्ती केवळ त्या देशाच्याच नव्हे, तर जगाच्या दृष्टीनेही महत्त्वाची असते. त्यामुळेच तेथे सहा महिन्यांपूर्वी सत्तेवर बसलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारभाराचा लेखाजोखा घेणे क्रमप्राप्त आहे. पूर्वाध्यक्षांचे निर्णय मोडीत काढणे हे ट्रम्प यांचे एक आवडते सूत्र. परंतु, त्याचे परिणाम कसे होतात, हे आता ठळकपणे समोर येत आहे. 'ओबामा आरोग्य सेवा कायदा' रद्द करून त्या जागी नवा आरोग्य सेवा कायदा आणण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आता कायमचा अपयशी ठरला आहे. सिनेटमध्ये त्यांच्याच पक्षाच्या तीन सदस्यांनी आरोग्य सेवा रद्द करण्याच्या कार्यक्रमाला विरोध केला आणि तो प्रयत्न फसला.

'ओबामा आरोग्यसेवे'मुळे सर्व अमेरिकी नागरिकांना आरोग्य सेवा, विमा उपलब्ध झाला. या सेवेत काही दोष होते. ते दूर करण्याचा प्रयत्न खुद्द डेमोक्रेट्‌स आणि ओबामाही करत होते. ट्रम्प यांना ती सेवा दुरुस्त करून सुरू करता आली असती; पण आपण सोडून जगातले सर्व लोक मूर्ख, देशद्रोही, वाईट असतात अशा गंडाने पछाडलेले ट्रम्प 'ओबामा सेवा कायदा'च रद्द करू पाहात होते. 'ओबामा व्यवस्था' रद्द केली तर लाखो मध्यमवर्गीय व गरीब नागरिक आरोग्य सेवेला मुकतील, हे सत्य बाहेर आल्याने अमेरिकेत खळबळ उडाली. ओबामांना पाठिंबा देणाऱ्या गोऱ्या मतदारांमध्येही कित्येक जण 'ओबामा आरोग्य सेवे'चा फायदा घेत होते. पुढच्या वर्षी होणाऱ्या सिनेटच्या निवडणुकीत आपल्याला मतदार हाकलून देतील, अशी भीती रिपब्लिकन सिनेटरना वाटली. कायद्याचा मसुदा मतदानाच्या आधी केवळ दोन तास सिनेटमध्ये मांडला गेला. कायद्याचा तपशील न देताच तो लादण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला, याचा राग ट्रम्प यांच्याच सिनेटरांना आला. त्यांनी 'ओबामा कायदा' रद्द करण्यास विरोध केला. 

ट्रम्प नुसते बोलतात. 'टीव्ही शो' करावा तशी त्यांनी प्रचारमोहीम चालवली. अजूनही ते सत्ताधारी असल्यासारखे वागत नाहीत. प्रचारमोहिमेत असल्यासारखे सतत ओबामा, क्‍लिंटन यांच्यावर टीका करतात. मध्यरात्र उलटल्यानंतर किंवा भल्या सकाळी सहा वाजता ते 'ट्विट' करतात. चिवचिवाट होतो; पण पुढे काहीच घडत नाही. मुस्लिम देशांतून येणाऱ्या स्थलांतरितांवर त्यांनी बंदी घातली. न्यायालयाने ती बंदी बेकायदा ठरवून धुडकावून लावली. मेक्‍सिकोतून येणारी माणसे रोखण्यासाठी ट्रम्प हद्दीवर भिंत उभारणार होते. भिंतीचा खर्चही ते मेक्‍सिकोकडून घेणार होते. मेक्‍सिको खर्च सोसणार नाही, असे लक्षात आल्यावर त्यांनी देशातल्याच कंपन्यांना हाताशी धरायचे ठरवले. तेही जमले नाही. खर्च करायला अमेरिकी सरकार तयार नसल्याने तसे विधेयक अजून तयार झालेले नाही, की संसदेसमोरही आलेले नाही. 

चीन, भारत इत्यादी देश अमेरिकेतील रोजगार हिरावून घेत असल्याने त्या देशांबरोबरील व्यापारी संबंध नव्याने ठरवणार असल्याचे ट्रम्प म्हणाले. त्या देशांतून येणाऱ्या मालावर ते शुल्क लादणार होते. प्रत्यक्षात त्यातले काहीही घडलेले नाही; चीन आणि भारतातून होणारी व्यापारी देवाणघेवाण पूर्वीसारखीच सुरू आहे. नुकतेच त्यांनी भल्या पहाटे 'ट्‌विट' केले, की 'ट्रान्सजेंडर' लोकांना लष्करात स्थान नाही. अमेरिकी लष्करात दहा ते पंधरा हजार सैनिक 'ट्रान्सजेंडर' आहेत. 'ट्रान्सजेंडर' म्हणजे माणूस शरीराने पुरुष असतो आणि स्वभावाने स्त्री. किंवा उलट. पुरुषासारखा पुरुष स्त्रीसारखे कपडे घालू लागला की लोकांना वाटते की ती विकृती आहे. पण विज्ञानाने सिद्ध केलेय की ती विकृती नसून, तो निसर्गानेच तयार केलेला सर्वसामान्य माणूस असतो. ट्रम्प यांनी 'ट्‌विट' केल्यावर पत्रकारांनी 'व्हाईट हाउस'ला तपशील विचारला. 'व्हाईट हाउस'ने सांगितले, की त्यांना काहीच माहीत नाही. त्यांनी 'पेंटॅगान'कडे विचारणा करावी. 'पेंटॅगॉन'मधले सेनानी म्हणाले, की त्यांनाही माहीत नाही, 'ट्रम्प किंवा 'व्हाईट हाउस'ला विचारा'. सेनानींना, लष्कराला न विचारता ट्रम्प यांनी एकतर्फी निर्णय जाहीर केला. अमेरिकी राज्यघटनेनुसार अशा रीतीने 'ट्रान्सजेंडर'ना नोकरीचा अधिकार नाकारता येत नाही.

ट्रम्प मनास वाटेल ते करतात. जेम्स कोमी या 'एफबीआय'च्या संचालकांना त्यांनी तडकाफडकी बडतर्फ केले. कोमी दौऱ्यावर असताना कॅलिफोर्नियात त्यांना ट्रम्प यांचे 'ट्‌विट' वाचायला मिळाले. कोमी यांना ट्रम्प यांनीच नेमले होते. नेमताना कोमी हा 'ग्रेट माणूस' आहे, असे ते म्हणाले होते. स्पायसर यांना 'माध्यम प्रतिनिधी' म्हणून ट्रम्प यांनी नेमले आणि एका क्षणी त्यांना तडकाफडकी काढून टाकले. नंतर प्रीबस या 'व्हाईट हाउस'च्या 'चीफ ऑफ स्टाफ'ला असेच हाकलून दिले. प्रीबस हे ज्येष्ठ रिपब्लिकन नेते होते. जेफ सेशन्स हे ज्येष्ठ सिनेटर पहिल्यापासून ट्रम्प यांना पाठिंबा देत होते. आता त्यांनाच हाकलून दिले जातेय. रशियाने अमेरिकी निवडणुकीत हस्तक्षेप करणे आणि रशियनांचा ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेशी संबंध असणे, याची चौकशी करायला नेमलेले स्पेशल वकील म्युलर यांनाच ट्रम्प 'ट्विट' करून ठोकत आहेत, त्यांना हाकलून देण्याच्या वाटेवर आहेत. 

कतारवर आखाती देशांनी बहिष्कार टाकल्यावर ट्रम्प स्वतःची पाठ थोपटत म्हणाले, की हा निर्णय त्यांचाच होता. दुसऱ्याच दिवशी परराष्ट्रमंत्री रेक्‍स टिलरसन यांनी कतारवरचा बहिष्कार चुकीचा असून, कतारशी संबंध प्रस्थापित करायला हवेत, असे ट्रम्प यांनी आखाती देशांना सांगितले. असे हे विद्यमान अध्यक्ष. ते फक्त आपली मुलगी, जावई आणि मोठा मुलगा यांचेच ऐकून निर्णय घेतात. ते 'व्हाईट हाउस'मध्ये फारसे जातच नाहीत. 'ट्रम्प टॉवर'मधूनच हालचाली करतात. परदेशी राष्ट्रप्रमुखांनाही ते तिथेच भेटतात. ते कधी काय करतील, हे कोणालाच सांगता येत नाही... 

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत) 

Web Title: marathi news marathi website Donald Trump US Nilu Damle