असं जगणं तोलाचं (पहाटपावलं)

पहाट पावलं सुरेश मोहिते
पहाट पावलं सुरेश मोहिते

"असं जगणं तोलाचं' ही माझी कादंबरी वाचून सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या एक विदूषी म्हणाल्या, "काय भोगलंय हो तुम्ही.' मी चाट पडलो. हसावं की रडावं? काही लोकांना एखाद्याचं आयुष्य वेदनादायी, हालअपेष्टात गेलेलं असेल, तर त्याविषयी घाऊक सहानुभूती व्यक्त करणं हे आपलं परम कर्तव्यच वाटत असावं. खरं म्हणजे त्या कादंबरीत लेखकानं असं काही भोगल्याचं ध्वनित होणारं काहीच नव्हतं. होती ती एका शेतकरी कुटुंबाच्या जिद्दीची आणि प्रतिकूलतेवर मात करण्याच्या इर्षेने झगडणाऱ्या त्या कुटुंबातील माणसांची कथा; पण आपल्याकडे खेड्यातील माणसांविषयी काही लिहिलेलं असेल तर काही तरी हृदयद्रावक, शहरी वाचकांच्या मनात सहानुभूतीचा पाझर फोडणारं असायला पाहिजे, असा काहीसा समजच रुढ झालेला होता. आता जसं शेतकऱ्यांविषयी काही लिहायचं म्हणजे त्याच्या आत्महत्यांविषयीचं लिहिलं पाहिजे, असा जो समज होत चालला आहे, तसं वीस-पंचवीस वर्षांपूर्वी "अस्सल ग्रामीण' नावाचा शब्दप्रयोग प्रचलित होता. मी लिहायला लागलो, तेव्हा या अस्सल ग्रामीणपणाच्या मी विरोधात होतो, आजही आहे.

एक काळ असा होता, की नागर वाचकांना वाटत होतं, खेडे म्हणजे जिथे स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा. तिथली माणसं म्हणजे निसर्गाच्या कुशीत वावरणारी जंगलची पाखरं! भैरू औत सोडतो, तेव्हा त्याची कारभारीण बिगीबिगीनं डोक्‍यावर पाटी घेऊन बांधावरून चालत येते आणि कांदा-भाकरीची न्याहारी झाडाखाली दोघं मिळून करतात. त्यांच्यासारखे भाग्यवान तेच!
खेड्यातील माणसांच्या रंजक कहाण्या शहरातील वाचकांना सांगणं एवढंच काम ग्रामीण साहित्यिकांनी करावं, अशी ती अपेक्षा होती. ग्रामीण भागातील माणसांनाही आशा-आकांक्षा असतात. त्यांनाही स्वप्नं असतात. घरातील एखादा मुलगा किंवा मुलगी दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली तर त्यांच्या घरातला आनंदही अवर्णनीय असतो.

एखाद्या ग्रामीण कादंबरीचा नायक शिकून-सवरून सुसंस्कृत झालेला. त्याच्या व्यक्तिमत्त्वालाच एक आत्मविश्‍वासाची झळाळी आलेली, तेच तेज चेहऱ्यावर झळकत असलेला, असा का असू नये? खेड्यातील माणसांचं चित्रण करताना सतत "ती बिचारी माणसं' असं किती दिवस करीत राहायचं? आपल्या इथं ग्रामीण माणसाविषयी लिहायचं म्हणजे त्याच्या गरिबीविषयीचं लिहायचं हे जणू काय सर्वांनी गृहीतच धरलेलं आहे. यातून ग्रामीण भागातील माणसांविषयी केवळ कोरडी सहानुभूती आणि वाचकांच्या मनात दाटून येणारा कळवळा एवढंच साध्य होईल. आपणाविषयी कुणाच्या मनात अनुकंपा दाटून यावी; कुणाला तरी आपली दया यावी, आपण कुणाच्यातरी आश्रयावर जगतो, अशी त्या माणसांची प्रतिमा निर्माण करणं म्हणजे त्या माणसांचा निर्घृण अपमान आहे. खेड्यातील माणसंदेखील माणसंच आहेत अन्‌ तीदेखील आपल्या बरोबरीची आहेत, हेच सिद्ध करणं कोणत्याही लेखकाचं ध्येय हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com