स्वाभिमानीचे 'मिशन' (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा केंद्र व राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय अपेक्षितच होता. संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी तशी औपचारिक घोषणा केली असली, तरी तसे संकेत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ते देत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा केंद्र व राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय अपेक्षितच होता. संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी तशी औपचारिक घोषणा केली असली, तरी तसे संकेत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ते देत होते.

आताच्या घडीला संख्याबळाचे गणित पाहता केंद्र वा राज्यातील सरकारला 'स्वाभिमानी'च्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही. भाजपची सत्तेतील साथ सोडताना खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांच्या अनुषंगाने सत्ताधाऱ्यांवर शरसंधान करताना बरीच आगपाखड केली आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी व हमीभावाकडे दुर्लक्ष, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, कर्जमाफीतील त्रुटी, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण गेले तीन वर्षे सत्तेत सहभागी असताना ते काय करत होते हा प्रश्‍नही उरतोच.

महाराष्ट्र मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून सदाभाऊ खोत 'स्वाभिमानी'चे प्रतिनिधित्व करत होते. एकेकाळी ते 'स्वाभिमानी'ची मुलुखमैदानी तोफ होते; पण राजू शेट्टी व सदाभाऊ यांच्यात आलेले वितुष्ट व त्याअनुषंगाने अलीकडचा दीर्घकाळ दोघांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप टोकाला गेले होते. सदाभाऊंची संघटनेतून हकालपट्टीची औपचारिकता करण्यासही खासदार शेट्टीनी खूपच वेळ घेतला, यामागे त्यांची काही राजकीय अपहारिर्यता असणार हे स्पष्ट आहे.

अर्थात 'स्वाभिमानी'तून हकालपट्टी झाली असली तरी सदाभाऊंच्या मंत्री पदाला धक्का लागणार नाही, हे भाजपने स्पष्ट केले आहे. राजू शेट्टींना याचा मोठा राग आहे. याची कारणे अनेक असली तरी स्वाभिमानीच्या सत्तेतून एक्‍झीटमागे मुख्य कारण 'मिशन 2019 लोकसभा' हे असावे हा कयास बांधता येतो.

खरे तर भाजपसह विरोधी पक्षांनीही लोकसभेची प्राथमिक मोर्चेबांधणी एव्हाना सुरू केली आहे. राजू शेट्टी व 'स्वाभिमानी'ची तीच रणनीती आहे. लोकसभेत शेट्टी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. खासदारकीची त्यांची ही दुसरी टर्म आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी संघर्ष व आंदोलने करणारा आक्रमक नेता ही त्यांची ओळख सुरवातीला कोल्हापूर जिल्ह्यात व नंतर राज्य स्तरावही कौतुकाचा विषय ठरली. संसदेतील चांगली कामगिरी व देशपातळीवरील शेतकरी चळवळीतील अलीकडच्या काळातील त्यांचा सहभाग यामुळे त्यांची अशी एक प्रतिमा तयार झाली. संघर्ष व आक्रमक आंदोलने हीच आपली नाळ आहे. 2019 च्या लोकसभेला तोच मुद्दा निर्णायक ठरेल, असाच होरा 'स्वाभिमानी'चा दिसतो. शेट्टीनी त्यांची राजकीय मुत्सदेगिरी याआधीही सिद्ध केली आहे.