माउंट एव्हरेस्टचं 'एव्हरेस्टपण' जपायला हवं 

उमेश झिरपे
शनिवार, 10 जून 2017

यंदाचा एव्हरेस्ट मोसम नुकताच संपला. सतत बदलणारे खराब हवामान, चढाईसाठी आलेल्या गिर्यारोहकांच्या गर्दीचा उच्चांक, अंतिम चढाईसाठी अनुकूल हवामानाची अनिश्‍चितता, एव्हरेस्ट सर केल्यानंतर परतीच्या मार्गावर मृत्युमुखी पडलेले गिर्यारोहक, शेरपांच्या नव्या पिढीत कष्ट उपसण्याचे अन्‌ गिर्यारोहकासाठी जिवाची बाजी लावण्याचे कमी झालेले प्रमाण असे अनेक धक्के यंदा एव्हरेस्टला पचवावे लागले. 

यंदाचा एव्हरेस्ट मोसम नुकताच संपला. सतत बदलणारे खराब हवामान, चढाईसाठी आलेल्या गिर्यारोहकांच्या गर्दीचा उच्चांक, अंतिम चढाईसाठी अनुकूल हवामानाची अनिश्‍चितता, एव्हरेस्ट सर केल्यानंतर परतीच्या मार्गावर मृत्युमुखी पडलेले गिर्यारोहक, शेरपांच्या नव्या पिढीत कष्ट उपसण्याचे अन्‌ गिर्यारोहकासाठी जिवाची बाजी लावण्याचे कमी झालेले प्रमाण असे अनेक धक्के यंदा एव्हरेस्टला पचवावे लागले. 

याआधी 2013 मध्ये उली स्टेकसह तीन गिर्यारोहकांशी शेरपांचे 'कॅम्प 3' वर झालेले भांडण, 2014 मधील हिमप्रपात, 2015 मधील भूकंप या पार्श्वभूमीवर यंदा एव्हरेस्ट जणू काही रागावल्यासारखा वाटला. ऊर्जेचा, सकारात्मकतेचा स्रोत असणारा एव्हरेस्ट थकलेलासुद्धा वाटला. गेली सात वर्षे मी एव्हरेस्ट परिसरात सातत्याने जातो आहे. या नगाधिराजाला खूप जवळून अनुभवले आहे. उणे 40 अंश तापमान, ताशी 100 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहणारे वारे, प्राणवायूचे हवेतील अत्यंत विरळ प्रमाण, हाडे गोठवणारा हिमवर्षाव, खोलीचा अंत न लागणाऱ्या हिमखाई अशा अडथळ्यांसह 'डेथ झोन' पार करून जगातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे आकर्षण कुणाला नसेल? मात्र एव्हरेस्टमुळे मिळणारी प्रसिद्धी, त्यातून मिळणारा पैसा पाहून अलीकडे नवशिक्‍यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एव्हरेस्टवर असा मानवनिर्मित ताण वाढत आहे. यंदा जेमतेम 35 ते 40 टक्के गिर्यारोहकच मोहीम यशस्वी करू शकले. इतकेच नव्हे तर तब्बल सात गिर्यारोहकांचा मृत्यू चढाईदरम्यान झाला. यात जगप्रसिद्ध गिर्यारोहक उली स्टेकचाही समावेश होता. यातील पाच जण एव्हरेस्ट सर केल्यानंतर या यशाचा जल्लोष करू शकले नाहीत. 

मी 2011 पासून अनेक मोहिमा जवळून अनुभवल्या आहेत. तेथील शेरपा, स्थानिक लोक, चढाईसाठी आलेले विविध देशांचे विविधरंगी गिर्यारोहक या साऱ्यांशी संवाद साधला आहे. नेपाळच्या अर्थव्यवस्थेमध्ये एव्हरेस्टचा असलेला मोलाचा वाटा त्याचे बाजारीकरण अधिक वेगाने करण्यास कारणीभूत आहे. अतिउंच पर्वतशिखरांवर सहज वावरण्याची नैसर्गिक देणगी आणि उपजत क्षमता लाभलेला शेर्पा समाज हा गिर्यारोहकांचा सखा, मार्गदर्शक, मदतनीस म्हणून अनेक दशके काम करत आहे. परंतु, त्यांची नवी पिढी अधिकाधिक व्यवहारी होताना दिसत आहे. त्याचा परिणाम अर्थातच एव्हरेस्टवर होताना दिसत आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे 'साउथ कोल'मधून तब्बल डझनभर ऑक्‍सिजन सिलिंडर चोरीला गेले. त्याचा परिणाम म्हणून काही गिर्यारोहकांची न होणारी शिखर चढाई यशस्वी झाली व काहींना शिखर चढाईपासून केवळ वंचितच राहावे लागले नाही, तर ते त्यांच्या प्राणांवरही बेतले. 2015 मध्ये भूकंप झाला, तेव्हा 'कॅम्प 2' लागले होते. तेथे तंबू टाकून शेरपांनी अतिउंचीवर प्रज्वलित होणारे महागडे स्टोव्ह व इतर साहित्य ठेवले होते. भूकंपात ते गाडले गेले. यंदा हे साहित्य मिळविण्याचा खटाटोप काही शेरपांनी केल्याचे आरोप झाले. 'जिथे आग तिथे धूर' या न्यायानुसार यात एक टक्का जरी तथ्य असले तरी ते वेदनादायक आहे. 

एव्हरेस्टलादेखील संवेदना आहेत. त्यामुळेच बाजारीकरण, पैसा, हव्यास, खोटेपणा यांच्या वेढ्यात अडकल्याने तो नाराज आहे. अनेक वर्षे गिर्यारोहकांना अंगाखांद्यावर खेळवलेल्या एव्हरेस्टला कोत्या मनाचा गिर्यारोहक नको आहे. त्याच्यावर प्रेम करणारा, साहसाची मनापासून साधना करणारा गिर्यारोहक त्याला हवा आहे. निस्सीम भावनेने निसर्गाला देव मानणाऱ्या गिर्यारोहकांनी साद घातली, तर निसर्गाचा हा राजा खुल्या मनाने सर्वांना आपलेसे करेल यात तिळमात्र शंका नाही. ग्लोबल वॉर्मिंग, पर्वतमाथ्यावरील वितळणारे बर्फ, हवामानात अचानक होणारे बदल या भौतिक समस्यांना तोंड देण्याचे मानसिक बळ एव्हरेस्ट व त्यावर चढाई करणारे गिर्यारोहक या दोघांनाही हवे असेल, तर या पर्वतश्रेष्ठाला जपावे लागेल. एव्हरेस्टचे 'एव्हरेस्टपण' जपण्याची जबाबदारी केवळ गिर्यारोहकांची नव्हे, तर तुमची-आमचीसुद्धा आहे.