नैतिकतेची ऐशीतैशी (अग्रलेख)

नैतिकतेची ऐशीतैशी (अग्रलेख)

प्रचारमोहिमेसाठी ट्रम्प यांनी ज्यांना जवळ केले होते, त्यांचे उपद्‌व्याप अमेरिकी राजकारणाचा स्तर किती खालावला आहे, याची कल्पना आणून देतात. 
शिवाय शीतयुद्धकालीन एकारलेल्या राजकारणाचा अध्याय संपलेला नाही, याचीही जाणीव होते. 

राजकारणाच्या रणधुमाळीत भाग घेणाऱ्यांना सत्तासोपान गाठायचा असतो आणि लोकांची मते आपल्याकडे खेचून घेण्यासाठीच्या स्पर्धेला निवडणुकीत कमालीचे कडवट स्वरूपही प्राप्त होते. यात काही अस्वाभाविक नाही. हे कोणत्याही लोकशाही देशात आढळणारे वास्तव असले, तरी या कडव्या संघर्षालादेखील नियमनाची एक चौकट असतेच. नीतिनियमांइतकेच प्रदीर्घ काळातील अनुभवांतून रुजलेले संकेतही या बाबतीत महत्त्वाचे ठरतात. साऱ्या दुनियेला लोकशाहीचे धडे देणाऱ्या अमेरिकेसारख्या देशाच्या बाबतीत तर हे गृहीतच धरले जाते; पण तेथील 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीतील गैरव्यवहारांची लक्तरे ज्या पद्धतीने चव्हाट्यावर येत आहेत, ते पाहता तेथील राजकारणाचा ऱ्हास किती वेगाने होत आहे, याची कल्पना येते.

या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी हासिल करून डोनाल्ड ट्रम्प यांनी तमाम राजकीय पंडितांना चकित केले आणि अध्यक्षपद जिंकून तर साऱ्या जगालाच धक्का दिला. प्रशासनाचा सोडाच; परंतु राजकीय-सार्वजनिक कार्याचा अनुभव गाठीशी नसतानाही ही मुसंडी त्यांनी मारली; परंतु ती मारताना त्यांनी जमा केलेल्या गोतावळ्यातील एकेकाने जे काही उपद्‌व्याप केले आहेत, त्याचे स्वरूप मती गुंग करणारे आहे.

2016च्या या गाजलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने बरीच लुडबुड केली आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्याविरोधात बदनामीची मोहीम उघडली, असा आरोप सातत्याने होत आला आहे. रॉबर्ट म्यूलर यांनी केलेल्या सखोल चौकशीनंतर आता त्या आरोपांना पुष्टी मिळते आहे. फेडरल ग्रॅंड ज्युरींनी एकूण 12 आरोपांबाबत ट्रम्प यांचे प्रचार व्यवस्थापक पॉल मनाफोर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यावर ठपका ठेवला आहे. या दोघांनी जी अनेक कारस्थाने केली, त्यांचे स्वरूप अमेरिकी संघराज्याविरुद्धचा कट असे आहे. युक्रेनमधील रशियाचा समर्थक असलेल्या राजकीय पक्षांसाठी काम करण्याच्या निमित्ताने त्यांनी प्रचंड माया गोळा केली आणि हे उत्पन्न कराच्या जाळ्यात येऊ नये, याचा खटाटोप केला. मनाफोर्ट यांनी 2006 पासून केलेली कृत्ये आणि कुलंगडी तपास यंत्रणांनी खणून काढायला सुरवात केल्यानंतर राजकारणातील माफियागिरीचे जे दर्शन घडते, ते उद्विग्न करणारे आहेच; पण त्याहीपेक्षा धक्कादायक आहे ते ट्रम्प यांचे विधिनिषेधशून्य वर्तन.

राजकारणाला सार्वजनिक कार्याचे काही ना काही अधिष्ठान असावे लागते, याचा पत्ताच नसलेल्या ट्रम्प यांनी कुठलीच चौकट मानायची नाही, असा पवित्रा घेतला. येईल त्याला आपल्या तंबूत घेतले. ना त्याचा पूर्वेतिहास तपासला, ना त्याच्या प्रवेशाला काही दुसरी कसोटी लावली. पक्षाच्या धुरीणांना त्यांनी धुडकावून लावले आणि अपारंपरिक राजकारणाच्या नावाखाली स्वैराचारालाच प्रतिष्ठा देण्याचा उद्योग केला. आता मोठ्या मानभावीपणे ते म्हणताहेत, की मनाफोर्ट व रिकी गेट्‌स यांच्यावरील आरोप आपली प्रचारमोहीम सुरू होण्याच्या आधीचे आहेत. तपास यंत्रणांनी डेमोक्रॅटिक पक्षाने केलेल्या 'गैरव्यवहारांना'ही चौकशीचे लक्ष्य करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ती अपेक्षा अवाजवी म्हणता येत नसली, तरी जे किटाळ त्यांच्यावर आले आहे, ते त्यांना सहजपणे झटकता येणार नाही. ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेतील त्या दोघांच्या भूमिकेचा आरोपपत्रात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही हे खरे; पण नैतिक जबाबदारीचे काय? अर्थात असले प्रश्‍न ट्रम्प यांना छळत नाहीत, त्यामुळे खाका वर करून ते मोकळे झाले. 

या प्रकरणाला जो आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघर्षाचा पदर आहे, तोही महत्त्वाचा आहे. प्रतिस्पर्धी देशाच्या निवडणुकीत लुडबूड करून आपले ईप्सित साध्य करायचे, ही वृत्ती काही नवी नाही; परंतु माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करून साळसूदपणे हे कसे घडविले जाते, हे रशियाने या निवडणुकीदरम्यान केलेल्या कृत्यांवरून कळते. रशियाशी आपले लागेबांधे असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगत आहेत; परंतु त्यांच्या प्रचारआघाडीतील परराष्ट्रविषयक विभागाचे धोरण सल्लागार जॉर्ज पॅपेडोप्युलस यांनी जी कबुली दिली आहे, त्याने या खुलाशापुढेही प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.

चौकशीदरम्यान, रशिया सरकारच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेबाबत आधी आपण दिलेली माहिती खोटी होती, अशी कबुली त्यांनी दिली आहे. हॅकिंग करायचे, गोपनीय माहिती पळवायची असले अनेक उपद्‌व्याप करण्यामागे रशियाचे राज्यकर्ते नव्हते, असे म्हणणे ही भाबडेपणाची हद्दच म्हणावी लागेल. पुतीन यांच्याविरुद्ध रशियात आंदोलन झाले तेव्हा आंदोलकांविषयी अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांनी सहानुभूती व्यक्त केली होती. पुतीन सरकारच्या विरोधात त्या ठाम भूमिका घेत. शिवाय फ्रान्ससह युरोपातील इतरही देशांत रशियाने वेगवेगळ्या प्रकारे हस्तक्षेप केल्याचे आढळून आले आहे. हे पाहता प्रचारमोहिमेत क्‍लिंटन यांच्याविरोधात वातावरण तयार करण्याचे डावपेच रशियाने खेळले असणार यात आश्‍चर्य वाटण्याजोगे काही नाही. शीतयुद्धकालीन कट-कारस्थानांची आणि शत्रुकेंद्री राजकारणाची प्रवृत्ती नाहीशी झालेली नाही, हाच याचा अर्थ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com