झाली उपेक्षा तरीही... (अग्रलेख)

justin trudeau with Captain Amrinder Singh
justin trudeau with Captain Amrinder Singh

'भारतातील कोणत्याही फुटीरतावादी चळवळीस कॅनडा कधीही पाठिंबा देणार नाही,' हे कॅनडाच्या पंतप्रधानांचे आश्‍वासन महत्त्वाचे आहे. परस्पर सहकार्य वृद्धिंगत होण्यास त्यामुळे मदत होईल. 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडू सध्या सहकुटुंब सहपरिवार भारत भेटीवर आहेत आणि गेल्या चार दिवसांत साबरमती आश्रमात सूतकताई करण्यापासून ते क्रिकेट खेळण्यापर्यंत आणि अमृतसरच्या सुवर्णमंदिरात पोळ्या लाटण्यापासून ते ताजमहालला भेट देण्यापर्यंत नानाविध उद्योगांत ते गढून गेल्याचे दिसून येत आहे! एरव्ही कोणत्याही देशाचे प्रमुख भारतात आले की त्यांना कडकडून मिठी मारून, त्यांची गळाभेट घेणारे, त्यायोगे त्यांना सतत प्रकाशझोतात ठेवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांकडे मात्र जरा दुर्लक्षच केल्याचे दिसते!

अर्थात, त्यास दोन पदर आहेत. एक म्हणजे कॅनडा हा भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या पातळीवर फारसा महत्त्वाचा देश नाही आणि दुसरा त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'खलिस्तानी' फुटीरतावादी चळवळीच्या सूत्रधारांनी त्या देशात, म्हणजे कॅनडात बसवलेले बस्तान. त्यामुळे मोदी यांनी ट्रुडू यांच्या भेटीस फारसे महत्त्व दिलेले नसावे. त्यावरून अपेक्षेप्रमाणेच प्रसारमाध्यमांमध्ये वादळही उठले; पण सुदैवाने ते चहाच्या पेल्यातीलच ठरले. कॅनडात सध्या बारा लाखांहून अधिक भारतीय वास्तव्यास असून, त्यात शिखांची संख्या मोठी आहे. 1980च्या दशकात भारतात 'खलिस्तानी' चळवळीने उग्र रूप धारण केले, तेव्हा त्या चळवळीची सूत्रे कॅनडातूनच हलवली जात असल्याचे स्पष्ट झाले होते. ट्रुडू यांच्या भेटीस ही पार्श्‍वभूमी होती. त्यातच दिल्ली येथील ट्रुडू यांच्या सन्मानार्थ आयोजित मेजवानीस कुख्यात 'खलिस्तानी' दहशतवादी जसपाल अटवाल यास निमंत्रण दिले गेल्याचे वृत्त आले आणि कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीसमवेत अटवालचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ उडाली.

मात्र, अखेरीस 'कॅनडा, भारतातीलच काय, जगभरातील कोणत्याही फुटीरतावाद्यांना पाठिंबा देणार नाही,' असे स्पष्ट आश्‍वासन देणे ट्रुडू यांना भाग पडले. त्यामुळे ट्रुडू यांच्या भारतातील पर्यटनप्रवण दौऱ्याचा शेवट तरी गोड झाला असेच मानावे लागेल.

'भारताच्या एकात्मतेवर कॅनडाचा विश्‍वास आहे आणि त्यामुळेच भारतातील कोणत्याही फुटीरतावादी चळवळीस कॅनडा कधीही पाठिंबा देणार नाही,' अशी ठाम भूमिका ट्रुडू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासमवेतच्या चर्चेत घेतली. आता 'आम्हाला मोठाच दिलासा मिळाला आहे!' हे कॅप्टनसाहेबांचे उद्‌गार या दिलाशाची साक्ष आहेत. 

अमरिंदरसिंग यांनी या चर्चेत 'खलिस्तानी' दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी कॅनडाकडून सहकार्य मिळावे, अशी रास्त भूमिका घेतली होती. कॅनडातील 'खलिस्तानी' फुटीरतावाद्यांकडून पंजाबात दहशतवादी कारवायांसाठी मोठी आर्थिक रसद व शस्त्रास्त्रे पुरवली जात असल्याचा मुद्दाही कॅप्टनसाहेबांनी या वेळी उपस्थित केला होता. त्यासंबंधात कॅनडाच्या पंतप्रधानांनी सकारात्मक सहकार्याचे आश्‍वासन दिल्यामुळे खलिस्तानवाद्यांना चपराक बसली आहे. त्यामुळे अन्य काही नाही तरी ट्रुडू यांच्या भारत भेटीचे हे मोठेच फलित मानावे लागेल. 

कॅनडा आणि भारत यांचे संबंध प्रदीर्घ काळापासूनचे असून कॅनडाच्या तीन पंतप्रधानांनी 2001 ते 10 या काळात भारताला भेट देऊन, परस्परसहकार्याचे आणि सामंजस्याचे अनेक करार केले होते. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही 'जी-20' परिषदेच्या निमित्ताने 2010 मध्ये कॅनडा दौरा केला होता, तर मोदी यांनीही दोन वर्षांपूर्वी कॅनडाचा दौरा करून तेथील व्यापार-उद्योग समूहातील बड्या प्रमुखांना दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार वाढवण्याचे आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर ट्रुडू यांच्या भेटीचे महत्त्व होते. आपल्या भारत दौऱ्यात कॅनडातील 'खलिस्तानी' दहशतवाद्यांचा बीमोड करण्याचे त्यांनी दिलेले आश्‍वासन तर महत्त्वपूर्ण आहेच.

शिवाय, त्यांनी मुंबईत उद्योगजगतातील अग्रणी, तसेच बॉलिवूड स्टार यांची घेतलेली भेटही सकारात्मक ठरू शकते. कॅनडा हा निसर्गसौंदर्याने नटलेला देश आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या कॅनडातील चित्रीकरणास पुढाकार घेतला गेला, तर दोन्ही देशांदरम्यान काही प्रमाणात निर्माण झालेली दुराव्याची दरी थोडीफार भरून येऊ शकते. मोदी यांच्या कॅनडा दौऱ्यात 'इस्रो' आणि 'कॅनडियन स्पेस एजन्सी' यांच्यात सहकार्याचा करार झाला होता. ट्रुडू यांच्या दिल्लीतील भेटीगाठीनंतर आता या सहकार्यासही वेग येऊ शकतो. राहता राहिला प्रश्‍न तो ट्रुडू यांची मोदी यांनी उपेक्षा केल्याचा! मात्र, दोन्ही देशांमधील सहकार्याची चर्चा होत राहणे महत्त्वाचे आहे, असे 'फायनॅन्शियल पोस्ट' या कॅनडातील वृत्तपत्राने म्हटले आहे. ते लक्षात घेता शिष्टाचाराशी संबंधित एखाद-दुसऱ्या घटनेने दूरगामी दुष्परिणाम होतील, असे मानण्याचे कारण नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com