सिताऱ्यांच्या पंगतीत छेत्री! (नाममुद्रा)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

क्रिकेटच्या चढ्या तापात अवघा देश फणफणलेला असताना एका भारतीय फुटबॉलपटूने मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार मुसंडी मारली आहे. निम्म्याहून अधिक जग फुटबॉलचे दिवाणे असले, तरी आपला भारत देश या खेळाला फारसा पाय न लावणारा. पण त्यामुळे भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचे भरीव यश झाकले जाणे अशक्‍य आहे. चॅंपियन्स करंडक क्रिकेट सामन्यांच्या कल्लोळात सुनील छेत्रीची कामगिरी पहिल्या पानावरच्या मथळ्यात किंवा वाहिन्यांवरच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये झळकली नाही. पण अवघ्या 94 आंतरराष्ट्रीय फुटबॉल लढतीत 54 गोल नोंदविण्याचा पराक्रम त्याने नुकताच केला.

क्रिकेटच्या चढ्या तापात अवघा देश फणफणलेला असताना एका भारतीय फुटबॉलपटूने मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार मुसंडी मारली आहे. निम्म्याहून अधिक जग फुटबॉलचे दिवाणे असले, तरी आपला भारत देश या खेळाला फारसा पाय न लावणारा. पण त्यामुळे भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचे भरीव यश झाकले जाणे अशक्‍य आहे. चॅंपियन्स करंडक क्रिकेट सामन्यांच्या कल्लोळात सुनील छेत्रीची कामगिरी पहिल्या पानावरच्या मथळ्यात किंवा वाहिन्यांवरच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये झळकली नाही. पण अवघ्या 94 आंतरराष्ट्रीय फुटबॉल लढतीत 54 गोल नोंदविण्याचा पराक्रम त्याने नुकताच केला. आशियाई पात्रता स्पर्धेत सुनीलने गेल्या मंगळवारी बंगळूरमध्ये झालेल्या किरगिझस्तानविरुद्ध लढतीत एकमेव गोल करत भारताला विजय मिळवून दिलाच, पण वैयक्‍तिक गोलसंख्येनिशी जगातला तो चौथ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. सर्वाधिक गोल आहेत पोर्तुगालच्या क्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर. त्याने 139 लढतीत 73 गोल केले आहेत. तर पाठोपाठ आहे, अर्जेटिनाचा लिओनेल मेस्सी.त्याने 118 सामन्यांत 58 गोल केले आहेत. अमेरिकेचा क्‍लिंट डिम्प्सी 134 सामन्यांतील 56 गोलनिशी तिसऱ्या स्थानावर आहे. चौथा भारताचा सुनील छेत्री. पण त्याने ही किमया अवघ्या 94 लढतीत साधली आहे, याकडे डोळेझाक करता येणार नाही. इंग्लंडच्या वेन रुनीने 53 गोल 119 सामन्यांत केले होते. त्याला छेत्रीने मागे टाकले.

छेत्रीचा स्ट्राइक रेट तर रोनाल्डो आणि मेस्सीपेक्षाही सरस ठरला आहे. सामन्यामागे 0.58 गोल नोंदणारा हा बेजोड खेळाडू भारताचा झेंडा फुटबॉलमध्ये वेगाने पुढे घेऊन चालला आहे. बायचुंग भूतिया या माजी भारतीय फुटबॉलपटूचा वारसा चालवणाऱ्या छेत्रीला युरोपियन साखळीत खेळण्याचे स्वप्न मात्र अजूनही पूर्ण करता आलेले नाही. इंग्लंडच्या क्‍वीन्स पार्क क्‍लबशी करारबद्ध असलेल्या सुनील छेत्रीचा युरोपियन वर्किंग व्हिसा वाढवण्यात आलेला नाही. युरोपात व्यावसायिक फुटबॉल खेळायचा असेल तर हा व्हिसा आवश्‍यक असतो. पण मुदत संपल्याने सुनील छेत्रीचे हे स्वप्न यंदा तरी अधुरे राहील अशी चिन्हे आहेत. अर्थात, त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सरकार पातळीवरही चालू आहेत. ""व्हिसाची मुदत वाढवली गेली नाही, तर नि:संशय मी निराश होईन. पण हा काही जगाचा शेवट नाही. आणखी तीन वर्षे तरी मी खेळू शकेन, असा विश्‍वास मला आहे,'' अशी प्रतिक्रिया 33 वर्षीय सुनील छेत्रीने व्यक्‍त केली.