मोबाइल : शाप की वरदान? (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

या क्षणापासून आम्ही मोबाइल फोनशी घटस्फोट घेतला, घेतला, घेतला! फेसबुकादी नतद्रष्ट, तमोगुणी व हराम गोष्टींपासून तलाक घेतला, घेतला, घेतला!! सोसंल मीडियाशी काडीमोड घेतला, घेतला, घेतला!!!

यापुढे आम्ही शतप्रतिशत व्रतस्थ राहणार आहो.

या क्षणापासून आम्ही मोबाइल फोनशी घटस्फोट घेतला, घेतला, घेतला! फेसबुकादी नतद्रष्ट, तमोगुणी व हराम गोष्टींपासून तलाक घेतला, घेतला, घेतला!! सोसंल मीडियाशी काडीमोड घेतला, घेतला, घेतला!!!

यापुढे आम्ही शतप्रतिशत व्रतस्थ राहणार आहो.

मोबाइल फोनपासून चार हात दूर राहा, असा आदेश आम्हाला (श्रावण महिन्याच्या प्रारंभीच) प्राप्त झाला, तो अर्थातच आम्हांस शिरसावंद्य आहे. अखिल जगताचे उद्धारक ब्रह्मांडनायक श्रीमान नमोजी हुकूम ह्यांनीच "मोबाइल सोडा आणि जनतेत जा,‘ असा फतवा जारी केला आहे. आता इलाज नाही.
मोबइल फोन हे यंत्र तर समाजाच्या कानाला लागलेली गोचीड आहे, गोचीड! खरे गोचीड अधूनमधून कान फडफडविल्यास गळून पडण्याची शक्‍यता असते. किंवा शेपटाच्या तडाख्याने मार तरी खाते; पण दुर्दैवाने आमचे कान बरेचसे लांब असले तरी तितकेसे मोठे नाहीत व शेपटाची लांबी कानापर्यंत पोचणे अंमळ कठीण जाते. सबब, मोबाइल त्यागण्यावाचून पर्याय उरलेला नाही.
 

ब्रह्मांडनायक नमोजी ह्यांनी आपल्या मंत्री, खासदारे, तसेच बिनीच्या कार्यकर्त्यांस "माझ्या हातात कधी मोबाइल पाहिला आहे का,‘ असा सवाल करून लगोलग निरुत्तर केले. आम्ही तर च्याटंच्याट पडलो. खरेच की! नमोजींच्या कानाला फोन लागलेला आम्ही आजवर एकदाही पाहिलेला नाही!! हां, आता सेल्फीबिल्फी काढण्यासाठी त्यांनी एकवेळ मोबाइल फोन फूट, दोन फूट दूर धरला असेल!! पण...कानाला? इंपॉसिबल!
मोबाईल फोनमध्ये संभाषण ध्वनिमुद्रित करण्याची अत्यंत वईट्ट अशी सोय असते. काही नतद्रष्ट माणसे ते रेकॉर्ड करतात आणि प्रसिद्धिमाध्यमांकडे देतात. त्यामुळे विनाकारण प्रॉब्लेम होतो. फोनमध्ये बारका क्‍यामेरासुद्धा असतो. सेल्फी घेणे ठीक आहे; पण त्यात आपलेच काही कारनामे चित्रीत झाले तर भलताच प्रॉब्लेम होतो; पण सरसकट सोशल मीडियापासून दूर राहून जनतेत जायचे, म्हंजे काय करायचे, हे आम्हाला न कळल्याने आम्ही थेट नमोजी ह्यांच्या निवासस्थानी गेलो. पाहातो तो काय! नमोजीहुकूम हातात मोबाइल फोन घेऊन काहीबाही करत होते...

""शतप्रतिशत प्रणाम!‘‘ आम्ही.

"" अरे, क्‍यारे आव्या?‘‘ दिलखुलास हसत नमोजींनी आमचे स्वागत केले. आम्ही कॉंग्रेसवाले आहो, असा नमोजींचा उगाचच गैरसमज आहे; पण आमचे आणि त्यांचे तसे बरे आहे. कमळ पार्टीतील लोकांना ते हिंग लावून विचारत नसले तरी विरोधकांशी मात्र फार्फार गोडीगुलाबीने वागतात.

""आवो बेसो!‘‘ ते म्हणाले, ""फॉन किधु हतु?‘‘

""ऑ?‘‘ आम्ही च्याटावस्थेत!

""अरे, एकदमशी आला? आधी फॉन करायच्या ने!‘‘ नमोजी म्हणाले. त्यावर आम्ही आदर्श विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरत गुर्वाज्ञेचे पालन करीत असल्याचे त्यांना सांगितले.

""गुर्वाज्ञा माने?‘‘ नमोजींनी गोंधळून विचारले.

""आपल्या आज्ञेनुसार तूर्त आम्ही मोबाइल फोनचा वापर संपूर्ण बंद केला आहे! इतकेच नव्हे, तर फेसबुक, ट्‌विटर असल्या थिल्लर गोष्टींचाही त्याग केला असून जनतेत जायचे ठरवले आहे!!‘‘ नम्रपणे आम्ही म्हणालो. त्यावर त्यांनी एकदम चेहरा गंभीर केला.

""तुमी लोक टेकसेव्ही नाय झ्याले, तर शुं फायदा? फोन इज व्हेरी इंपॉर्टंट गॅजेट! फोनऊप्परथी तमारा जनधन खाता ओपरेट करता येते. बिलनुं भुगतान करता येते. एटला माटे फोन तो जोईए ने!‘‘ ते म्हणाले.

""आपल्या आज्ञेबाहेर मी नाही!! तुम्ही म्हणत असाल तर मोबाइल काय, बाइलसुद्धा त्यागीन!!‘‘ आम्ही निक्षून म्हणालो.

""गुड गुड! सारु सारु..!‘‘ असे म्हणून श्रीमान नमोजी पुन्हा हातातल्या मोबाइलकडे वळले. झटकन स्माइल देत त्यांनी एक सेल्फी घेतला.
स्वत:वर खूश होत म्हणाले, ""मोबाइल फॉन तो बेकार गॅजेट छे...पण एमा बे चीज बहु सरस! मानवजातना मळ्या वरदान छे, वरदान!‘"
आम्ही गोंधळलो. कुठल्या दोन गोष्टी?
 

ते म्हणाले, ""सेल्फी अने...अने...केंडी क्रश!! कछु सांभळ्यो?‘‘

-ब्रिटिश नंदी