अमेरिकेतील मोकाट 'गन कल्चर' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

बंदूक बाळगण्याचा हक्क अमेरिकी राज्यघटनेने दिला असला, तरी कायद्यात बदल करून याबाबत काही निर्बंध आणण्याचा प्रयत्न बराक ओबामा यांनी अध्यक्षपदाच्या काळात केला होता. 'आपल्या आठ वर्षांच्या कारकिर्दीतील प्रमुख अपयश कोणते', असे विचारले असता 'बंदुकीविषयीचा नियंत्रण कायदा आणू शकलो नाही, हेच माझे ठळक अपयश,' असे ओबामांनी सांगितले होते. अमेरिकीतील 'गन लॉबी'चा प्रभाव किती निर्णायक आहे, याची कल्पना यावरून येते.

बंदूक बाळगण्याचा हक्क अमेरिकी राज्यघटनेने दिला असला, तरी कायद्यात बदल करून याबाबत काही निर्बंध आणण्याचा प्रयत्न बराक ओबामा यांनी अध्यक्षपदाच्या काळात केला होता. 'आपल्या आठ वर्षांच्या कारकिर्दीतील प्रमुख अपयश कोणते', असे विचारले असता 'बंदुकीविषयीचा नियंत्रण कायदा आणू शकलो नाही, हेच माझे ठळक अपयश,' असे ओबामांनी सांगितले होते. अमेरिकीतील 'गन लॉबी'चा प्रभाव किती निर्णायक आहे, याची कल्पना यावरून येते.

लास व्हेगास शहरात एका संगीताच्या कार्यक्रमात एका माथेफिरूने केलेल्या बेछूट गोळीबारात जवळ जवळ साठ जणांचे प्राण गेले, तर पाचशेहून अधिक जण जखमी झाले. या भयंकर अशा सामूहिक हत्याकांडानंतर आता पुन्हा तेथील 'गन कल्चर'चा मुद्दा चर्चेचा धुरळा उडवेल; पण त्यातून खरेच काही बदल घडेल काय, हा प्रश्‍न नेहमीप्रमाणे अधांतरीच राहील. हे काही अशा प्रकारचे पहिले हत्याकांड नाही. गेल्याच वर्षी ऑरलॅंडोमध्ये नाईट क्‍लबमध्ये झालेल्या गोळीबारात 49 जण मृत्युमुखी पडले. त्याआधी कनेक्‍टिकट प्रांतातील न्यू-टाऊन येथे एका व्यक्तीने वीस विद्यार्थ्यांची हत्या केली. आपल्या आईलाही त्याने मारले. ही यादी बरीच मोठी आहे. वर्षाला सरासरी तेराशे व्यक्ती गोळीबाराच्या घटनांमध्ये मृत्युमुखी पडतात, असे आढळते. विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, संगीताचे कार्यक्रम अशा ठिकाणी या घटना प्रामुख्याने घडतात. या प्रश्‍नाने एवढे भयंकर रूप धारण केले असूनही बंदुकीच्या अधिकाराचे समर्थक हे स्वसंरक्षणासाठी बंदूक आवश्‍यकच आहे, असा धोशा लावत असतात.

वास्तविक या सामूहिक हत्याकांडांचा तपशील पाहता संरक्षणासाठी नव्हे, तर हल्ला करण्यासाठीच बंदुकीचा वापर होत आहे, असे लक्षात आले आहे. त्यामुळे कायद्यातील बदलाचा विचार तेथील राजकीय वर्गाने करायला हवा. मात्र तेवढे पुरेसे नाही. हा बेबंद हिंसाचार केवळ कायद्यातील बदलाने संपुष्टात येईल, असे नाही. याची समाजशास्त्रीय कारणे शोधावी लागतील.

लास व्हेगास येथे गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा हेतू काय होता, याचा पोलिस तपास करीत आहेत. 'इसिस' या इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेने लास व्हेगास गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत असल्याचे जाहीर करून टाकले आहे. त्याची खातरजमा पोलिस करतीलच; परंतु इराक-सीरियातील प्रत्यक्ष युद्धात 'इसिस'ला सपाटून मार खावा लागत असल्याने 'दहशत' कमी होईल की काय, या विचाराने 'इसिस' पछाडलेली असू शकते. ते काहीही असले तरी हिंसेचा वाढता प्रादुर्भाव ही काळजीची बाब आहे आणि आशिया, आफ्रिकेतच नव्हे तर अमेरिकेसारखा सर्वार्थाने समृद्ध म्हणविणारा देशही त्यापासून मुक्त नाही, हे कटू वास्तव लास व्हेगासमधील गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा समोर आले आहे.