महायुद्धातील शौर्याची आठवण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

इस्रायलच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'हायफा' या बंदरपट्ट्यातील गावाला आवर्जून भेट दिली, त्याला कारण तिथे उभे असलेले भारतीय जवानांचे युद्धस्मारक. पहिल्या महायुद्धाच्या काळात इथे तब्बल 44 जवानांना वीरमरण आले. ही युद्धगाथा फारशी चर्चेत नसते, याचे प्रमुख कारण एवढेच, की हे युद्ध घडले तेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची पहाटसुद्धा झाली नव्हती आणि इस्राईल या देशाची निर्मितीही.

मधल्या काळात इतिहासाने अनेकदा कूस बदलली आहे. 23 सप्टेंबर 1918 रोजी लढल्या गेलेल्या या 'हायफा'च्या युद्धाला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होतील. या जवानांना श्रद्धांजली वाहणारे एक स्मारक बंगळुरूमध्येही स्थित आहे. दरवर्षी भारतीय लष्कर मात्र या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना समारंभपूर्वक श्रद्धांजली वाहते. किंबहुना 23 सप्टेंबर हा आपल्या लष्करात 'हायफा दिन' म्हणूनच ओळखला जातो. 

सुमारे शतकभरापूर्वी पहिले महायुद्ध ऐनभरात असताना ब्रिटिशांच्या जोखडाखाली जगत असलेला भारत हा अनेक संस्थानांमध्ये वाटला गेलेला होता. या संस्थांनांपैकी जोधपूर, हैदराबाद आणि म्हैसूर ही मातब्बर आणि झुंजार सैन्य बाळगून असलेली संस्थाने होती. ब्रिटिशांच्या इंपिरिअल फौजेसमवेत इथल्या सैनिकांच्या तीन पलटणीही तेथे गेल्या. गाझा पट्ट्यातील इस्राईल आणि पॅलेस्टाइनच्या इलाख्यात ओटोमन साम्राज्याचे वर्चस्व होते. ओटोमनांना जर्मन तोफा आणि ऑस्ट्रियन दारूगोळ्याची सुसज्ज रसद होती. अशा परिस्थितीत ब्रिटिश जनरल ऍलनबी यांच्या नेतृत्वाखाली जोधपूर आणि म्हैसूरच्या भालाबाज घोडदळांनी पराक्रमाची शर्थ करत ऑटोमन वर्चस्व मोडून काढले. भारतीय सैनिकांची अचूक भालाफेक आणि घोडदौड याची अचंबित करणारी अनेक वर्णने पहिल्या महायुद्धाच्या इतिहासात आढळतात, त्यात प्रामुख्याने 'हायफा'च्या लढाईचा उल्लेख होतो. तब्बल 1350 ऑटोमन आणि जर्मन सैनिकांना जेरबंद करून भारतीय पलटणींनी तिथला मुबलक दारूगोळा आणि दाणागोटा हस्तगत केला. तथापि, हे युद्ध जिंकताना भारतीय जवानदेखील रणभूमीवर पडले. त्यांचे तीनमूर्ती स्मारक आज 'हायफा'मध्ये उभे आहे. जोधपूर, म्हैसूर आणि हैदराबादच्या या तीन मूर्ती. 

गेल्या 70 वर्षांत पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानाने इस्रायली भूमीवर पाऊल ठेवले. अर्थातच 'हायफा'च्या युद्धस्मारकावर श्रद्धासुमने वाहण्यासही तेवढाच काळ गेला. चालायचेच. सर्वच युद्धे सर्वांच्या स्मरणात राहतात, असे नव्हे.