'तृणमूल'मधील तणातणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

काँग्रेसमधल्या अतिकेंद्रीकरणाला, एकाधिकारशाही वृत्तीला विरोध करून ममता बॅनर्जी यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला आणि त्याला नावही मोठे अन्वर्थक दिले, तृणमूल काँग्रेस. गवताचे मूळ ज्याप्रमाणे जमिनीशी घट्टपणे जोडलेले असते त्याप्रमाणे आपला पक्ष पश्‍चिम बंगालच्या मातीत रुजलेला आहे, असे यातून ममता बॅनर्जी यांना सूचित करायचे होते.

काँग्रेसमधल्या अतिकेंद्रीकरणाला, एकाधिकारशाही वृत्तीला विरोध करून ममता बॅनर्जी यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला आणि त्याला नावही मोठे अन्वर्थक दिले, तृणमूल काँग्रेस. गवताचे मूळ ज्याप्रमाणे जमिनीशी घट्टपणे जोडलेले असते त्याप्रमाणे आपला पक्ष पश्‍चिम बंगालच्या मातीत रुजलेला आहे, असे यातून ममता बॅनर्जी यांना सूचित करायचे होते.

पश्‍चिम बंगालमधील तीन दशकांची कम्युनिस्ट राजवट उलथवण्याचा राजकीय पराक्रम करून त्यांनी आपला दावा सार्थही केला, त्याला आता सहा वर्षे उलटून गेली आहेत. पण ज्या गोष्टींच्या विरोधात ममता बॅनर्जी भूमिका घेत, त्याच बाबतीत आता त्यांच्यावरही आरोप होऊ लागले आहेत. हा कदाचित सत्तेचा परिणाम असेल. कारणे काहीही असोत; परंतु ममता बॅनर्जी यांच्या एककल्ली कारभाराच्या विरोधात पक्षात धुसफूस सुरू झाली आहे.

मुकुल रॉय या एकेकाळच्या पक्षातील अत्यंत प्रभावशाली नेत्याने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा, कार्यकारिणीचा राजीनामा दिला असून, राज्यसभा सदस्यत्वही सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. गेले काही महिने ते अस्वस्थ होते आणि ज्या पद्धतीने त्यांना महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवण्यात येत होते, ते पाहता कधी तरी हे घडणारच होते. वाहतूकविषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून त्यांना आधीच हटविण्यात आले होते. आता दुर्गापूजेनंतर ते आपल्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट करणार आहेत.

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे नारायण राणे दसऱ्याला सीमोल्लंघन करणार की नाही, ही चर्चा सुरू आहे, त्याचप्रमाणे रॉय यांच्या बाबतीत पश्‍चिम बंगालमध्ये होत आहे.

पक्षवाढीसाठी संघटनात्मक विस्तारापेक्षा वेगवेगळ्या नेत्यांवर गळ टाकण्याचा प्रयोग भारतीय जनता पक्षाने ठिकठिकाणी चालविला आहे. रॉय यांच्याबाबतीतही तो चालू असल्याचे सांगितले जाते. त्रिपुरात तृणमूल काँग्रेसची आख्खी शाखाच विसर्जित केली गेली आणि त्यातील जवळजवळ सर्व सदस्य भाजपच्या तंबूत सामील झाले. एकूणच भाजपची आयातमोहीम जोरात असली तरी त्याची राजकीय फलनिष्पत्ती काय होणार हे लगेच सांगता येणार नाही; परंतु 'तृणमूल'चा विचार करता ममता बॅनर्जी यांना आपल्या कारभारात समावेशकता आणावी लागेल, हे मात्र नक्की.

Web Title: marathi news marathi websites trinamool congress Mamata Banerjee