मित्रोंऽऽ..! (ढिंग टांग!)

मित्रोंऽऽ..! (ढिंग टांग!)

कस्सले दचकलात ना...हाहा!! गंमत केली!! नुसतं हेडिंग वाचून तुमचे हे हाल...मजकूर काय धडधडत्या छातीनं वाचणार का? डोण्ट वरी! आपण असलं काही हॉररबिरर करत नाय. माणसानं कसं लोकांना खुश ठेवलं पायजे. जमलं तर हशिवलं पायजे. उगीच थरथराट माजवण्यात अर्थ नाही. आपला तसा स्वभाव पण नाही. म्हंजे आपण फार वेगळा माणूस आहे. खटाशी खट, उद्धटाला उद्धट. पण गरिबाला नडणं चूकच. ते पाप. आपल्या हातून असलं काही घडणार नाही. रस्त्यात किती पण छोटीमोठी देवळं लागली की आपला हात छातीकडे जातोच. हातात बाबांची आंगठी आहे. 

आज सकाळी उठलो. निमूटपणे उठलो. गपचूप सगळं आवरलं. पेपरबिपर वाचले. पहिले वाचलं राशिभविष्य : अनपेक्षित धक्‍का!...असं नव्हतं. सुटकेचा नि:श्‍वास टाकला. चला, म्हणजे दिवस बरा जाईल असं दिसतंय. रस्त्यात मांजर आडवी गेली तर परत यायचं. एकच साळुंकी दिसली तरी परत यायचं. आज दोन साळुंक्‍या कुठे दिसतील? शोधल्या पायजेत. दोन साळुंक्‍या शुऽऽभऽऽ असं म्हंटात नाऽऽ...जमतील तितके शुभशकून घडवून मगच निघायचं. 

...तरी बरं यंदा दिवाळी बरीच आधी निघून गेली. पार कंदील उतरला. आता शिमग्याची वाट बघायची. पगारवाढ हुईल, हुईल, असं म्हणताना किती वर्ष गेली. आता नौकरी टिकली, हे काय कमीये, असं वाटायलंय!! तेही बरोबरच आहे. हल्ली कशाचं काही खरं राहिलं नाही. त्यात आपलं नशीब हे असलं. आधारकार्ड काढायला गेलो, तरी सतरा लोच्ये. जिथं तिथं आधारकार्ड कंपल्सरी. परवा पिक्‍चरला गेलो होतो. डोअरकीपरला आधारकार्ड काढून दाखवलं. तो बोलला, ''आपुनकू कायकू दिखाताय? सिर्फ टिकिट दिखाव!'' आपण बोललो, ''पगले, अभीसे प्रॅक्‍टिस करले, बाद में पछतायगा!'' आजकाल आपलं मन एकदम निब्बर झालं आहे. काहीही येऊ द्या, आपण फेस केलं पायजे. त्यातच मर्दपणा आहे. 

...धडधडत्या काळजानं खुंटीवरची प्यांट काढली. खुंटीवरची हां! खिसे तपासले. स्वत:चेच. दोनशेची एक नोट. धा-धाच्या तीन नोटी. एकूण दोनशेतीस. चला, म्हणजे क्‍याश फारशी नाही हे बरंच. कधी नव्हेत ते कडकीचं समाधान वाटलं. काय पण दिवस आले! पगाराच्या आठवड्यातच कडकीची खुशी!! ही दोनशेची नोट पण सुट्टी करून घेतली पाहिजे. उगीच रिस्क नको. मागल्या टायमाला हजारची नोट घेऊन दर दर भटकलो होतो. हजाराची नोट मोडली नाहीच, तीन हजाराची उधारी मात्र झाली. ती पुढचे किती महिने फेडत होतो. तेव्हापासून क्‍याशलेस झालो, तो अजूनपरेंत क्‍याशलेसच आहे. 

...आंघोळ करून कधी नव्हेत ते देवासमोर हात जोडले. अगरबत्ती लावली. देवा, लक्ष ठेव रे बाबा!! एवढा एक दिवस निभवून ने. बाकी वर्ष आहेच मग... 

तुमने क्‍या खोया? जो तुमने पाया? तुम्हारा क्‍या था? जो तुमने खोया? इस दुनिया में आने के वक्‍त तुम क्‍या लाये थे? इस दुनिया से क्‍या ले जाओगे?...गीतासार आठवून मन एकदम साफसुथरं झालं. खरं आहे...उगीच रडण्यात काय मतलब आहे? 

देवासमोर हात जोडलेले असतानाच पक्‍या आला. 

'' क्‍यालिंडरसमोर हात जोडून का उभा बाबा? आणि आठ नव्हेंबरच्या तारखेला येवढ्या फुल्या?,'' त्याने विचारले. आपण डोळे उघडले, तर समोर खरंच क्‍यालिंडर!! काय बोललो नाय. 

''आज धा लिटर दूध घेतलं? बासुंदी वाटतं!!'' तारखेच्या फुल्यांकडे बोट दाखवत पक्‍यानं चौकशी केली. दुधाच्या पिशव्या किती ह्याच्या फुल्या वाटल्या त्याला. येडा!! त्याला चूप केलं. 

''सांग ना, इतक्‍या फुल्या का मारल्यास मित्राऽऽऽ..?'' त्यानं नाद सोडला नाही. टाळकंच सटकलं. संतापून त्याला बोललो- 

''तोंड उघडायला लावू नको हां पक्‍याऽऽ...की देऊ फुल्या!!'' 

असू दे. हॅपी आठ नव्हेंबर. डोण्ट वरी. देव बघतोय...भरवसा ठेवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com