अखेर न्याय! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

बॉंबस्फोटांमुळे मुंबईच्या काळजावर उमटलेला व्रण आजही कायम आहे. न्यायालयीन खटल्याचा टप्पा पूर्ण झाला म्हणून तो पुसला जाणार नसला, तरीही आरोपींना कठोर शिक्षा सुनावण्यात आली, ही समाधानाची बाब. 

मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीला 24 वर्षांपूर्वी दिवसाढवळ्या एका दु:स्वप्नाला सामोरे जावे लागले होते. बारा मार्च 1993 रोजी मुंबापुरीत भीषण बॉंबस्फोट झाले आणि त्याचवेळी या देशात दहशतवादाने पहिले पाऊल टाकले. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, वित्तहानी घडविणाऱ्या या भीषण हल्लाप्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आल्याने याप्रकरणी कायदेशीर प्रक्रियेची तार्किक परिणती गाठली गेली आहे. मोहंमद ताहीर मर्चंट व फिरोज खान यांना फाशीची शिक्षा झाल्यामुळे या बॉंबस्फोटांच्या मालिकेत हकनाक प्राण गमवावे लागलेल्या अडीचशेहून अधिक निरपराध्यांच्या आप्तेष्टांना अखेर न्याय मिळाला आहे. त्यांचे दुःख भरून येणे अशक्‍य असले तरी आरोपींना कठोर शिक्षा होणे ही बाब महत्त्वाचीच आहे, यात शंका नाही. या बॉंबस्फोटांच्या मालिकेमागील मुख्य हात टायगर आणि याकूब मेमन होते. त्यांच्यापैकी याकूबला दोन वर्षांपूर्वी नागपूरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली आणि आता या कटाचा आणखी एक प्रमुख सूत्रधार अबू सालेम व करीमुल्ला खान यांच्यापासून फाशीचा दोर दूरच राहिला असला, तरी त्यांना आपले उर्वरित जीवन गजाआडच घालवावे लागणार आहे. दाऊद, मेमन बंधू तसेच अबू सालेम हे आपल्या सुरक्षा यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन फरारी झाले होते. त्यांच्यापैकी याकूबला भारतात आणण्यात तपास यंत्रणा यशस्वी झाल्या आणि त्यामुळेच तो फासावर लटकला. अबू सालेमला भारतात आणताना मात्र पोर्तुगीज सरकारशी झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार त्याला फाशीची शिक्षा न देण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळेच तो जन्मठेपेवर सुटला! अन्यथा, त्याचीही फाशी अटळच होती. पण या टप्प्यावर येण्यासाठी तब्बल दोन तपे गेली. हा कालावधी फार मोठा आहे. 

तपासयंत्रणांनी बहुतेक आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले. मात्र बॉंबस्फोटांच्या मालिकेमागील प्रमुख सूत्रधार कुख्यात 'डॉन' दाऊद इब्राहिम हा आजही फरारी आहे. एवढेच नव्हे, तर आपल्या शेजारी देशाच्या भूमीवर तो सुखेनैव आणि ऐषारामात राहत आहे! ही बाब मात्र यापुढेही डाचत राहणार. मुंबापुरीत 12 मार्च 1993च्या त्या दुर्दैवी दिवशी झालेल्या बारा बॉंबस्फोटांची नुसती आठवण झाली, तरी आजही अंगावर काटा उभा राहतो. मुंबईतील आर्थिक केंद्रे उद्‌ध्वस्त करणे, हा त्यामागील दाऊद व त्याच्या साथीदारांचा मुख्य हेतू होता. 'स्टॉक एक्‍सचेंज'मध्ये झालेल्या भीषण बॉंबस्फोटाने या मालिकेची सुरवात झाली आणि नंतरच्या तीन-चार तासांत एअर इंडियाचे नरिमन पॉइंट येथील मुख्यालय, जव्हेरी बाजार, सेंटॉर हॉटेल, वरळीचे पासपोर्ट कार्यालय आदी ठिकाणी स्फोट होत राहिले. या मालिकेतील एक स्फोट दादरच्या शिवसेना भवनालगत झाला होता आणि त्यामुळे दहशतवाद्यांचे 'लक्ष्य'ही स्पष्ट झाले होते. मुंबईच्या काळजावर या बॉंबस्फोटांमुळे उमटलेला व्रण हा आजही कायम आहे. मात्र, याच स्फोटांच्या आठवडाभर आधी राज्याची सूत्रे हाती घेण्यासाठी संरक्षणमंत्रिपद सोडून मुंबईत परतलेल्या शरद पवारांनी अवघ्या 24 तासांत मुंबईचे कोलमडून पडलेले जनजीवन रुळावर आणले. मुंबईकरांनीही त्या दिवशी आपले 'स्पिरिट' खऱ्या अर्थाने दाखवून दिले आणि सर्वांच्या अथक परिश्रमातून हे महानगर पुन्हा जोमाने उभे राहिले. 

या बॉंबस्फोट मालिकेला राजकीय व धार्मिक विद्वेषाची मोठी पार्श्‍वभूमी होती, हे नाकारता येणार नाही. अयोध्येतील पुरातन 'बाबरी मशीद' हिंदुत्ववाद्यांनी सहा डिसेंबर 1992 रोजी एका उन्मादात जमीनदोस्त केली आणि त्याचे पडसाद देशभरात हिंसाचाराने उमटले. 'बाबरीकांडा'च्या रात्रीच या दंगलींचे पहिले सत्र सुरू झाले आणि दोन आठवड्यांनी ते शमले तरी सूडाची भावना अनेकांच्या मनात धगधगतच होती. त्याची परिणती लगोलग जानेवारी 1993 मध्ये पुन्हा हिंसाचार सुरू होण्यात झाली. दंगलींच्या या दोन सत्रांत मिळून किमान 900 लोक मृत्युमुखी पडल्याची पोलिसदप्तरी नोंद आहे. त्याशिवाय कित्येक लोक अपंग झाले आणि लाखोंच्या मालमत्तेचीही हानी झाली. मुंबापुरीच्या इतिहासात इतका भीषण हिंसाचार कधीही झाला नव्हता. 'बाबरीकांड' आणि नंतरच्या दंगलींची ही दोन सत्रे यामुळे समाजात 'आपण' आणि 'ते' अशी कायमस्वरूपी दरी निर्माण झाली. 

मुंबईतील ती बॉंबस्फोट मालिका भले दाऊद, मेमन बंधू, अबू सालेम आणि अन्य अनेकांनी केवळ सूडाच्या भावनेतून रचलेली होती, हे खरे असले तरी त्यामागे काही आंतरराष्ट्रीय धागेदोरे होते आणि शेजारी देशांचे त्याला पाठबळ होते, हे पुढे उघड झाले आणि दहशतवादाने या महानगरात टाकलेले हे पाऊल पुढे देशाच्या अन्य भागांतही गेले. मुंबईतही त्यानंतर वर्षा-दोन वर्षांच्या अंतराने दहशतवाद अधूनमधून डोके वर काढतच राहिला. त्यामुळेच दहशतवादाला तोंड देण्याचे व्यापक आव्हान कदापिही विसरता येणार नाही. त्याबाबतीत अखंड सावधानतेला पर्याय नाही.