टेक्‍निक! 

Pune News Editorial Pune Dhing Tang Technique
Pune News Editorial Pune Dhing Tang Technique

स्थळ : कमळ महाल, खाजगीकडील दालन! 
वेळ : बिकट. 
प्रसंग : कष्टप्रद. 
पात्रे : चि. सौ. कमळाबाई आणि...आम्ही!! 
भर्जरी पैठणी आणि शालूअवगुंठित सौ. कमळाबाई एकट्याच बसल्या होत्या. चिंतातुर होत्या, अस्वस्थ होत्या. येरझारा घातल्याने त्यांना हल्ली दम फार लागतो. वजन कमी करा, असे डागतरांनी सांगितले आहे, पण कार्यबाहुल्यामुळे त्यांना हल्ली वेळेचे नियमन जमत नाही. म्हणून त्या नुसत्याच पलंगावर बसून बशीतील पिस्ते-बदाम खात होत्या. आसपासच्या दाश्‍यांना बाहेर हाकलून त्यांनी खाजगीकडील सेवकाला, म्हंजेच आम्हाला पाचारण केले. अब आगे... 

आम्ही : (मुजरा करत) मुजरा बाईसाहेब! चाकराची अवचित आठवण केलीत? 
कमळाबाई : (तंद्रीतच) हं! 
आम्ही : (किंचित खाकरत) काही काम होतं? 
कमळाबाई : (उसळून) मेल्या, शिळोप्याच्या गप्पा मारायला तुला बोलावू का आता? कामच होतं! पाणी आण जरा!! 
आम्ही : (अदबीने) वाटीत गरम पाणी आणू की गिलासात थंड? 
कमळाबाई : (चवताळून) मेल्या, थोबाड फोडीन! वाटीत गरम पाणी? उकळत्या पाण्यात तुलाच- 
आम्ही : (तात्काळ गार पाणी पुढे करत) घ्या, बाईसाहेब! 
कमळाबाई : (पाणी पिऊन थंड होत) आम्हाला किनई एक प्रश्‍न पडलाय! 

आम्ही : (नम्रपणे) कुठला? 
कमळाबाई : (बोलू की न बोलू..?) आमच्या उधोजीसाहेबांचं काय करायचं, हेच आम्हाला समजत नाहीए बोआ! 
आम्ही : (खांदे उडवत) त्यांचं काय व्हायचं, ते करायला ते समर्थ आहेत की!! आपण कोण करणारे? 
कमळाबाई : (गाल फुगवून) ते रागावलेत आमच्यावर! वेगळं व्हायचं म्हणताहेत!! किती दु:ख होतंय आम्हाला म्हणून सांगू? (डोळ्यांना पदर लावतात.) 

आम्ही : (शहाजोग सल्ला देत) तुम्ही नका उगीच डोळे गाळू, बाईसाहेब! त्यांना जायचं तर जाऊ द्यात हो! जाऊन जाऊन जाणार कुठे म्हणा!! 
कमळाबाई : (दुखावून) तसं नाही! कशीही असली तरी आमच्या प्रेमाची माणसं ती!! दुरावली की डोळ्यात पाणी येणारच नं? 
आम्ही : (अनवधानाने) हडळीला नाही नवरा नि झोटिंगाला नाही बायको!! 
कमळाबाई : (संतापून) जीभेला काही हाड आहे की नाही? हडळ कोणाला म्हणतोस रे? 

आम्ही : (खजील होत) म्हण वापरली हो!! 
कमळाबाई : (भिवई उडवत) असा काही उपाय सुचव की उधोजीसाहेब आम्हाला सोडून जाणार नाहीत, आणि आमच्याही डोक्‍याला ताप होणार नाही!! 
आम्ही : (जरा विचार करत)...तसं सोपं आहे! आधी एक डावी भिवई उडवायची. मग उजवी. लगोलग डावा डोळा काचकन मिटायचा. माणूस जागच्या जागी ढेर होतोय. बघा प्रयत्न करून! 

कमळाबाई : (दोन-चार प्रयत्नांनंतर) मेले दोन्ही डोळे एक्‍काच वेळी मिटतात, नाहीतर उघडतात! हे कसं जमावं? 
आम्ही : (जिद्‌दीनं) नाही जमत? छ्या...तुम्ही अगदीच "ह्या' आहात!! बरं, दुसरी आयडिया ट्राय करू!! डाव्या हाताची दोन बोटं जुळवा....अशी नाही हो...अशी!! हां!! कट्‌टीबट्‌टीमधली बट्‌टी करतात ना, तशी!! ओके. आता पिस्तुलाची खिट्‌टी वरखाली सरकवल्यासारखं करायचं. लगोलग बोटं रोखून फाडकन गोळी झाडायची. माणूस जागच्या जागी खल्लास होतोय, बघा! 

कमळाबाई : (एकाच प्रयत्नात जमल्याच्या आनंदात) जमलं!! हे गोळी घालण्याचं काम जमलं फक्‍कड!! तुला कशा सुचतात रे ह्या आयडिया? (खुशीत) हा घे बदाम तुला!! बक्षीस!! 
आम्ही : (आशाळभूतपणे) एकच? 
कमळाबाई : (शंकेखोरपणे) पण ह्या टेक्‍निकनंही नाही काही जमलं तर काय करायचं? 
आम्ही : (सुरक्षित अंतर राखून)...न जमायला काय झालं बाईसाहेब! गेली पंचवीस वर्षं हेच तर चालू आहे ना? जय महाराष्ट्र. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com