समर्थाघरचे श्‍वान..! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

मी पीडी गांधी. पीडा नव्हे...पीडी!! पीडी हे माझं नाव आहे, 'पांडुरंग दत्ताराम' किंवा 'पुरुषोत्तम दामोदर' असं इनिशियल नाही. लोक मला पीडीसाहेब किंवा पीडीजी किंवा आदरणीय पीडीजी असं म्हणतात. एका मल्टिनॅशनल कंपनीत मी उच्चपदावर नोकरीला आहे. ''पीडी म्हंजेऽऽऽ...?'' असा एक जातीय प्रश्‍नार्थक हेल तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. वाटलंच होतं मला! हे असले बारकावे मी फार चटकन टिपतो बरं!..तर ऐका. माझी जात वेल्स कॉर्गी. माझे काही भाईबंद इंग्लंडच्या राणीकडे बकिंगहॅम प्यालेसमध्ये राहतात. प्युअर रॉयल ब्लड, यू नो!! माझा मुक्‍काम अर्थात 12, तुघलक लेन, नवी दिल्ली. ओके? 

मी पीडी गांधी. पीडा नव्हे...पीडी!! पीडी हे माझं नाव आहे, 'पांडुरंग दत्ताराम' किंवा 'पुरुषोत्तम दामोदर' असं इनिशियल नाही. लोक मला पीडीसाहेब किंवा पीडीजी किंवा आदरणीय पीडीजी असं म्हणतात. एका मल्टिनॅशनल कंपनीत मी उच्चपदावर नोकरीला आहे. ''पीडी म्हंजेऽऽऽ...?'' असा एक जातीय प्रश्‍नार्थक हेल तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. वाटलंच होतं मला! हे असले बारकावे मी फार चटकन टिपतो बरं!..तर ऐका. माझी जात वेल्स कॉर्गी. माझे काही भाईबंद इंग्लंडच्या राणीकडे बकिंगहॅम प्यालेसमध्ये राहतात. प्युअर रॉयल ब्लड, यू नो!! माझा मुक्‍काम अर्थात 12, तुघलक लेन, नवी दिल्ली. ओके? 

...भक्‍कम पगाराची नोकरी आहे. कंपनी प्रोव्हायडेड अकोमोडेशन आहे. शोफरवाली कार आहे. दिमतीला नोकर-चाकर आहेत. चार टाइम मजबूत खायला मिळतं आहे. मुख्य म्हणजे सदोदित लाडकोड करणारा बॉस आहे. आणखी काय हवं? आमचे बॉस खरंच खूप चांगल्या मनाचे आहेत. कंपनी कितीही तोट्यात गेली तरी कर्मचाऱ्यांचा बोनस (न मागता) वाढविणारा मालक बघितलाय का तुम्ही? मी बघितलाय...आय मीन बघतोय!! बॉसच्या मर्जीतला म्हणून माझ्याकडे अनेकजण असूयेनं बघतात. पण मी दुर्लक्ष करतो. आज मी जो काही आहे तो माझ्या बॉसमुळेच आहे. कर्मचारी असलो तरी त्यांच्या घरचाच सदस्य आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या अभ्यागतांचं स्वागत करणं, नकोश्‍या पाहुण्याला दारातूनच फुटवणं ही कामंही मीच करतो. काही लोकांना बॉसला भेटण्यासाठी थांबावं लागतं. त्यांचं मनोरंजन करणं ही माझीच जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, मध्यंतरी एक ज्येष्ठ कामगार पुढारी आले होते. आमच्याच कंपनीत दुसऱ्या डिपार्टमेंटला कामाला असावेत!! ते आमच्या बॉसच्या क्‍याबिनच्या बाहेर पुतळ्यासारखे कित्येक तास उभे होते. माझ्या चटकन लक्षात आले नाही. खांबासारखं कुणी उगीचच उभं राहिलं तर काय करावं आम्ही? मग...जाऊ दे. ते पुढारीही सज्जन होते. म्हणाले, ''असू दे, असू दे. त्यात काय एवढं?'' तेव्हापासून मग मी बिनधास्तच झालो. एका गांधीवादी नेत्याच्या उपम्याच्या बशीत मी प्रेमानं हाडूक नेऊन टाकलं. एकदा एका पुढाऱ्याचा पांढराशुभ्र लेंगा मला खूपच भावला. असं वाटलं की खाऊनच टाकावा! पण ते पुढारी पळूनच गेले. माझ्यामुळे अनेकजण असे कंपनी सोडून पळून गेले असं म्हणतात. जाऊ दे. मला काय त्याचं? 

बॉसचं माझ्यावाचून पान हलत नाही, हे सत्य आहे. बाकी सब झूठ!! महत्त्वाच्या मीटिंग्जना हजर राहून बॉसला असिस्ट करणं, येणाऱ्या अभ्यागतांचं यथायोग्य स्वागत करणं ही जबाबदारीही माझीच असते. अडचणीच्या प्रसंगी बॉसची सोडवणूक करणं हे अर्थात माझं सवविंत महत्त्वाचं काम आहे. 

बॉसचं (म्हणजेच कंपनीचं) ट्‌विटर हॅंडल, सोशल नेटवर्किंग आणि एकंदरितच 'पीआर' मी बघत असतो. आमचे बॉस ट्‌विटरवर हल्ली फार ऍक्‍टिव्ह झाले आहेत. त्यांच्या मजेदार ट्‌विट्‌स लोकांची दाद घेत असतात. जरा कान उभे करा...आय मीन इकडे करा...ते सगळे ट्‌विट्‌स मीच करतो!! हे आधी खूप गुपित ठेवलं होतं. तुम्हाला सांगतोय, कारण माझ्या बॉसनंच ते जाहीर केलंय. आता मी लपवून काय उपयोग? 

एकाच वेळी इतकी कामं मला कशी काय बुवा जमतात? काय आयडिया केली की बॉसची मर्जी संपादन करता येते? कंपनी तोट्यात असतानासुद्धा दरसाल (न सांगता) बोनस कसा मिळेल? असे प्रश्‍न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. पण त्याची ट्रिक तुम्हाला सांगून ठेवतो. करून बघा, लग्गेच रिझर्ल्ट मिळेल. करता? ठीक आहे... 

हे असं दोन्ही हात पुढे टेकवून बसायचं. नाकावर मधोमध एक बिस्कुट ठेवायचं. ते तोलायचं हं...अज्जिबात पाडायचं नाही!! बॉसनं चुटकी वाजवली रे वाजवली की निमिषार्धात खटॅक्‌कन मान तिरपी करून बिस्कुट थेट दातात पकडायचं!! प्रॅक्‍टिसनं सहज जमेल तुम्हाला. जस्ट डू इट!! खरंच करून बघा. रेडी? वन टू थ्री...चुटुक...गुड बॉय!!