माझं असंही दैनिक

 Pune News Editorial Pune Majh Dainik written by Asavari Kakade
Pune News Editorial Pune Majh Dainik written by Asavari Kakade

स्वतःशी रोज नव्यानं संवाद करणारं एक दैनिक चालवतेय मी केव्हापासून. याची संपादक, लेखक, मुद्रक, प्रकाशक आणि वाचक सर्वकाही मीच आहे. या दैनिकाचं नाव आहे "रोजनिशी'. या अंतर्मुख स्वसंवादात नुकत्याच घडलेल्या, सलत राहिलेल्या एखाद्या घटनेसंदर्भात स्वतःचीच उलटतपासणी घेतली जाते. स्वतःला धारेवर धरत आत्मपरीक्षण केलं जातं. त्यातून स्वतःच्या मर्यादा स्पष्ट होतात.

काय करता आलं असतं असा विचार होतो. या प्रक्रियेत नकळत स्व-समुपदेशन होत राहातं. या रोजनिशीत माझ्या घाबरटपणाचा मी बऱ्याचदा समाचार घेतलाय. त्या अनुषंगानं भीती म्हणजे काय? ती का वाटते? नेमकी कशाची असते ती? असा विचार होत राहिला. भीती वाटते त्याअर्थी माणसात या भावनेचे हेतूपूर्वक नियोजन झाले असणार. 

काय असेल तो हेतू? भीती अगदीच कुचकामी असणार 
नाही... माणसाला सावध, दक्ष करणं ही तिची सकारात्मक भूमिका असणार... असा काय काय विचार करून स्वतःला समजावलं तरी भीती आणि ती वाटण्याचा त्रास यातून सुटका होईना. 

सदानकदा ही आपली हजर! अजून पाऊस नाही. तल्खली शिगेला पोचलीय. म्हणून भीती. आभाळ भरून आलंय. वादळ, विजांची लक्षणं दिसतायत. भीती हजर! मग तिच्या पाठोपाठ अख्खी प्रश्नावली आणि तिचं शेपूट असलेली खंत. या संदर्भातल्या विचारांच्या रियाजामुळं एकदा भीतीनंतरची ही जुनी प्रतिक्रिया बदलली. एकदम वाटलं की ही भीती माझी नाही! "ही माझी नाही' या वाटण्यामुळं नंतरचं नेहमीचं आवर्तन थांबलं. तिला थारा न मिळाल्यामुळं ती आली तशी निघून गेली. अर्थात यामुळं भीतीतून कायमची सुटका झाली असं नाही. पण भीतीशी किंवा कुठल्याही आंतरिक शत्रूशी कसं वागायचं ते त्यावेळच्या 
"समुपदेशना'त समजलं. 

आपल्या अवतीभोवती बरंच काही घडत असतं. चहूकडून अंगावर धावून येणाऱ्या जगभरातल्या बातम्या एका स्तरावर आपल्याला हैराण करत असतात. बाह्य वास्तवाला तोंड देतादेता हताश व्हायला होतं. कुठेतरी काहीतरी घडतं आणि लोक रस्त्यावर येऊन तोडफोड करत सुटतात. आपल्या गल्लीत... कॉलनीत... शेजारी... अगदी घरातही वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या प्रकारे अशी "तोडफोड' होत असते. आपण या 
सगळ्याशी अविभाज्यपणे जोडलेले असतो. या सर्व बाह्य वास्तवाचे पडसाद आपल्या आत उमटत राहतात. ते आतली व्यवस्था विस्कटून टाकतात. आपल्या विवेकावर आघात करतात. 

ही गुंतागुंत आपल्याला गोंधळवते. काय करावं हे सुचेनासं होऊन जातं. बाहेरची कुठलीच "तोडफोड' रोखणं आपल्या हातात नाही. पण आपण आपल्या आतली "तोडफोड' रोखू शकतो. त्यासाठी स्व-समुपदेशन साधणाऱ्या रोजनिशीचा उपाय करता 
येण्यासारखा आहे. मनातल्या मनात स्वतःशी झुंजत, चरफडत बसण्यानं नुसतीच दमछाक होते.

सकारात्मक काहीच घडत नाही. त्याऐवजी मनातली निःशब्द बडबड शब्दांत मांडत गेलं, तर गुंता सुटत जाईल. घुसमटीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसायला लागेल. आपण स्वस्थ झालो, तर बाहेरची "तोडफोड' रोखण्यासाठीही आपण काहीतरी करू शकू... 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com