क्रीडा संस्कृतीचा 'पाय'रव (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

एखाद्या खेळाच्या सामन्यात भाग घेणे वेगळे आणि देशात त्या खेळाची संस्कृती रुजणे वेगळे. फुटबॉलच्या बाबतीत आता त्या संस्कृतीची पदचिन्हे उमटू लागली आहेत. 
 

क्रीडा विश्‍वात 'ब्युटिफूल गेम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुटबॉलची 17 वर्षांखालील वयोगटाची विश्‍वकरंडक स्पर्धा भारतात शुक्रवारपासून दिमाखात सुरू झाली. या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय खेळाडूंचे फुटबॉल विश्‍वकरंडक स्पर्धा खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल. तसेच जगभरात लोकप्रिय असलेल्या फुटबॉलला भारतात नवसंजीवनी मिळेल. भारत आणि फुटबॉल म्हटले, की भुवया उंचावल्या जात होत्या.

एखाद्या खेळाच्या सामन्यात भाग घेणे वेगळे आणि देशात त्या खेळाची संस्कृती रुजणे वेगळे. फुटबॉलच्या बाबतीत आता त्या संस्कृतीची पदचिन्हे उमटू लागली आहेत. 
 

क्रीडा विश्‍वात 'ब्युटिफूल गेम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुटबॉलची 17 वर्षांखालील वयोगटाची विश्‍वकरंडक स्पर्धा भारतात शुक्रवारपासून दिमाखात सुरू झाली. या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय खेळाडूंचे फुटबॉल विश्‍वकरंडक स्पर्धा खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल. तसेच जगभरात लोकप्रिय असलेल्या फुटबॉलला भारतात नवसंजीवनी मिळेल. भारत आणि फुटबॉल म्हटले, की भुवया उंचावल्या जात होत्या.

जवळपास सात दशके भारत फुटबॉल विश्‍वकरंडक स्पर्धेपासून दूर होता. 1950च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला निमंत्रित करण्यात आले होते, त्या वेळी विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळण्यासाठी संघांना निमंत्रित केले जायचे. पण, केवळ बूट नसल्यामुळे भारताला त्या स्पर्धेत खेळता आले नव्हते. तेव्हापासून भारतीय संघ फुटबॉल विश्‍वकरंडक स्पर्धेचे केवळ दुरूनच दर्शन घेतो आहे. आता यजमान या नात्याने त्यांना थेट मुख्य फेरीतच खेळण्याची संधी मिळाली आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेचे आयोजन हीच मुळी भारतासाठी ऐतिहासिक घटना आहे. क्रिकेट, हॉकी या भारतात लोकप्रिय असलेल्या खेळांच्या विश्‍वकरंडक स्पर्धा भारतात झाल्या. अर्थात, या खेळात आपले अस्तित्व होते. फुटबॉलचे तसे नाही.

या खेळाच्या विकासाचा विचार करायचा झाल्यास आपण अजून पहिल्या पायरीपर्यंत पोचलेलो नाही. म्हणूनच ही विश्‍वकरंडक स्पर्धा ही आपली ओळख दाखवून देण्यासाठीची मोठी संधी आहे. या स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा अधिक लक्ष असेल, ते फुटबॉलला मिळणाऱ्या लोकप्रियतेकडे. आतापर्यंत 'फिफा' भारताकडे 'स्लिपिंग जायंट्‌स' म्हणून बघत होते. मात्र, अलीकडे भारतात कमालीचे यश मिळविणाऱ्या लीग स्पर्धा लक्षात घेता क्रीडा क्षेत्रातील जागतिक बाजारपेठेत भारताकडे 'पॅशनेट जायंट्‌स' म्हणून बघितले जात आहे. या स्पर्धेमुळे एक प्रकारे लोकप्रियतेची चळवळ निर्माण होणार आहे. फुटबॉलमध्ये दिग्गज असणारे देश आणि भारत यांच्यामध्ये एक मोठी दरी आहे. ती भरुन काढण्याची सुरवात या स्पर्धेमुळे होणार आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनानंतर त्या देशाच्या क्रीडा विकासाचा दर उंचावतो. क्रीडा विकासाची चळवळ देशांतर्गत निर्माण होते. क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. पण, नेमक्‍या याच आघाडीवर आपण हार पत्करली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा, युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अशा अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आपण आयोजन केले. पण, त्यानंतर पहिले पाढे पंचावन्न अशीच आपल्या क्रीडा क्षेत्राची गत राहिली. या सगळ्यात पुन्हा एकदा क्रिकेट अपवाद ठरते. भारताने 1983 मध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धा जिंकली काय अन्‌ देशातील क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून गेला. इतका की आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत महासत्ता झाला आहे. मग ही गोष्ट अन्य स्पर्धांबाबत का घडली नाही?

विश्‍वकरंडक स्पर्धेच्या निमित्ताने 'महाराष्ट्र मिशन वन मिलियन' हा अनोखा उपक्रम राबविला गेला. एकाच दिवशी दहा लाख मुले-मुली फुटबॉल खेळण्यासाठी मैदानावर उतरल्या. क्रीडा खात्याने मनावर घेतले की काय होते हे या उपक्रमातून दिसले. अर्थात, अशा उपक्रमामुळे आपल्या फुटबॉलचा दर्जा उंचावणार नाही. पण, फुटबॉलच्या विकासाला चालना मिळेल हेही नसे थोडके. आज युरोप, आफ्रिकी आणि दक्षिण अमेरिकी देशांच्या वरिष्ठ संघातील फुटबॉलपटू इतके परिपक्व कसे असा प्रश्‍न उभा राहतो. याचे कारण म्हणजे या सर्व देशांमध्ये 6, 8, 10, 12 वर्षे वयोगटांपासून मुले फुटबॉलचे सामने खेळतात. त्यामुळे वरिष्ठ गटापर्यंत येईपर्यंत तो खेळाडू परिपक्व झालेला असतो. आपल्याकडे नेमके हेच होत नाही.

मुलगा वयात आल्यावर फुटबॉलकडे वळतो. हाच विचार ही युवक विश्‍वकरंडक स्पर्धा बदलायला लावणार आहे. नुसत्या एका विश्‍वकरंडक स्पर्धेच्या आयोजनामुळे कित्येक दशकानंतर भारतात तंदुरुस्ती आणि खेळाबाबत सळसळता उत्साह दिसून येत आहे. प्रत्येकाचे राहणीमान वेगवान झाले आहे. त्यामुळे तंदुरुस्तीचे महत्त्व पटू लागले आहे. सायकलिंग, धावणे याबाबतची जागरुकता निर्माण होऊ लागली आहे. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन भारताला क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी प्रेरक ठरू शकते. फुटबॉल विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळण्याचे एक स्वप्न साकार झाले, आता याचा आधार घेऊन फुटबॉल आणि पर्यायाने क्रीडा विकासाचे नवे स्वप्न आपण बघायला काहीच हरकत नाही.