सोनू, तुझा स्वत:वर तरी भरोसा हाय का? (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

मुंबईची पुरती दाणादाण उडवून दिलेल्या पावसाने नागरी नियोजनाचे जसे वाभाडे काढले, तसेच प्रशासनाच्या त्रुटीवरही बोट ठेवले आहे. 

एरव्ही पायाला चाके लावून घड्याळाच्या काट्यानुसार 24 तास पळणाऱ्या मुंबईकरांच्या पायात मंगळवारी वरुणराजाने बेड्या घातल्या अणि लाखो चाकरमानी जागीच ठाणबंद झाले. खरे तर बारा वर्षांपूर्वी 26 जुलै रोजी अशाच अतिवृष्टीमुळे लक्षावधी मुंबईकरांना भोगाव्या लागलेल्या यातनांच्या कहाण्या विस्मृतीत जाण्यापूर्वी पावसाने दिलेली ही दुसरी चपराक होती. ही चपराक जशी या महानगराचे नागरी प्रशासन दोन-अडीच दशके हातात असलेल्या शिवसेनेला होती, त्याचबरोबर ती रस्तोरस्ती आणि नाल्यानाल्यांत कचरा फेकणाऱ्या मुंबईकरांनाही होती. '26 जुलै'च्या त्या कोपानंतर ना मुंबई महापालिका, राज्य सरकार काही धडा शिकले; ना नागरिकांना काही नागरी कर्तव्यांची जाणीव झाली होती, हेच कोलमडून पडलेल्या मुंबईने अधोरेखित केले. तरीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र महापालिका प्रशासनाची पाठ थोपटणे पूर्णपणे अनाकलनीय होते. त्यानंतर महापौरांनी सारा दोष मुंबईच्या भौगोलिक रचनेला दिला. मात्र, मुंबईची रचना अशी उंच-सखल आहे हे लक्षात घेऊनच नियोजन करणे हे प्रशासनाचे काम असते. त्यात या वेळी महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले. महापालिकेचा आपत्ती नियंत्रण विभाग या वेळी नेमके काय करत होता, हा तर लाखमोलाचाच प्रश्न ठरावा. सारा दोष पाऊस, तसेच भौगोलिक रचनेवर टाकून स्वतःची सुटका करून घेण्याचे काम शिवसेना गेली अनेक वर्षे करत आली आहे आणि त्यामुळेच मुंबईकरांच्या हालांना पारावर उरलेले नाहीत. खरे तर '26 जुलै'च्या तुलनेत 29 ऑगस्टचा वरुणराजाचा कोप तितकासा भयावह नव्हता. त्या वेळी दिवसभरात 944 मि.मी. पाऊस झाला होता, तर या वेळी मुंबईला झोडपून काढणाऱ्या पावसाचे मोजमाप 316 मि.मी. होते. तरीही मुंबईच्या धमन्या असलेल्या मध्य, पश्‍चिम, हार्बर या तिन्ही सेवा पूर्णपणे बंद पडल्या. रस्तोरस्ती वाहतूक पुरती ठप्प झाली. मात्र, मंगळवारी मुंबईकरांना झोडपून काढणाऱ्या पावसाने एक नवाच पवित्रा घेतला होता आणि त्यामुळे या महाकाय महानगरात किमान सात ठिकाणी सकाळी आठ ते दुपारी तीन या सात तासांत 200 मि.मी.हून अधिक वृष्टी झाली आणि 'नालेसफाई यंदा पूर्ण झाली आहे' अशा गमजा मारणाऱ्या शिवसेनेचे पितळ उघडे पडले. 

अर्थात, या तुफानी वृष्टीला सागरी भरतीनेही साथ दिली आणि त्यामुळे आकाश फाटल्यागत होणाऱ्या मुसळधार पावसाचे पाणी जागोजागी साठत गेले. हे सारे मुंबईकरांना आता नित्याचे होऊन गेले आहे. त्यात प्रतिवर्षी होणाऱ्या नालेसफाईच्या कामातील गैरव्यवहारांची चर्चाही आता त्यांच्या पचनी पडून गेली आहे आणि त्याबाबतची दूषणे महापालिका, सत्ताधारी शिवसेना व कंत्राटदार यांना देत मुंबईकर पावसाळ्यात जीव मुठीत धरून घराबाहेर पडत असतात. एकीकडे ही स्थिती असताना, तुफानी पावसाच्या गर्तेत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले. त्यात मशिदी, चर्च, गुरुद्वारा आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अग्रभागी होती. एकमेकांना हात देत मुंबईकर मंगळवारी मध्यरात्रीनंतर घरोघरी पोचले. त्यामुळे मुंबईचे 'स्पिरिट' म्हणजे काय, ते पुनश्‍च एकवार बघायला मिळाले आणि ते खरेही आहे. मात्र, हे 'स्पिरिट' एखाद्याच दिवशी का दिसते? वर्षाचे अन्य 364 दिवस हेच 'स्पिरिट' रस्तोरस्ती आणि नाल्यानाल्यांत प्लॅस्टिक आणि थर्मोकोलचा कचरा टाकणाऱ्यांचे हात रोखत कसे नाही? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे मुंबईकरांनी किमान स्वत:ला तरी द्यायला हवीत. अर्थात, मुख्य जबाबदारी राज्यकर्त्यांचीच आहे. अशा आपत्तीच्या वेळी संपूर्ण शहर कोलमडून गेल्याचे चित्र एकट्या मुंबईचे नाही, तर देशाच्या अन्य मोठ्या शहरांतही नैसर्गिक आपत्तींच्या वेळी असाच प्रत्यय आलेला आहे. हे लक्षात घेता ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रभावी आपत्ती निवारण यंत्रणा सदैव सज्ज ठेवणे ही आजची गरज आहे. त्याबाबत कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही, हेच मुंबईच्या ताज्या आपत्तीतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. 

मुंबईची ही अशी अवस्था झालेली असतानाच, तिकडे हजारो कोस दूर असलेल्या अमेरिकेतील ह्युस्टनमध्येही तशीच परिस्थिती होती. मुंबईवर ही आपत्ती ओढवली ती 'फयान' वादळामुळे, तर ह्युस्टनला वेढले होते ते 'हार्वे' चक्रीवादळाने. मात्र, अशा वेळीही तेथील शिस्त वाखाणण्याजोगी होती. आता सारे स्थिरस्थावर झाल्यावर मुंबईतील नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचाराच्या कहाण्या बाहेर येऊ लागतील. मात्र, ते होत असताना मुंबई महापालिकेत 'पहारेकरी' अशी भूमिका घेणारा भाजप काय करत होता, हा प्रश्‍न अनुत्तरितच राहील. पण, खरा प्रश्‍न त्या पलीकडचा आहे. देशाच्या या आर्थिक राजधानीचे चार-सहा तासांच्या पावसाने जे काही झाले त्यामुळे खऱ्या अर्थाने मान खाली गेली असणार ती 'स्मार्ट सिटी'चे स्वप्न पाहणाऱ्यांची. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नगरनियोजनकारांना आमंत्रित करून मुंबईकरांच्या या प्रतिवर्षीच्या पावसाळी दुखण्यावर इलाज शोधून काढायला हवा, तरच या महानगराला काही भवितव्य राहील. मुंबईकरांना मात्र आता 'सोनू, तुझा स्वत:वर तरी भरोसा हाय काय?' असे नवे गाणे म्हणावे लागेल!

Web Title: mumbai rains mumbai monsoon marathi news mumbai weather Mumbai Municipal Corporation