साहेबांची मुलाखत! (ढिंग टांग!)

Dhing Tang by British Nandi
Dhing Tang by British Nandi

थोरल्या साहेबांच्या पुण्यातील (पक्षी : ऐतिहासिक) मुलाखतीनंतर अवघा महाराष्ट्र मुलाखतमय झाला होता. मुलाखत घेणाराच इतका तालेवार की ती मुलाखत आपापत: ऐतिहासिक झाली. ही मुलाखत आमच्या एकमेव व लाडक्‍या साहेबांनीच घेतली होती. साहजिकच इतिहासपुरुषाची छाती रेल्वेच्या इंजिनासारखी धडधडत होती. कान टवकार्ले होते. नाक फिस्कार्ले होते. हातातील बोरू व भुर्जपत्रे सर्सावून तो बसला होता. मांडीला रग लागली होती. इतिहासपुरुषच तो... देखत डोळां इतिहास घडत असताना त्याची बैठक मोडणे अशक्‍यच. 

...नेमके सांगावयाचे तर तिथी फाल्गुनातली सप्तमी. होळी मुखावर आलेली. (मुखावर म्हंजे जवळ ह्या अर्थी... ऍक्‍चुअल अर्थ घेऊ नये.) स्थळ : कृष्णकुंज, शिवाजी पार्क, दादर. वेळ : पहाटे अकरा-साडेअकराची. आम्हाला बघूनच तळमजल्याशी बसलेल्या इतिहासपुरुषाने जीभ काढून आमच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत क्षणभर उग्र चमक आली. पण आमच्याकडे पाहून तो कान पाडून पुन्हा झोपी गेला. त्यास वाटले, हा आला म्हंजे आज काही इतिहासबितिहास घडत नाही... जाऊ द्या ह्याला. पण आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा निर्णायक वळण लावणारा निरोप घेऊन आलो होतो... 

दर मजला करीत आम्ही साहेबांच्या टॉप फ्लोअरच्या अंत:पुरात पोचलो. ''साहेब जागे आहेत का?'' आम्ही मनातल्या मनात स्वत:लाच विचारले. मग आठवले, साहेब हल्ली सकाळी सहाला उठतात. उठल्या उठल्या पुराव्यादाखल आम्हाला एक टायमिंगसहित सेल्फी पाठवतात. त्यामुळे ते जागेच असणार, हे नक्‍की. 

मुजरा घालून आम्ही गुमान उभे राहिलो. साहेब हातात एक मोठेसे प्याड घेऊन समाधी-अवस्थेत बसले होते. प्याडावर कोरा कागद. हातात काळ्या शाईचे पेन. 

''साहेब... विचारू?'' चाचरत आम्ही. आम्ही तोंड उघडताच इतिहासपुरुषाच्या छातीतील धडधड वाढली. शिवाजी पार्कातील कबुतरे अस्मानात उडाली. वळचणीच्या पाली चुकचुकल्या. हेल्मेट आणले असते तर बरे झाले असते, असे वाटून आम्ही मनातल्या मनात हळहळलो. पण आता उशीर झाला होता. 

''कॅयाय?'' साहेबांनी प्रेमाने परवानगी दिली. 

''थोरल्या साहेबांच्या आपण पुण्यात घेतलेल्या महामुलाखतीने महाराष्ट्राच्या राजकारणाला अद्वितीय वळण लागेल, असे तज्ज्ञ लोक म्हणताहेत!'' आम्ही अदबीने म्हणालो. 

''हं! पुढे?'' आमच्याकडे न बघता साहेबांनी कागदावर एक वळणदार रेघोटी मारली. 

''मुलाखत छान झाली, साहेब!'' 

''अभ्यास लागतो त्यासाठी... बरं!.. पंधरा दिवस प्रचंड अभ्यास करून मुलाखतीला बसलो होतो!'' साहेबांनी आणखी एक रेघोटी ओढली. 

''मुलाखत घेण्याची कला आपण कशी साध्य केली?'' आम्ही. 

''आधी आम्ही हा उद्योग केला होता... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांची रायगडावर आम्ही प्रदीर्घ ऐतिहासिक मुलाखत घेतली होती. प्रदीर्घ म्हणजे ती जवळ जवळ साडेतीनशे वर्ष चालली...'' साहेबांनी भराभरा आणखी काही पेनाचे फटकारे कागदावर मारले. 

''आपल्या मुलाखती ऐतिहासिकच असतात...'' आम्ही भक्‍तिभावाने म्हणालो. 

''मी फक्‍त ऐतिहासिक असेल तरच मुलाखत घेतो..,'' साहेब करड्या आवाजात म्हणाले. 

''आपल्याला गिटार आणि तबलाही वाजवता येतो, साहेब? व्यंगचित्र काढता येतात, मुलाखती घेता येतात, शिवाय गिटार, तबला...कलागुणांचा इतका समुच्चय महाराष्ट्राने आजवर पाहिला नाही...'' आम्ही अंत:करणपूर्वक म्हणालो. 

''यापुढे हीच कामं करायचं ठरवलं आहे... ह्यातसुद्धा करिअर करता येतं हल्ली!'' साहेबांनी सुनावले. 

''एक निरोप द्यायचा होता..'' आम्ही चाचरत म्हणालो. बोलावे की न बोलावे? 

''द्या...'' साहेब म्हणाले. देवा, हेल्मेट देगा देवा!! 

''आमचीही ऐतिहासिक मुलाखत घ्याल का अशी विचारणा झाली आहे... बांदऱ्याहून!'' आम्ही हिय्या करून निरोप दिला. पुढले काही आठवत नाही. इतिहासपुरुषाने लिहून ठेवले आहे की एक इसम रेल्वे इंजिनाच्या समोर उभा राहून बोलत असताना दुर्दैवाने- 

जाऊ द्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com