‘आपला’ पाऊस! (अग्रलेख)

file photo
file photo

पाऊस येतो, तो एकट्या चातकाची तहान भागवायला नाही, तो तर अवघी सृष्टी भिजवून जातो. पर्जन्यबाबाजीच्या राज्यात डावे-उजवे नसते. कसाही असला तरी तो ‘आपला’ आहे, पाहुणा नव्हे!

‘ये तो, येतो’ असे सांगून कधी कधी खरोखरच येणाऱ्या बेभरवशी पाहुण्यासारखा पाऊस अखेर आला. गडगडाटी हसत घरात शिरून चिखलाचे ओलेचिले पाय थेट ओसरीपर्यंत उमटवत येणाऱ्या भारदस्त पाहुण्यासारखा पाऊस अखेर आला. आल्या आल्या ‘‘चहा टाका चहा, आणि हो...आलंही टाका थोडं,’’ अशी ऑर्डर सोडत झोपाळ्यावर ऐसपैस बैठक मारणाऱ्या रावसाहेबासारखा पाऊस अखेर आला. ‘आल्यासरशी राहा आता किमान चार-सहा आठवडे, अचानक कुठे गायब होऊ नकोस,’ हे त्याला आता कोणीतरी सांगायला हवे. धोंड्याचा महिना बराचसा कोरडाच गेला. पावसावर भिस्त ठेवून कास्तकारांनी शेतशिवारे सावरायला घेतली. उधार-पाधार, बी-बियाणे, खतेबिते जुळवण्याची धामधूम सुरू झाली. ‘औंदा पाऊस दमदार येणार’, अशा भाकितांचेही वरकड पीक निघाले. ठरल्या तारखेला तो तसा आलाही; पण दोनचार दिवस मोजकी छपरे भिजवून पुन्हा त्याने तोंड काळे केले. आता ह्याला काय म्हणायचे? त्याची वाट पाहून थकलेली शेतशिवारे आणि वाकलेले किसान पुन्हा आभाळाकडे पाहू लागले. म्हणाले, ‘ह्यो बाबा आता येतोय की न्हाई?’ पण निज ज्येष्ठ लागता लागता स्वारी पुन्हा दारात हजर! अरबी समुद्रात कुठल्यातरी आडदांड वाऱ्यांनी त्याची वाट रोखल्याने अंमळ उशीर झाला म्हणे. तेव्हा पावसाचे दोन्ही करांनी स्वागत करायलाच हवे. त्याच्या संजीवक वर्षाचक्रावर तर आपले जगणे अवलंबून आहे. सगळीच शेते अजूनही भिजलेली नाहीत. तळी अजून भरलेली नाहीत. विहिरी अजूनही खोल आहेत. खंदून पडलेल्या शिवारात अजूनही म्हणावी तशी लगबग नाही; पण तरीही पाऊस पडेल, अगदी मायंदाळ पडेल, हा आशेचा अंकुर चिवट आहे. बिकट परिस्थितीचे कवच फोडून तो वर आला आहे. पावसाने यावे आणि नेमकेच बरसावे! त्याचे जास्ती लाडात येणे महागात पडते. खऱ्याखुऱ्या जावयाचे धोंड्या महिन्यात काय करायचे ते सारे होते; पण हा आभाळातला जावई कधीकधी दशमग्रह ठरतो. न आला तरी अवकाळ, नको तेवढा बरसला तरीही दुकाळ.

गल्लीबोळात सोसाट्याने घुसणाऱ्या वावटळीने दोरीवर वाळत घातलेले कपडे उडाले की शहरगावच्या मंडळींना पावसाची खरी चाहूल लागते. दिवसभर घामाच्या धारांनी न्हाऊन निघणाऱ्या चाकरमान्यांच्या मनगटावर, डोक्‍यावर पावसाचे थेंब पडले की त्याचेही मन हरखून जाते. दूरवरून आलेला मातीचा गंध दिवसभराच्या उसाभरीचे चीज करतो. बघता बघता गजबजलेले डांबरी रस्ते ओले होतात. कपाटातल्या खणातून, गेल्या वर्षी निगुतीने बांधून ठेवलेल्या छत्र्या बाहेर निघतात. ओठांवर नकळत एक स्मित येते. हातातल्या मोबाइलवरून पावसाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण होते. खिसापाकीट चाचपून संध्याकाळच्या बैठकीची निमंत्रणे निघतात. हे सुखदेखील काही दिवसांचे. आधी हवाहवासा वाटणारा पाऊस ठाण मांडून बरसला की अगदी नकोसा होतो. गाड्या बंद, शाळा बंद, खड्डेयुक्‍त रस्ते तुंबलेले. वाहतुकीचा बोऱ्या. कामाच्या ठिकाणी खाडे...आणि या साऱ्या सावळ्या गोंधळात ओल्याचिंब गर्दीतली चटकन भडकणारी डोकी. जिकिरीच्या ओलचट्ट हवेत माणसाने रोमॅंटिक व्हायचे तरी किती? इथेही त्याने नेमकेच पडावे, अशी अपेक्षा असते. शक्‍यतो शेताबितात, धरणाबिरणातच पडावे. उगीच संतप्त आंदोलकासारखे रस्त्यावर उतरून वाहतूक अडवू नये! अति बरसात करून शहरी जीवन तसनस करून टाकण्याची पर्जन्याला भारी खोड. आपल्या मनात आहे, तसा तो कधी बरसणार नाही. ‘शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल काय?’ हा प्रश्‍न विचारणाऱ्या निरागस बालमनाच्या पाठीवर दप्तर देऊन हा शाळेत जायला लावील आणि नंतर कोसळ कोसळ कोसळेल! म्हणूनच म्हटले, या बाबाजीचा काही नेम नाही. नेमेचि येणारा म्हणून कथाकाव्यात प्रसिद्ध असला तरी, याच्यासारखा बेभरवशी नि अवसानघातकी दुजा कुणी नाही; पण तरीही त्याची तहान साऱ्यांना लागतेच. नाही कशी लागणार? ‘एरव्ही येकल्या बापियाच्या तृषे। मेघ जगापुरते काय न वर्षे?’ असा सवाल ज्ञानेश्‍वरमाऊलीने विचारला नव्हता काय? पाऊस येतो, तो एकट्या चातकाची तहान भागवायला नाही. तो तर अवघी सृष्टी भिजवून जातो. पर्जन्यबाबाजीच्या राज्यात डावेउजवे नसते. कसाही असला तरी तो ‘आपला’ आहे; पाहुणा नव्हे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com