जाणून घेऊया महाराष्ट्राची पर्जन्यवृत्ती! 

Representational Image
Representational Image

या वर्षी अर्धा पावसाळा संपल्यानंतरही निम्म्याहून अधिक महाराष्ट्र अजूनही कोरडाच असल्याचं निरीक्षण हवामान खात्यातर्फे मांडण्यात आलंय. पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20 ते 60 टक्के कमीच पाऊस झाला आहे. मराठवाड्यातही जवळपास हेच चित्र असून विदर्भात अजूनही 40 टक्के कमतरता आहेच. जून, जुलै व ऑगस्टच्या 15 तारखेपर्यंत पावसाची ही स्थिती काळजी वाढवणारी असली तरी हे वास्तव महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्य आकृतिबंधाशी ( Rainfall pattern ) पडताळून पाहणंही तितकंच गरजेचं आहे यात शंका नाही. 

महाराष्ट्राच्या विविध भागांत आढळणारा पर्जन्यकाल हा कधीही सारखा नसतो. पर्जन्यकाळातील पावसाची विविधता ही केवळ सांख्यिकी दृष्ट्याच नाही तर पर्जन्य उपयुक्ततेच्या दृष्टीनंही महत्त्वाची आहे. पर्जन्यमानातील व पर्जन्यकाळातील या असमान वितरणाचे फार मोठे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या विविध भागांत नेहमीच जाणवत असतात. त्यामुळे निसर्गानंच पावसाच्या उपलब्धतेवर घातलेल्या भौगोलिक मर्यादा आणि तो देत असलेल्या सूचना यांचं नेमकं आकलन करून घेणं आवश्‍यक असतं. त्यासाठी अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राच्या पर्जन्यवृत्तीचा सविस्तर विचार करणं नेहमीच फायद्याचं ठरतं आणि त्यानंतर वाटणाऱ्या काळजीचं प्रमाणही कमी होतं. 

एकूणच महाराष्ट्रातील पाण्याची उपलब्धता ही पर्जन्याच्या विशिष्ट आकृतिबंध, लहरी व अनियमितता या बाबींवर अवलंबून आहे हे विसरून चालणार नाही. पावसाचे आकृतिबंध समजल्याशिवाय पाण्याची कमतरता कमी करण्याच्या सगळ्या योजना व प्रयत्न तोकडे पडू शकतात. 

महाराष्ट्रात किनाऱ्याकडून सह्याद्रीच्या दिशेनं पाऊस ज्या गतीनं वाढत जातो, त्यापेक्षाही जास्त वेगानं तो सह्याद्रीकडून पूर्वेकडे कमी होत जातो. सह्याद्रीच्या जास्त पर्जन्याच्या म्हणजे चार ते सहा हजार मिमी पर्जन्यप्रदेशाच्या पूर्वेकडे 100 किमी पट्ट्यातच पाऊस झपाट्यानं कमी होतो आणि त्याचं प्रमाण 500 मिमी इतकं होतं. सह्याद्री खऱ्या अर्थानं त्याचा पर्जन्यप्रदेश तयार करतो. लोणावळ्यात 4,300 मिमी पडणारा पाऊस त्याच्या पूर्वेस 25 किमीवर असलेल्या वडगाव इथे 1100 मिमी, 60 किमीवर पुण्यात 660 मिमी, तर त्यापुढे जेजुरी, बारामती, अकलूज, फलटण इथे केवळ 500 मिमी असा कमी होत जातो. पूर्व विदर्भाच्या दिशेनं पुन्हा एकदा पर्जन्यमानात थोडीफार वाढ होते. इथे 800 ते 900 मिमी इतका पाऊस होतो. म्हणजेच राज्यभरात पर्जन्यालेख हा खूपच अनियमितता दाखवितो. 

राज्यात उपलब्ध होणाऱ्या पर्जन्यापैकी कोंकण व सह्याद्रीतील बरंचसं पावसाचं पाणी पृष्ठप्रवाहाच्या स्वरूपात वाहत जातं. पर्जन्यछायेच्या प्रदेशात मुळातच पाऊस कमी पडतो. पाण्याचं आधिक्‍य व कमतरता यांचे आलेख काढले, तर असं स्पष्टपणे दिसतं की पर्जन्यछायेच्या प्रदेशात पृष्ठजलाची उपलब्धता होण्याइतकं पाण्याचं आधिक्‍य वर्षभरात केवळ सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिन्यातच आढळतं. परभणी, उस्मानाबाद, बीड इथे ते केवळ 74 ते 80 मिमी एवढंच असतं. परिणामी इथे नेहमीच दुष्काळी परिस्थिती राहते. 

या सर्व पर्जन्य आकृतिबंधात पर्जन्य दिनाला खूपच महत्त्व असतं. सामान्यपणे महाराष्ट्रात वर्षभरात तीनपेक्षा कमी पर्जन्य दिन कुठेही नसतात. सर्वांत जास्त म्हणजे 125 पर्जन्य दिन आंबोली या ठिकाणी नोंदवले जातात. कोकणात संपूर्ण वर्षात एकूण 80 ते 100 पर्जन्य दिन; तर सह्याद्रीत ते 100 ते 125 व पठाराच्या पश्‍चिम भागात ते 30 ते 60 इतके असतात. पूर्व महाराष्ट्रात हेच प्रमाण 50 ते 75 पर्जन्य दिन एवढं असतं. जुलै या मोसमी महिन्यात नेहमीच सर्वांत जास्त पर्जन्य दिनांची नोंद होत नाही. ती काही ठिकाणी ऑगस्टमध्येच होते. 

जून ते ऑक्‍टोबर या प्रमुख पर्जन्यकाळात 85 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडतो हे खरं असलं तरी अमोसमी काळात पडणारा अत्यल्प पाऊसही तितकाच महत्त्वाचा असल्याचं दिसून येतं. एकूण पर्जन्यमानाचा विचार करता, महाराष्ट्राचे पूर्व आणि पश्‍चिम असे अगदी सरळसरळ दोन भाग पडतात. किनारपट्टीचा प्रदेश, सह्याद्री व पश्‍चिम पठारी भाग येथे डिसेंबर ते मार्च या काळात अतिशय कमी पाऊस पडतो. फेब्रुवारी हा तर पश्‍चिम महाराष्ट्रात सगळ्यात कोरडा महिना असतो. पूर्वेकडे मात्र याच काळात पावसाचं प्रमाण थोडंफार वाढत जातं. मॉन्सूननंतर त्याच वर्षात जास्त पाऊस देणारा फेब्रुवारी हा पूर्व भागातला दुसरा ओला महिना असल्याचं दिसून येतं. पूर्व भागात सगळ्यात कोरडा महिना डिसेंबर हा आहे. 

महाराष्ट्राच्या पूर्व भागात डिसेंबर हा खऱ्या अर्थानं ईशान्य मॉन्सून व नैर्ऋत्त्य मॉन्सून यातील सीमारेषा आहे. पूर्व भागात हिवाळी पर्जन्य जानेवारी-फेब्रुवारी-मार्च या महिन्यांत सामान्यपणे होतोच; मात्र त्याचं प्रमाण केवळ 50 ते 60 मिमी एवढंच असतं. या काळात भंडारा येथे 35 मिमी, चंद्रपूर येथे 23 मिमी एवढ्या पावसाचीच नोंद होते. 

पश्‍चिम महाराष्ट्र या वेळी पूर्णपणे कोरडाच असतो. आगमन काळात पाऊस मुसळधार वृष्टीच्या स्वरूपात होतो. ऑगस्टमध्ये हे प्रमाण एकदम कमी होते. सप्टेंबरमध्ये सामान्यपणे रिमझिम स्वरूपात; तर कधी मुसळधार वृष्टी होते. ऑक्‍टोबरमधला पाऊस जमिनीतील आर्द्रता वाढविण्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असतो. या वर्षी हा आकृतिबंध खूपच बदलला असल्याचं दिसून येतं. 

महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात मृदेत साठलेलं पाणी वर्षभर टिकून राहील एवढं नसतं. महाबळेश्‍वर, माथेरान यांसारख्या जास्त वृष्टीच्या भागातील जमिनीतही पाणी साठत नाही. नोव्हेंबर ते मेमध्ये सगळीकडे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे कोरड्या ऋतूत थोडाफार पाऊस पडतोही; पण तो सगळाच कोरड्या जमिनीची धारणक्षमता वाढवण्यात खर्च होतो आणि जास्त पाण्याचा काहीच उपयोग होत नाही. 

अशा तऱ्हेच्या या नेहमीच्या आकृतिबंधावर आधारित उपलब्ध पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं आणि दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याचं भाकीत करणं शक्‍य होतं. इस्राईलमध्ये अत्याधुनिक शास्त्रीय यंत्रणा वापरून शेतकऱ्यांना अशा तऱ्हेच्या आपत्तीची सूचना प्रभावीपणे दिली जाते. आपल्यालाही ते करता येणं कठीण नाही. 

निसर्गानंच ठरविलेल्या भौगोलिक मर्यादा ओळखणं हा पर्जन्यवृत्तीच्या विश्‍लेषणातील एक महत्त्वाचा घटक आणि तो बाजूला ठेवून केलेलं विश्‍लेषण गोंधळही निर्माण करू शकतं. या मर्यादा समजण्यासाठी पर्जन्यमापनाची ठिकाणं अशा पद्धतीनं वाढविणं आवश्‍यक आहे की कोंकण, सह्याद्री, महाराष्ट्राच्या पठारी भागाचा पश्‍चिम भाग, मराठवाडा व विदर्भ येथील पर्जन्यमान, पर्जन्य दिन, पर्जन्यकाल, तापमान, वायुभार अशी सर्व माहिती आजच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. नैर्ऋत्य व ईशान्य मोसमी अशा दोन्ही कालखंडांसाठी गोळा केलेली माहिती जास्त उपयुक्त ठरते. 

त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कोंकण, सह्याद्री व पश्‍चिम पठारी भागाप्रमाणेच विदर्भ, मराठवाड्याचे जी.पी.एस.सारखे आधुनिक स्थाननिश्‍चिती तंत्र वापरून व उपग्रह प्रतिमा वापरून उंच-सखलपणा दाखविणारे सविस्तर नकाशे करणे गरजेचे आहे. प्रत्येक विभागासाठी हे नकाशे वेगवेगळे तयार केले, तर महाराष्ट्रातील पर्जन्यवृत्ती नेमकेपणानं कळण्यासाठी त्यांचा मोठाच उपयोग होऊ शकतो. 

महाराष्ट्रातील सध्याच्या पर्जन्य वितरणाचं वास्तव इथल्या सरासरी पर्जन्य आकृतिबंधाशी ( Rainfall pattern ) पडताळून पाहिलं, तर ही स्थिती काळजी वाढवणारी आहे, असं वाटत नाही, असं म्हणायला नक्कीच जागा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com