मोबाईल शुल्ककपातीचे तरंग 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ('ट्राय') 'इंटरकनेक्‍शन युसेज चार्जेस' चौदावरून सहा पैसे प्रतिमिनीट एवढे कमी केल्यामुळे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 'ट्राय'चा हा निर्णय 'रिलायन्स'च्या 'जिओ'साठी फायद्याचा आहे, तर 'आयडिया', 'एअरटेल', 'व्होडाफोन'सह अन्य कंपन्यांसाठी मारक ठरला आहे. त्यामुळे साहजिकच यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

'जिओ'च्या पंधराशे रुपयांच्या फोनच्या एक ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या 'लॉंच'चा आणि 'ट्राय'च्या आदेशाचा संबंध जोडण्यासही सुरवात झाली आहे; पण या क्षेत्रातील घडामोडींचा अभ्यास केला, तर 'ट्राय'ने दोन वर्षांपूर्वीच या दरांमध्ये कपात करण्यास सुरवात केली होती आणि दर दोन वर्षांनी आढावा घेण्याचेही त्याचवेळी घोषित केले होते. केवळ एवढेच नाही, तर आणखी तीन वर्षांनी हे दर शून्यावर आणणार असल्याचेही 'ट्राय'ने सूचित केले आहे.

खरे म्हणजे 'ट्राय'चा निर्णय सर्वसामान्य ग्राहकांच्या फायद्याचा आहे. कारण अंतिमतः त्यांच्या मोबाईलच्या बिलाची रक्कम कमी होणार आहे; पण तरीही या कंपन्या या निर्णयाला विरोध का करत आहेत, असा प्रश्‍न साहजिकच निर्माण होतो. त्याचे कारण आहे त्यांच्याकडून वापरण्यात येणारे जुने तंत्रज्ञान. 'रिलायन्स' वापरत असलेल्या नव्या तंत्रज्ञानामुळे त्यांना इंटरकनेक्‍शन चार्जेस हा 'बोजा' वाटतो, मात्र अन्य कंपन्यांना त्यांचा खर्च भागविण्यासाठी हे दर महत्त्वाचे असतात. 

'इंटरकनेक्‍शन युसेज चार्जेस' हे अशा ऑपरेटरने भरायचे असतात, ज्याच्या नेटवर्कमध्ये एखादा 'फोन कॉल' संपतो. 'जिओ'वरून कॉल मोफत करता येत असल्यामुळे त्या नेटवर्कवरून दुसऱ्या ऑपरेटरच्या नेटवर्कवर जाणाऱ्या कॉलचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी 'जिओ'चा फायदा होतो, तर अन्य कंपन्यांना खर्च उचलावा लागत आहे. हा खर्च वर्षाला किमान पाच हजार कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे आता तंत्रज्ञान बदलायचे की 'चार्जेस' कमी होऊ नयेत, यासाठी न्यायालयीन लढाई लढायची, याचा निर्णय अन्य कंपन्यांनी घ्यायचा आहे. 'ट्राय'च्या भूमिकेचा विचार केला आणि ग्राहकांच्या फायद्याचा विचार केला तर या कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरण्यास सुरवात करणेच दीर्घकालीन फायद्याचे ठरेल.