पाऊस दिसतोय, पण रुसतोय...

संजय वरकड
बुधवार, 6 जुलै 2016

मराठवाड्यात उशिरा का होईना पाऊस सुरू झाल्याने सध्या समाधानाचे वातावरण आहे; पण दुष्काळाचे चित्र बदलण्यासाठी यापुढील काळात दमदार पाऊस होण्याची गरज आहे.

मराठवाड्यात उशिरा का होईना पाऊस सुरू झाल्याने सध्या समाधानाचे वातावरण आहे; पण दुष्काळाचे चित्र बदलण्यासाठी यापुढील काळात दमदार पाऊस होण्याची गरज आहे.

सतत दुष्काळाच्या खाईत होरपळणाऱ्या मराठवाड्यात उशिरा का होईना पाऊस बरसतोय. कुठे कमी, कुठे जास्त पडणाऱ्या पावसामुळे सध्या समाधानाचे वातावरण नक्कीच आहे. काहीच नसल्यापेक्षा जो पडतो तोही नसे थोडका, ही मराठवाड्यातील जनतेची भावना आहे. या पावसामुळे मराठवाडा लगेच दुष्काळमुक्त होईल, असे अजिबात म्हणता येणार नाही. तरीही पावसाची सततची हुलकावणी टळली आहे. यापुढील काळात दमदार पाऊस झाला, तर मराठवाड्याला कूस बदलण्याची संधी आहे. गेल्या तीन- चार वर्षांत सततची नापिकी आणि त्यातून उद्‌भवणारी कर्जबाजारीपणाची अवस्था मिटायला बराच काळ जावा लागेल. मराठवाड्यातील जनता पावसाची आतुरतेने वाट बघताना नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पावसाकडेही लक्ष ठेवत असते. मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणाचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. या धरणात येणारे पाणी नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणे भरल्यानंतर पुढे झेपावते. त्यामुळे नाशिक आणि नगरला जोरात पाऊस पडला, की इकडच्या मंडळींना अधिकच आनंद होतो. या वर्षी तोही आनंद मिळतोय. अर्थात पावसाच्या पहिल्या टप्प्याच्या आगमनावरून अंदाज बांधणे कठीण आहे. यापुढील काळात दमदार पाऊस पडत राहिला, तर नक्कीच मोठा बदल दिसेल. "जलयुक्त शिवार‘, गावकऱ्यांनी केलेले श्रमदान, सकाळ रिलीफ फंडामार्फत झालेली कामे; तसेच स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या फंडातून झालेल्या कामांचे कमी पावसात अनेक गावांत अधिक परिणाम दिसायला लागलेत. पाऊस सुरू होताच लोकांनी मोठ्या प्रमाणावर झाडे लावायलाही सुरवात केली आहे. गेल्या दोन- तीन वर्षांत पाऊस पडत नसल्यामुळे पडलेल्या पावसाचा जास्तीत जास्त उपयोग होण्यासाठीचे प्रयत्न वाढलेले आहेत. यापुढील काळातही लोक हे प्रयत्न सुरूच ठेवतील असे दिसते. पाण्यासंदर्भात वाढलेली जागरूकता अनेकांना सक्रिय कामांना प्रोत्साहन देत आहे हे त्याचे मुख्य कारण आहे.
हे सर्व समाधानाचे वातावरण प्रत्यक्षात किती दिवस टिकते हा प्रश्‍न अजूनही डोक्‍यातून काही केल्या जात नाही. कारण अजूनही मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही. काही तुरळक ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि नांदेड, हिंगोली जिल्ह्यांचा अपवाद वगळता इतरत्र अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहेच. मराठवाड्यात अकरा मोठे, 75 मध्यम, 732 लघु असे 847 प्रकल्प आहेत. त्यातील साठा अद्यापही जेमतेम सव्वा टक्‍क्‍यापर्यंतच आहे. हा पाणीसाठा वाढण्यासाठी मोठ्या पावसाशिवाय पर्याय नाही. अजूनही मराठवाड्यातील तब्बल 2057 गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. एकीकडे धरणातील पाणीसाठ्यात झालेली कमालीची घसरण आणि दुसरीकडे पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न आहे तसाच आहे. पिण्याच्या पाण्याची आणि धरणातील पाणीसाठ्यासारखीच पेरणीची परिस्थितीही फारशी चांगली नाही. खरीप हंगामाच्या 48 लाख 91 हजार हेक्‍टरपैकी जेमतेम 21 लाख 28 हजार क्षेत्रावरच आतापर्यंत पेरणी झाली आहे. बीड, लातूर आणि जालना जिल्ह्यांतच बहुतांश ठिकाणी पन्नास टक्के पेरणी झाली आहे. इतर जिल्ह्यांत आता पेरणी सुरू झाली. या आठवडाभरात पेरणीचे क्षेत्र झपाट्याने वाढलेले असेल. याचाच अर्थ बहुतांश ठिकाणी पेरणीला उशीर झाला आहे. उशिरा का होईना; पण पेरणीयोग्य पाऊस होतोय, यावरच लोक समाधानी आहेत. या परिस्थितीत मराठवाडा दुष्काळाशी मुकाबला करतो आहे. पाऊस पडायला लागला, की सारे प्रश्‍न सुटायला लागतात असे वाटणेच घातक आहे, हे यावरून दिसते. गेल्या काही वर्षांत मराठवाड्यातील फळबागांचे प्रमाण घटत आहे. आत्ताचा पाऊस बघता फळबागांना अजूनही धोकाच आहे. एकूण काय तर मराठवाड्यावर सध्या पावसाचे ढग दिसत आहेत; पण दुष्काळाचे ढगही हटत नाहीत असेच म्हणावे लागेल. हुलकावणी देणारा पाऊस दिसतोय, पण रुसतोय असेच म्हणावे लागेल. रुसलेला पाऊस बरसेल, शेतातले पीक हसेल, पावसाचे ढग फुटेल आणि हळूहळू का होईना; पण दुष्काळ हटेल, अशी आशा आहे.