प्लास्टिकमुक्ती शक्‍य आहे! (अग्रलेख)

प्लास्टिकमुक्ती शक्‍य आहे! (अग्रलेख)

सिंदबाद आणि त्याच्या सफरींची गोष्ट माहीत असतेच आपल्याला. त्यातल्या एका सफरीत सिंदबादला एक वृद्ध गृहस्थ दिसतो. त्याला चालता येत नसल्याने तो सिंदबादला सांगतो, मला खांद्यावर घे आणि थोड्या अंतरावर घेऊन चल. त्या निर्जन बेटावर सोबत होईल म्हणून तो त्याला खांद्यावर घेतो खरा, पण तो गृहस्थ त्यानंतर उतरण्याचे नाव घेत नाही. 

प्लास्टिकच्या बाबतीत आपले तसेच काहीसे झालेय. आपल्या आयुष्याला चिकटलेले प्लास्टिक सुटता सुटत नाही. 

एकेकाळी लाकूड, पाने, कापड अशा पर्यावरणपूरक चीजवस्तूंचा वापर जिथे जिथे होत होता, अशा सर्व ठिकाणी प्लास्टिक दिसते आहे. 

प्लास्टिकने आयुष्याची सारी क्षेत्रे व्यापून टाकली असल्यामुळे प्लास्टिकची वाढ उद्योग म्हणूनही जोरदार आहे. देशभरात सुमारे पन्नास हजार कंपन्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. यात लघु आणि मध्यम उद्योग सर्वाधिक आहेत. कोट्यवधींचं पोट त्यावर अवलंबून आहे; त्यामुळे प्लास्टिकवर बंदी आणण्यासाठी सुरू असलेल्या चळवळीला विरोधही तेवढ्याच तीव्रतेने होतो आहे. "प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे नुकसान होते हे मान्य आहेच, पण या उद्योगामुळे देशाला परकीय चलनही मिळते, हजारो हातांना काम मिळते. हे उद्योग बंद पडले तर या उत्पन्नावर पाणी सोडण्याची आणि रिकाम्या हातांना काम देण्याची तुमची तयारी आहे का?' असा सवाल प्लास्टिक उद्योगांतील धुरिणांकडून केला जातो. त्यातील काही तर थेट आव्हानच देतात, की तुम्ही किमान एक दिवस किंवा दिवसातील काही तास प्लास्टिकपासून दूर राहून दाखवा, मग प्लास्टिक बंदीच्या मागण्या करा... 

पहाटे दारावर लटकवल्या जाणाऱ्या दुधाच्या पिशवीपासून प्लास्टिकशी आपली सोबत सुरू होते. आंघोळीसाठीची बादली, साबणाचे रॅपर, शॅम्पूची बाटली, कंगवा, पावडरचा डबा, टेबल, खुर्च्या, टिफीन बॉक्‍स, ऑफिसमधली स्टेशनरी अशा किती तरी गोष्टींमध्ये प्लास्टिक असते. याशिवाय दिवसभरात वापरल्या जाणाऱ्या वाहनांसारख्या अनेक गोष्टी अशा आहेत, ज्यात प्लास्टिकचा वापर असतो. प्लास्टिकचा खोडा आपल्या गळ्याभोवती असा घट्ट बसल्यामुळेच प्लास्टिक उद्योग असे आव्हान देण्याचे धारिष्ट्य दाखवू शकतात. 

कोणतीही गोष्ट हाताबाहेर जाऊ लागल्यावरच आपल्याला जाग येणे हेच आपले प्राक्तन असावे की काय अशी शंका येण्याजोगी परिस्थिती आहे. "सावध ऐका पुढल्या हाका' असे आपण फक्त म्हणायचे, पण प्लास्टिकच्या अतिवापरामुळे अखिल मानवजात संकाटात येईपर्यंत स्वस्थशांत राहायचे असेच गेली अनेक वर्षे सुरू आहे. याबाबत सवयीने केवळ प्रशासनाला दोष देऊ पाहतील काही, पण त्यातही फार अर्थ नाही. समाज म्हणून आपणही या समस्येसाठी तितकेच दोषी आहोत यासाठी हे आपण मान्यच करायला हवे. 

प्लास्टिकच्या भस्मासुराने पृथ्वी गिळायला सुरुवात केली असली, तरी त्यापासून सुटका शक्‍यच नाही असे मात्र नाही, पण परिस्थिती भयावह आहे हे नक्की. आपण, म्हणजे मानवाने आजवर सुमारे आठ अब्ज मेट्रिक टन प्लास्टिकचे उत्पादन केले असून, त्यापैकी सुमारे सहा अब्ज टन कचऱ्यात रूपांतरित झाले आहे. प्लास्टिकचे हे सारे अवशेष बहुतांश कचरा साठविण्याच्या जागांबरोबर साऱ्या पर्यावरणातही आढळत आहेत. याच वेगाने प्लास्टिकचे उत्पादन होत राहिले, तर काही वर्षांतच संपूर्ण पृथ्वी प्लास्टिकने ओसंडून जाईल. 

प्लास्टिकची अविघटनशीलता, टिकाऊपणा, पाण्याला प्रतिरोध हेच सुरुवातीला चांगले मानले जाणारे गुणधर्मच आता प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येसाठी कारणीभूत ठरत आहेत. सध्या तयार होत असलेल्या एकूण प्लास्टिक कचऱ्यापैकी केवळ नऊ टक्के प्लास्टिकचा पुनर्वापर होतो, 12 टक्के जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न होतो, बाकी सारे कचऱ्याच्या स्वरूपात पृथ्वीवर साठून राहते. या कचऱ्यामध्ये जमा होणारे बहुतांश प्लास्टिक विघटनशील नाही. त्यामुळे हा कचरा काही शतके किंवा हजारो वर्षांपर्यंत तसाच राहण्याची शक्‍यता आहे. शिवाय प्लास्टिकचा नवा कचरा वाढतो आहेच. परिणामी समुद्रात जमा होणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याचा आकार एका खंडाएवढा होऊ पाहतोय. 

पृथ्वीचा श्‍वासच कोंडावा अशीच ही परिस्थिती, पण प्लास्टिकच्या भस्मासुराला रोखण्याचे काम अवघड असले तरी अशक्‍य मात्र नाही. प्लास्टिकच्या वापराला थेट प्रतिबंध करणे, त्यावर सरसकट बंदी घालणे हा कायमस्वरूपी उपाय होऊच शकत नाही. त्याचा पुनर्वापर करणे, त्याचा वापर योग्य प्रकारे करणे, त्याच्या कचऱ्याचे वर्गीकरण योग्य पद्धतीने करणे हे त्यासाठीचे मार्ग ठरू शकतात. सध्या प्लास्टिक उद्योगात 60 टक्के कच्चा माल रिसायकल प्लास्टिकमधून येत असतो. तो सुरुवातीला 80 टक्के आणि नंतर नव्वद टक्‍क्‍यांवर नेता येईल का, याचा विचार करायला हवा. ज्या ठिकाणी प्लास्टिकला पर्याय देणे शक्‍य आहे तिथे तो मिळायलाच हवा. त्यासाठी प्लास्टिक लॉबीचे दडपण असेल तर झुगारून द्यायला हवे. 

मात्र हे काम चुटकीसरशी होणारे नाही. त्यासाठी अनेक वर्षांचे प्रयत्न आणि समाजप्रबोधन आवश्‍यक आहे. 

सिंदबादच्या गोष्टीमधल्या म्हाताऱ्यापासून सुटका होण्यासाठी सिंदबादची विचारशक्ती उपयोगी ठरली होती. प्लास्टिक बोकांडी बसलेल्या समाजाची सुटका होण्यासाठी विचारांबरोबर आचारशक्तीही लागणार आहे. ती निर्माण व्हावी यासाठी अनेक समाजसेवी संस्था कार्यरत आहेतच; मात्र हे प्रयत्न अधिक वेगवान आणि टोकदार करण्यासाठी मोठा रेटा आवश्‍यक आहे. समाजमनाला दिशा देणारे सकाळसारखे माध्यम त्यासाठी खूप मोठी भूमिका बजावू शकते हे लक्षात घेऊन आम्ही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वर्तमानपत्र आणि समाजमाध्यमातून मोहीम सुरू आहेच, पण त्याचबरोबर अनेक कार्यक्रमांचे आयोजनही केले जातेय. प्लास्टिकविरोधातल्या या लढाईची सुरुवात झालेली आहेच, आता गरज आहे ती सर्वांनी या लढाईसाठी शस्त्रे हाती घेण्याची, जी आहेत योग्य आचार आणि तारतम्य. प्लास्टिकचा वापर, पुनर्वापर आणि त्याच्या कचऱ्याच्या वर्गीकरणात ती वापरली तर ही लढाई जिंकणे आपल्यासाठी अजिबात अवघड नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com