प्रीती पटेल : वादाच्या भोवऱ्यातील 'कर्तृत्व'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

नाममुद्रा : हॅरो येथे जन्मलेल्या प्रीती या इसेक्‍स विद्यापीठात "ब्रिटिश सरकार आणि राजकारण' या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच, मार्गारेट थॅचर यांच्या व्यक्‍तिमत्त्वाची त्यांना भुरळ पडली होती.

थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात प्रीती पटेल या पुनश्‍च एकवार मंत्री झाल्या, तेव्हा त्यांच्याकडे ब्रिटनच्या भावी पंतप्रधान म्हणून बघितले जात होते. मात्र मंत्रिपदावर असताना, त्यांनी केलेल्या असमर्थनीय उपद्‌व्यापांमुळे पंतप्रधानपद तर सोडाच; मंत्रिपदावरही पाणी सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे आणि त्यामुळेच भारतीय वंशाचा कोणी ब्रिटनचा पंतप्रधान होण्याचे स्वप्नही कोसो मैल दूर गेले आहे.

प्रीती पटेल या युगांडात स्थलांतरित झालेल्या भारतीय दांपत्याच्या कन्या. मात्र त्यांच्या जन्माआधीच हे दांपत्य ब्रिटनमध्ये येऊन दाखल झाले होते. हॅरो येथे जन्मलेल्या प्रीती या इसेक्‍स विद्यापीठात "ब्रिटिश सरकार आणि राजकारण' या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच, मार्गारेट थॅचर यांच्या व्यक्‍तिमत्त्वाची त्यांना भुरळ पडली होती. पुढे त्यांनी ब्रिटनच्या हुजूर पक्षाच्या संशोधन विभागात; तसेच अन्य काही उद्योगसमूहांतही काम केले. मात्र राजकारणाचे वारे तेव्हाच त्यांच्या डोक्‍यात शिरले होते. 2005 मध्ये त्यांनी निवडणूक लढवलीही; पण तेव्हा त्यांना पराभूत व्हावे लागले.

अखेर 2010 मध्ये इसेक्‍समधून त्यांनी ब्रिटनच्या संसदेत प्रवेश केला आणि पुढे 2014 मध्ये त्या अर्थखात्याच्या मंत्रीही झाल्या! तेव्हापासून त्यांचा रथ हा जमिनीपासून चार अंगुळे वरूनच दौडू लागला. डेव्हिड कॅमेरॉन यांच्या मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश होताच. पुढे युरोपियन युनियनच्या प्रश्‍नावरील जनमत कौलानंतर कॅमेरॉन यांनी राजीनामा दिला, तरी नंतर थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्या वाट्याला आंतरराष्ट्रीय विकास खाते आलेच. मात्र नेमके हेच खाते त्यांच्या अंगाशी आले आहे.

मंत्रिपद सांभाळत असताना त्या सुटीवर गेल्या त्या थेट इस्राईलला आणि तेथे त्यांनी इस्राईलच्या पंतप्रधानांपासून अनेकांशी द्विस्तरीय संबंध आणि अन्य काही प्रश्‍नांवर चर्चा केली! मात्र हे प्रकरण त्यांच्यावर शेकण्यास कारणीभूत ठरले ते त्यांनी या चर्चांसंबंधात थेट पंतप्रधान मे यांना अंधारात ठेवल्यामुळे. "बीबीसी' या प्रख्यात वृत्तसंस्थेने त्यांच्या या उपद्‌व्यापाचे बिंग फोडले आणि त्यांचे पितळ उघडे पडले. अखेर, या साऱ्याची परिणती त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागण्यात झाली. प्रीती पटेल या आक्रमक आणि ब्रिटनमधील स्थलांतरितांच्या नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र या अशा कारणांवरून त्यांना कधी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असा विचार त्यांच्या विरोधकांनीही केला नसेल.

Web Title: marathi news priti patel personality profile