आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी (अग्रलेख)

Representational image
Representational image

एकविसावे शतक आपल्या हातात नाना प्रकारची डिजिटल 'खेळणी' घेऊन आले आणि जणू सारे विश्‍वच आपल्या साऱ्यांच्या कवेत आल्याचा भास होऊ लागला. त्या खेळण्यांपैकी सर्वांत लोकप्रिय ठरले ते अर्थातच 'स्मार्ट फोन'! या स्मार्ट फोनने दळणवळण तसेच दूरसंदेशाच्या क्षेत्रांत तर क्रांती केलीच; शिवाय कॅमेरा नावाची गोष्टही पार दूर भूतकाळात भिरकावून दिली. स्मार्ट फोनवरून बोलण्याबरोबरच लिखित मजकूर-टेक्‍स्ट मेसेजेस आणि त्याचबरोबर छायाचित्रेही एका क्षणात जगाच्या पाठीवरून कोठेही पाठवता येऊ लागली आणि जग आरपार बदलून गेले. पुढे 2004 मध्ये मार्क झुकेरबर्ग नावाच्या एका युवकाने 'फेसबुक' नावाची एक गोष्ट जगाला दिली आणि हातातल्या स्मार्ट फोनवर इंटरनेट सहजासहजी उपलब्ध होऊ लागल्याने त्याचा वारेमाप वापर सुरू झाला. पुढे 'व्हॉट्‌सऍप' नावाची आणखी एक जादू सर्वसामान्यांना उपलब्ध झाली आणि त्यामुळे पाच-पन्नास जण एकाच वेळी एकमेकांशी संवाद साधू लागले; मात्र, या सोशल मीडियाचा म्हणजेच समाजमाध्यमांचा अतिरेकी वापर जीवघेणाही ठरू शकतो.

रविवारी नागपूर येथे सुटीनिमित्ताने वेण्णा जलाशयात जलविहारासाठी गेलेल्या 11 तरुणांची बोट बुडाली आणि त्यातील किमान आठ जणांना जलसमाधी मिळाली, ती अशाच गैरवापरामुळे. हे सारेच युवक खरे तर 'प्रियकर प्रतिबिंबा'चेच होते, असे आता दुर्दैवाने म्हणावे लागते. सेल्फी काढण्याच्या मोहात त्यांना त्या बोटीचा तोल राखता आला नाही आणि बोट उलटली. एवढेच नव्हे तर या अतिउत्साही तरुणांनी आपण काय करत आहोत, ते फेसबुकवरून 'लाइव्ह' चित्रित केले होते. अर्थात, अशा प्रकारचे स्वयंछायाचित्राच्या मोहात पडून मृत्यू येण्याची ही काही पहिलीच घटना नाही; मात्र त्यापासून युवकवर्ग कोणताही बोध घ्यायला तयार नाही, असे वारंवार घडणाऱ्या या अपघातांमधून दिसून येत आहे. 

एकीकडे हे 'सेल्फी'चे अतिरेकी प्रेम आणि दुसरीकडे याच माध्यमाचा वापर करून आपली मते दुसऱ्यावर खऱ्या खोट्या माहितीची शहानिशा न करता लादण्याची घाई. अशा दुहेरी चक्रात आज जग सापडले आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्‍त्या नुपूर शर्मा यांनी पश्‍चिम बंगालमध्ये पेटू पाहत असलेल्या हिंसाचाराबाबत आपले मत जगाला कळवताना वापर केला तो 15 वर्षांपूर्वी म्हणजे 2002 मध्ये गुजरातेत झालेल्या भीषण हिंसाचाराच्या छायाचित्राचा आणि एकच वादळ उठले. आता हा प्रकार घाईघाईत घडला, की जाणूनबुजून केला गेला, याचे स्पष्टीकरण या घटनेची तपशीलवार चौकशी झाली तरच मिळू शकेल.

सध्याच्या डिजिटल युगात या समाजमाध्यमांचा वापर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे राजकीय नेते आहेत, हे या माध्यमावर असलेल्या त्यांच्या पाठिराख्यांच्या-फॉलोअर्स-संख्येवरून स्पष्ट झाले आहे; मात्र त्यांची भक्‍तमंडळी आपल्या नेत्याच्या अतीव प्रेमापोटी कधी नसती घाई करून, तर कधी जाणीवपूर्वक या माध्यमांचा गैरवापर करत असल्याचे अनेकवार दिसून आले आहे. आता नुपूर शर्मा या काही ना काही खुलासे करत असल्या तरी त्यांनी आपले मत व्यक्त करताना सोबत जोडलेले छायाचित्र 'एएनआय' या दूरचित्रवाणी एजन्सीने 2002 मध्ये घेतलेले होते, हे स्पष्ट झाले आहे. असा प्रकार काही पहिल्यांदाच घडलेला नाही. एका भोजपुरी चित्रपटातील दृश्‍य सोबत जोडून बसरीहाट येथे हिंसाचार आणि अत्याचार सुरू असल्याचे यापूर्वी दाखवण्यात आले होते. तर गेल्याच महिन्यात रक्‍ताने माखलेल्या एका गृहस्थाचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसृत करण्यात येऊन दार्जिलिंग येथे त्याच्यावर हल्ला झाल्याच्या वृत्ताने हलकल्लोळ माजला होता. प्रत्यक्षात ते छायाचित्र वेगळ्याच घटनेचे होते. हा प्रकार अर्थातच पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी केला गेला होता, असे आता सहज म्हणता येते. केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी राजकोट येथील एका अत्याधुनिक बस स्थानकाचे छायाचित्र आपल्या ट्विटरवर टाकले. प्रत्यक्षात ते छायाचित्र भलत्याच बस स्थानकाचे असल्याचे निष्पन्न झाले आणि परिणामी बाबूल सुप्रियो यांना ट्विटर याच माध्यमावर बरीच दुषणे सहन करावी लागली. 

अर्थात, हे असे प्रकार काही केवळ भाजपचे उत्साही कार्यकर्ते आणि नेतेच करत आहेत, असे नाही. सर्वसामान्य जनताही याच माध्यमांवरून आपण सतत काय करत आहे, ते दाखवण्यात गर्क झाली आहे. स्वप्रतिमेच्या अतोनात प्रेमापोटी वेगवेगळी छायाचित्रे सतत फेसबुक, इन्स्टाग्राम आदी माध्यमांवरून झळकवण्यात आज तरुणांबरोबरच प्रौढांनाही आनंद मिळत आहे; मात्र समाजकंटक याच सहज उपलब्ध होणाऱ्या छायाचित्रांचा फोटोशॉपद्वारे गैरवापर करू शकतात, एवढेही भान कोणाला उरलेले नाही. खरे तर या माध्यमांचा वापर सकारात्मक परिवर्तनासाठी अगदी सहज होऊ शकतो; पण त्यासाठीची माध्यमसाक्षरता आणि माध्यमविवेक यांची नितांत गरज आज समाजाला आहे, यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com