मित्र, शत्रू... की विरोधक! (अग्रलेख)

मित्र, शत्रू... की विरोधक! (अग्रलेख)

दहा महापालिका व २६ जिल्हा परिषदा यांची सत्ता काबीज करण्यासाठी झालेल्या निवडणुका मुद्द्यांऐवजी गुद्यांवरच लढवल्या गेल्या! आता निकालांनंतर राज्यात राजकीय उलथापालथ होते काय, हा लाखमोलाचा प्रश्‍न आहे.

संपूर्ण देशाच्या राजकारणाला नवे वळण देण्याची ताकद असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी उत्तर प्रदेशात सुरू असतानाच, महाराष्ट्रात नवे राजकीय नेपथ्य उभे करू पाहणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांचे मतदान मंगळवारी पार पडले! उत्तर प्रदेशात पारंपरिक विरोधक एकमेकांशी प्राणपणाने झुंजत असतानाच, महाराष्ट्रात गेली जवळपास दोन-अडीच दशके युतीचे राजकारण करणाऱ्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या तथाकथित ‘मित्र’ पक्षांमध्येच कडवी लढत झाली. या दोघांमध्ये मुंबईत कमालीची चुरस आहे; तर ठाणे, पुणे, नाशिक या शहरी पट्ट्यात भाजपला राष्ट्रवादीचेही दणकट आव्हान आहे. ही निवडणूक महाराष्ट्रातील दहा महापालिका आणि २६ जिल्हा परिषदा यांची सत्ता काबीज करण्यासाठी झाली असली, तरी साऱ्यांचे लक्ष ३५ हजार कोटींहून अधिक रकमेचा ताळेबंद असलेल्या मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो, याकडेच लागले आहे. यावेळचे सुमारे पाच टक्क्यांनी वाढलेले मतदान कोणाला लाभदायी ठरणार याचे औत्सुक्य आहे. १९९२ पासून सातत्याने भाजपशी हातमिळवणी करून मुंबई महापालिका आपल्या हातात ठेवणाऱ्या शिवसेनेने युती तोडून एकट्याच्या बळावर मुंबापुरीचे मैदान मारण्याचा निर्णय घेतल्यामुळे तर राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या या दोन पक्षांत प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या सुंदोपसुंदीच्या राजकारणाला ऊत आला. शिवाय, जिंकण्याच्या एकमेव उद्देशाने भाजपसह सर्वच पक्षांनी गुंडपुंडांना दारे सताड उघडी केली. आता या गुंडपुंडांना मतदारांनी घरी बसविले, तरच मतदार ‘राजा’ आहे, हे विधान सार्थ ठरेल. प्रचाराच्या शेवटच्या ‘मॅण्डेटरी ओव्हर’मध्ये फडणवीस सरकार हे ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचा इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट सरकारच्या भवितव्याचाच प्रश्‍न अजेंड्यावर आणला आणि त्यामुळे या निवडणुकांच्या निकालापेक्षाही आता या प्रश्‍नाच्या उत्तराकडेच अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. 

गेले महिनाभर सुरू असलेल्या या रणधुमाळीला अनेक पदर होते, त्याचबरोबर अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांची पार्श्‍वभूमीही होती. या निमशहरी भागांत आपले वर्चस्व दाखवून देण्यात भाजपला यश आले होते आणि त्यामुळेच नोटाबंदीच्या निर्णयावर जनतेने उठवलेली ही मोहोर आहे, असा दावा भाजप करत होता. या निवडणुकीत मात्र, शहरी आणि ग्रामीण अशा भागात झालेले हे मतदान ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी वार्षिक परीक्षाच आहे; कारण त्यांची ‘मिस्टर क्‍लीन’ ही प्रतिमा हेच भाजपच्या हातातील एकमेव हुकमाचे पान होते आणि त्यांनीही सारी ताकद पणाला लावून अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. उद्धव ठाकरे यांच्यासाठी तर ही शिवसेनेच्या अस्तित्वाचीच लढाई होती. मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातातून गेल्यास त्या संघटनेच्या अस्तित्वाला तडा जाऊ शकतो. तरीही उद्धव यांनी भाजपला अंगावर घेण्याचा धोका पत्करला; कारण शिवसेनेच्या अस्तित्वाला हादरा बसू लागला की शिवसैनिक चवताळून उठतो, हे त्यांना ठाऊक आहे. खरे तर हे दोन समविचारी पक्ष एकत्र आले असते आणि त्यामुळे काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’ आघाडी करून मैदानात उतरले असते, तर लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील दारूण पराभवाचा थोडाफार बदला त्यांना घेता आला असता. मात्र, तसे झाले नाही आणि त्यामुळे या निवडणुका चौरंगी झाल्या. यात सर्वांत कोंडी झाली ती राज ठाकरे यांच्या मनसेची. गेली पाच वर्षे सुशेगाद राहिल्यानंतर ऐनवेळी त्यांना जाग आली; मात्र तेव्हा वेळ टळून गेली होती. त्यातच त्यांनी उद्धव यांच्यापुढे टाळीसाठी हात पुढे करून सर्वांनाच धक्‍का दिला. अर्थात, उद्धव यांनी टाळी काही दिली नाही. त्यामुळे त्या पक्षाची अवस्था खूपच बिकट झाली आहे.

ग्रामीण भागात या निवडणुकांच्या निमित्ताने मुसंडी मारण्याच्या भाजपच्या प्रयत्नांनाही कुठे शिवसेना, कुठे काँग्रेस तर कुठे ‘राष्ट्रवादी’ शह देत आहेत. त्याचा परिणामही निकालांवर होईल. मात्र, या प्रचारमोहिमेत नागरी सुविधा, तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या अजेंड्यावर याव्यात, ही अपेक्षा मात्र फोल ठरली. गेल्या दोन निवडणुका राज व उद्धव यांच्यातील ‘भाऊबंदकी’भोवती भिरभिरत राहिल्या होत्या. यंदाही ‘भाऊबंदकी’ नाटकाचा प्रयोग झालाच; मात्र त्यातील राज यांच्या पात्राची जागा भाजपने घेतली होती. फडणवीस व उद्धव यांच्यातील चिखलफेकीत अन्य नेत्यांनाही सामील होणे भाग पडले आणि प्रचार कधी नव्हे इतक्‍या खालच्या स्तरावर गेला. त्यामुळे यंदाच्या या निवडणुका मुद्‌द्‌यांऐवजी गुद्यांवरच लढवल्या गेल्या! निवडणुका हे जनप्रबोधनाचे एक माध्यम आहे, असे डॉ. राममनोहर लोहिया सांगत असत आणि त्यामुळे जय-पराजयाची पर्वा करू नये, असे त्यांचे म्हणणे असे. या वेळी मात्र परस्परांची उणीदुणी काढण्यातच सारे दंग होते. शिवाय, पैशांच्या वारेमाप आणि ओंगळवाण्या वापराचे दर्शनही घडले. आता शेवटच्या क्षणी शिवसेना आमची ‘शत्रू’ नसून, ‘राजकीय विरोधक’ आहे, अशी भाषा भाजपला सुरू करणे भाग पडले. त्यामुळेच निकालानंतर राज्यात राजकीय उलथापालथ होते काय, हाच प्रश्‍न समोर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com