सौदीत 'सबकुछ' बिन सलमान 

सौदीत 'सबकुछ' बिन सलमान 

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी भ्रष्टाचार, अफरातफर, बनावट कंत्राटे आणि बेहिशेबी मालमत्तेचा ठपका ठेवून अकरा सौदी राजपुत्र, बडे व्यावसायिक आणि माजी मंत्र्यांना अटक केली आहे. देशाला खड्ड्यांत घालणाऱ्यांना सोडणार नसल्याचे स्पष्ट करून बिन सलमान यांनी आपल्या भाऊबंदांना ताब्यात घेऊन त्यांच्या सर्व अधिकारांना आणि संपत्तीला चाप लावला आहे. बिन सलमान यांची निर्विवाद सत्तेची हाव लपून राहिलेली नसताना भ्रष्टाचाराला विरोध हा फक्त मुलामा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. 

बिन सलमान हे सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अझिज यांचे पुत्र आहेत. कोणतीही ठोस राजकीय पार्श्वभूमी नसताना, आपल्या वाटेत येईल त्याला बाजूला करत त्यांनी युवराजपदापर्यंत मजल मारली आहे. मोहम्मद बिन नाएफ, अलवलीद बिन तलाल, मितेब बिन अब्दुल्लाह हे बिन सलमान यांच्यापेक्षा वयाने, अनुभवाने आणि वकूबाने मोठे राजपुत्र. या सर्वांना एक एक करीत लांब ठेवत बिन सलमान यांनी सौदीची सत्ता आपल्या हाती एकवटवली आहे. संरक्षण, लष्कर, प्रशासन, प्रसारमाध्यमे, आर्थिक समिती अशी सर्व ताकदवान खाती त्यांच्या ताब्यात आहेत. बिन सलमान वगळता हे सर्व राजपुत्र अमाप संपत्ती, वेगवेगळे व्यवसाय आणि जागतिक पातळीवरच्या बड्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध राखून आहेत. बिन सलमान यांना त्याचा जाच वाटतो. तो जाच आता त्यांनी दूर केला आहे. या अटकसत्राच्या काही तास आधी येमेनच्या सीमेवर एका सौदी हेलिकॉप्टरचा अपघात होऊन त्यातील सर्वजण मरण पावले. त्यात दोन सौदी राजपुत्रांचा समावेश होता! 

इतर राजपुत्रांच्या संपत्तीविषयी शंका घेऊन त्यांना ताब्यात घेणारे बिन सलमान स्वतः डोळे दीपवणाऱ्या ऐश्वर्यात जगतात. मात्र, सौदीत सध्यातरी 'सबकुछ' बिन सलमान अशी स्थिती आहे. सौदीच्या सिंहासनापासून पाऊलभरच दूर असणारे बिन सलमान यांचा हा मोठा विजय मानला जात आहे. चोवीस तासांतील घडामोडी निर्दयपणे सत्ता राबविण्याची त्यांची तयारी आणि मानसिकता दाखवते. सौदी आणि सौदीबाहेरील सर्व घटक या घडामोडीची नोंद घेतील याची काळजी त्यांनी घेतली आहे. येमेनमध्ये सौदी अरेबिया आणि इराण हे परस्परविरोधी गटांना मदत करीत आहेत.

गेली तीन वर्षे सुरू असलेल्या या संघर्षात सौदीला अपयश आले आहे. येमेनमध्ये इराणचे वर्चस्व कमी करायचे म्हणून बिन सलमान यांनी सौदीची अर्थव्यवस्था नाजूक असतानाही युद्धाचा घाट घातला. तो आता त्यांच्या अंगाशी येत आहे. इराणशी जवळीक साधली म्हणून कतारवर बंदी घालून त्याची कोंडी करण्याचा बिन सलमान यांचा प्रयत्न फसला आहे. सेनापती म्हणून येमेन आणि कतारचा प्रश्न बिन सलमान यांचा पराभव दर्शवतो. या अटकसत्राबरोबरच त्याच दिवशी बिन सलमान यांनी लेबेनॉनचे पंतप्रधान साद हरीरी यांना सौदीमध्ये पाचारण करून राजीनामा देण्यास भाग पाडले. सुन्नी असलेले हरीरी लेबेनॉनमध्ये शिया असलेल्या 'हेजबोल्लाह' गटासह सरकार चालवीत होते. जमेल तिथे शियाबहुल इराणला चेपायचे असा चंग बिन सलमान यांनी बांधलेला दिसतो. त्यामुळे, इराक, सीरिया आणि येमेननंतर आता नव्या युद्धक्षेत्रात, लेबेनॉनमध्ये सौदी-इराण झुंजतील असा कयास आहे. लेबेनॉन आणि सौदीमध्ये एकाच वेळी खळबळ माजवून बिन सलमान यांनी आपला इराणविरोधाचा सूर टिपेला नेला आहे. येमेन, कतारचा प्रश्न ते आता कसे हाताळतात हे बघावे लागेल. बिन सलमान आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जॅरेड खुशनर बऱ्याच प्रश्नांवर एकत्र येऊ पाहत आहेत. हे दोघे आपापल्या देशांतील सत्ताकेंद्राच्या जवळचे आणि अत्यंत विश्वासू मानले जातात. या दोघा तरुणांची युती पश्‍चिम आशियाच्या आणि जागतिक राजकारणाला नवे वळण लावेल, असे राजकीय जाणकारांना वाटते. 

बिन सलमान यांनी केवळ तीन वर्षांत सौदीच्या गादीवर अप्रत्यक्षपणे टाकलेली मांड आणि त्यांनी आपल्या स्पर्धकांच्या घडवलेल्या राजकीय शिकारीचा वेग थक्क करणारा आहे. सत्ता शहाणपण शिकवते असे म्हणतात. घरच्या आघाडीवर निरंकुश सत्ता मिळवलेले सौदी युवराज राज्याभिषेकाचा औपचारिक सोपस्कार लवकरच पार पाडतील. महत्त्वाकांक्षा वाढलेले बिन सलमान नंतर पश्‍चिम आशियाच्या प्रादेशिक नेतृत्वाच्या तयारीला लागतील असे स्पष्टपणे दिसते. त्यांच्या दिमतीला समस्त सुन्नीबहुल देश, समान विचारसरणी असलेले संयुक्त अरब अमिरातीचे तरुण नेते मोहम्मद बिन झाएद आणि ट्रम्प प्रशासन आहे. त्यामुळेच बिन सलमान यांचा वारू चौफेर उधळला तर नवल वाटण्याचे कारण नाही. त्या पट्ट्यावर नेतृत्व करण्याचे स्वप्न पडलेले बिन सलमान पहिले नेते नाहीत. इजिप्तचे गमाल नासर, अन्वर सादात आणि सीरियाचे विद्यमान अध्यक्ष बशर अल-असद यांचे वडील हाफिज अल-असद यांनाही असेच स्वप्न पडले होते. याच स्वप्नाच्या मोहासाठी त्यांनी आपापल्या देशाची सत्ता ताब्यात घेताना भ्रष्टाचारविरोधाच्या पदराखाली विरोधकांचा काटा काढला होता. बिन सलमान तोच जुना प्रयोग नव्याने रंगवत आहेत. त्यामुळेच, सत्ता त्यांना शहाणपण शिकवत आहे, असे म्हणता येणार नाही. ते शिकण्याच्या मनःस्थितीतही नाहीत. लयाला गेलेली सौदी राज्यकर्त्यांची जुनी पिढी आणि नव्या पिढीतील संपवलेली स्पर्धा बिन सलमान यांच्या पथ्यावर पडली आहे. इतर बड्या सौदी राजपुत्रांना मिळणारा खुराक बंद करून भविष्यातील सर्व घबाड आपल्याकडेच राहील याची तजवीज त्यांनी चोखपणे केली आहे. राजकीयदृष्ट्या धूर्त असलेले बिन सलमान असा 'फुलटॉस' सोडणार नव्हतेच. या अटकसत्रात त्यांनी हे सिद्धच केले आहे. मात्र, व्यवस्थेतील सर्व संस्था आणि यंत्रणा एका माणसापुढे लोटांगण घालत आहेत हे वास्तव पश्‍चिम आशियातील सर्वांगीण परिस्थिती आणि तिचे जागतिक परिणाम पाहता भयावह आहे. 

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com