ताजमहालवर पडदा! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

ताजमहाल भले जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक असो; उत्तर प्रदेश सरकारच्या मते ते साधे पर्यटनस्थळही नाही! उत्तर प्रदेशाची सूत्रे योगी आदित्यनाथ यांच्या हाती गेल्यानंतर राज्य सरकारला हा साक्षात्कार झाला आहे. आदित्यनाथ यांनी काही महिन्यांपूर्वीच 'ताजमहाल हे भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत नाही!' असे जाज्ज्वल्य उद्‌गार काढले होते, या पार्श्‍वभूमीवर मग त्यांच्या सरकारने प्रकाशित केलेल्या उत्तर प्रदेशातील पर्यटनस्थळांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेत ताजमहालचा उल्लेख नसणे अपरिहार्यच होते.

'अपार संभावनाये' असे या पुस्तिकेचे शीर्षक असून, त्यात उत्तर प्रदेशातील अनेक आणि विशेषत: हिंदूधर्मीय तीर्थक्षेत्रांचा प्रामुख्याने उल्लेख आहे. अयोध्येचा उल्लेख तर त्यात आहेच; शिवाय वाराणसीच्या प्रख्यात दशाश्‍वमेध घाटावरील सुप्रसिद्ध 'गंगा आरती'चे छायाचित्रही आहे. मात्र, दरवर्षी करोडो पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या ताजमहालचा साधा उल्लेखही या पुस्तिकेत नाही. 

सरकारने अधिकृतरीत्या प्रसिद्ध केलेल्या या पुस्तिकेवरून वादळ उठणेही मग अपेक्षितच होते. केवळ भारतीयच नव्हे, तर परदेशी प्रसारमाध्यमांनीही त्यावरून उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरले आहे. टीकेचा हा भडिमार बघून अखेर कोणे एकेकाळी कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असलेल्या आणि आता भारतीय जनता पक्षाच्या छावणीत गेलेल्या रीटा बहुगुणा-जोशी यांना सरकारच्या समर्थनार्थ मैदानात उतरवण्यात आले आहे. त्या राज्याच्या पर्यटनमंत्रीही आहेत आणि त्यांनी 'आग्रा हे कसे उत्तर प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर असून तेथे मेट्रो वगैरे आणून हे शहर कसे अल्पावधीतच 'स्मार्ट सिटी' बनवण्यात येणार आहे,' असे पुराण लावले आहे. मात्र, त्यांचे हे आग्रापुराण ऐकल्यावरही ताजमहालला पर्यटनस्थळांच्या यादीतून वगळण्यामागील सरकारचा हेतू लपून राहिलेला नाही.

हिंदुत्ववाद्यांनी एका उन्मादात 25 वर्षांपूर्वी अयोध्येतील बाबरी मशीद जमीनदोस्त केली, तेव्हाच त्यांनी 'अयोध्या तो बस झांकी है; काशी-मथुरा बाकी है!' अशी घोषणा दिली होती. त्यांची ती मनीषा अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र, त्यावरून त्यांचे अंतःस्थ हेतू उघड झाले होते. आता ताजमहालला पर्यटनस्थळांच्या यादीतून वगळल्यामुळे आदित्यनाथांची पावले हिंदू वगळता अन्य संस्कृती पडद्याआड टाकण्याच्या दिशेने कशी मार्गक्रमण करत आहेत, यावर प्रकाश पडला आहे. अर्थात, त्यामुळे जगभरात हसू झाले तरी त्याची सरकारला पर्वा आहे कोठे?

Web Title: marathi news marathi websites Taj Mahal Yogi Adityanath BJP Uttar Pradesh Tourism