सॅल्युट! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

आय सॅल्युट यू ऑल 
मुंबईवालों, आय सॅल्युट यू ऑल! 

तुंबलेल्या गर्दीला 
थकलेल्या वर्दीला 
मेलेल्या म्हशींना 
सडलेल्या घुशींना 
कुत्र्यांना, मांजरांना 
शेळ्यांना, कावळ्यांना 
समुद्र उल्लंघून रस्त्यावर 
आलेल्या माशांना 
पुढाऱ्यांच्या भिजलेल्या 
पाणीदार मिश्‍यांना 
पाणी ओसरण्याची वाट 
पाहणाऱ्या रहिवाश्‍यांना 
...आय सॅल्युट यू ऑल! 

आय सॅल्युट यू ऑल 
मुंबईवालों, आय सॅल्युट यू ऑल! 

तुंबलेल्या गर्दीला 
थकलेल्या वर्दीला 
मेलेल्या म्हशींना 
सडलेल्या घुशींना 
कुत्र्यांना, मांजरांना 
शेळ्यांना, कावळ्यांना 
समुद्र उल्लंघून रस्त्यावर 
आलेल्या माशांना 
पुढाऱ्यांच्या भिजलेल्या 
पाणीदार मिश्‍यांना 
पाणी ओसरण्याची वाट 
पाहणाऱ्या रहिवाश्‍यांना 
...आय सॅल्युट यू ऑल! 

सव्वीस जुलैचे शहारे 
पुन्हा एकवार अंगावर घेणाऱ्यांना 
आकांताच्या आठवणींना 
भर पावसात उजळा देणाऱ्यांना 
असल्या पावसात गणपतीला 
नवसाच्या रांगेत उभे राहणाऱ्यांना 
गणेशोत्सवाच्या ओस मांडवांना 
खळाळून आलेल्या भरतीच्या 
पाण्याच्या तांडवांना 
आचके देत थंडावलेल्या 
हजारो वाहनांना 
वाहत्या पाण्यातून वाट 
काढणाऱ्या प्रजाजनांना 
बेसहारा बेचाऱ्यांच्या 
मदतीसाठी पुढे आलेल्या 
हजारो हातांना 
डिझास्टर मॅनेजमेंटच्या 
हास्यास्पद सरकारी बातांना 
...आय सॅल्युट यू ऑल! 

भयभीत चेहऱ्यांना 
निब्बर बहिऱ्यांना 
अवजड पावलांना 
भुकेल्या मुलांना 
ओल्याचिंब मानवी साखळ्यांना 
पाण्यात बुडालेल्या मॅनहोलवर 
खुर्ची टाकून इशारे देणाऱ्या 
दक्ष नागरिकांना 
काचबंद मोटारीतल्या पैसेवाल्यांना 
त्यांना चहाबिस्कुट देणाऱ्या झोपडीवाल्यांना 
...आय सॅल्युट टु ऑल! 

मध्येच पोरं सोडून देणाऱ्या शाळांना 
दफ्तरावर पेंगुळलेल्या मुलाबाळांना 
जिवाच्या आकांताने त्यांच्याकडे 
धावणाऱ्या चाकरमानी आयांना 
लोकलच्या रुळात चालणाऱ्या बायांना 
ेस्टेशनात पाण्यासह तुंबलेल्यांना 
ठिकठिकाणी आंबलेल्यांना 
...आय सॅल्युट यू ऑल! 
आपले चिरेबंदी धर्मदरवाजे 
आवर्जून उघडून देणाऱ्या 
उत्तुंग गिरिजाघरांना 
पाठीवर थाप मारत 
जेऊ घालणाऱ्या मायेच्या मशिदींना 
पुढे सरसावत भर मांडवात 
पाने मांडणाऱ्या बिरादर गणेशमंडळांना 
ट्‌विटर, फेसबुकावर बेधडक 
'आमच्या घरी या' असे सांगणाऱ्या 
रहमदिल नेटकऱ्यांना 
रस्त्यावरच्या दमगीरांना 
त्यांना डाळ-भात, ब्रेडस्लाइस, 
चहाकटिंग, पावभिस्कुट देणाऱ्यांना 
निम्याअधिक उद्‌ध्वस्तांना 
पावसात हिंडणाऱ्या मौलामस्तांना 
झोपडीत शिरलेल्या पाण्यात 
खेळणाऱ्या पोराटोरांना 
वाहून चाललेली भांडीकुंडी 
धरू पाहणाऱ्या बायाबापड्यांना 
...आय सॅल्युट यू ऑल 

आय सॅल्युट यू फॉर 
युअर मुंबईकर स्पिरिट, 
...अँड युअर हेल्पलेसनेस!