आभाळमाया (अग्रलेख)

File photo
File photo

सर्वदूर झालेल्या दमदार पावसाने यंदापुरती काळजी कमी झाली. मात्र पाऊसमानाचे अनिश्‍चित स्वरूप लक्षात घेऊन कायमच्या चिंतामुक्तीसाठी प्रयत्न करीत राहावेच लागतील. 
 

मॉन्सूनचा प्रवास बेभरवशाचा होत असल्याचा अनुभव अलीकडील काळात अनेकदा आला आहे. जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे म्हणून ऋतुमानशास्त्र सांगते; पण केवळ पावसाळाच नव्हे, तर उन्हाळा व हिवाळाही त्याच्या ठरलेल्या कालावधीला चकवा देत असल्याचा अनुभव एव्हाना सवयीचा झाला आहे.

यंदाचा मॉन्सून मधल्या टप्प्यात गारठला होता. ऑगस्टमध्ये निम्मा महाराष्ट्र कोरडाच होता. 35 पैकी 20 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा 20 ते 60 टक्के कमी पावसाची नोंद होती; पण सप्टेंबरमध्ये परतीच्या प्रवासात मॉन्सूनने महाराष्ट्रात सर्वदूर दमदार हजेरी लावत काही ठिकाणचा सरासरीचा अनुशेष भरून टाकला आहे. राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख धरणे भरली व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, ही केवळ बळिराजासाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच सुखावह बाब आहे. 

गेल्या आठवड्यात राज्यभरात पावसाळी वातावरण आहे. जोरदार, धुवाधार स्वरूपाचा पाऊस झाल्याने काही ठिकाणी त्रेधाही उडाली. राज्यभरातील सुमारे 200 मंडळांत अतिवृष्टी झाल्याच्या नोंदी प्रसिद्ध झाल्या आहेत. खरे तर पावसाळा हा 'काळजी'चा असतो. काळजी अनेक अर्थाने असते. उन्हाळा ऐन टिपेला असताना लोक हैराण झालेले असतात. केव्हा एकदा मॉन्सून येतो याची प्रतीक्षा असते. हवामानाचे अंदाज येऊ लागतात. ते अनुकूल नसले तर काळजी वाढते. अनुकूल असले आणि प्रत्यक्षात तसे घडले नाही तरी काळजी वाटते. पाऊस वेळेवर सुरू होणार का? झाला तरी त्यात सातत्य राहणार का? पिके हाताला लागणार का? पिण्याच्या पाण्याची समस्या येईल का? अवर्षण, दुष्काळी स्थितीचा सामना तर करावा लागणार नाही ना? अतिवृष्टी, महापूर असे धोके तर नसणार ना? अशा एक ना नानाविध स्वरूपाच्या चिंतांची काळजी सर्वांना सतावत राहते. शेवटी निसर्ग हा सर्वश्रेष्ठ आहे. हवामानाचा अंदाज जरूर करता येतो; पण हमी थोडीच देता येते? आज विज्ञान व तंत्रज्ञान कमालीचे विकसित झाले आहे; पण माणसाला निसर्गावर मात करता आलेली नाही व येणार नाही. माणसाने हे वास्तव स्वीकारलेच पाहिजे. यंदाच्या पावसाने तूर्तास बऱ्याच अंशी राज्यवासीयांची काळजी कमी केली असे मात्र म्हणता येईल. कोयना, उजनी, जायकवाडी, भंडारदरा, पूर्णा, खडकवासला, गंगापूर, राधानगरी, काळम्मावाडी, चांदोली अशी राज्यातील प्रमुख धरणे भरली आहेत व त्यातून विसर्गही सुरू आहे. पावसामुळे शेती, पिण्याचे पाणी या दोन प्रमुख गरजा तर भागतातच; पण विजेच्या बाबतीतही दिलासा मिळतो. त्या अर्थाने महाराष्ट्राला आता काळजीचे कारण नाही. पश्‍चिम महाराष्ट्र, मध्य व उत्तर महाराष्ट्रात अधिक चांगली स्थिती आहे. मराठवाडाही तुलनेने सुखावला आहे. जायकवाडी धरण दहा वर्षांच्या खंडानंतर पूर्ण भरले हा मोठा दिलासा आहे. विदर्भाला पाऊस अजून हवा असला, तरी त्या प्रदेशातील धरणांतील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोचल्याने फार काळजी करावी लागेल अशी स्थिती नाही. 

गेल्या काही वर्षांत बळिराजासमोरील अडचणी डोंगराएवढ्या वाढल्या होत्या. अवर्षण स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबत नव्हते. नापिकी, त्यातून आलेला कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांना जगण्यातील स्वारस्यच हरपल्यासारखे वाटत होते. त्यातूनच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला. अन्य प्रश्‍नही होतेच. त्यातून शेतकऱ्यांचा संप हा अपूर्व असा अनुभवही राज्याने घेतला. त्यातले राजकारण, सत्ताधारी- विरोधकांचे आरोप, प्रत्यारोप आणि त्यानंतर झालेला कर्जमाफीचा निर्णय व आता त्या संदर्भातील अंमलबजावणीच्या पातळीवर सध्या सुरू असलेली कसरत हा सारा घटनाक्रम आठवून पाहण्यासारखा आहे.

पाऊस किती महत्त्वाचा आहे आणि पाऊस नसण्याने काय काय प्रकारची संकटे येऊ शकतात हे यातून कळून चुकते. पाऊस बेफाम, अमाप, प्रमाणाबाहेर झाला तर किती हाहाकार माजू शकतो, याचाही अनुभव 29 ऑगस्टच्या पावसाने केवळ राज्याच्या राजधानीलाच नव्हे, तर साऱ्या राज्याला दिला. 2005 च्या हाहाकाराच्या आठवणीनी अंगावर शहारे उभे राहिले. कोल्हापुरातही 13 सप्टेंबरला रात्री ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला.

अवर्षण काय किंवा अतिवृष्टी काय, नैसर्गिक प्रकोप तर आपण थांबवू शकत नाही; पण अशी स्थिती उद्‌भवलीच तर त्याला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. जीवित व वित्तहानीचे प्रमाण कमी व्हावे यासाठीची काळजी किंवा खबरदारी घेणे तर आपल्याच हाती आहे. ते आव्हान पेलण्याची क्षमता विकसित झाल्याची आपल्याकडे दुर्दैवाने फारशी उदाहरणे नाहीत. तुलनेने पाश्‍चात्त्य देशात ही यंत्रणा अधिक दक्ष असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. पाऊस येईलही व जाईलही. त्याचे स्वतःचे काही शास्र असेल. यंदापुरती काळजी कमी झाली असेल; पण कायमपणे काळजीमुक्तीसाठी प्रयत्न आपल्यालाच करायला हवेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com